News Flash

नलिनीधर भट्टाचार्य

आसामच्या साहित्यात ‘जयंती पर्वा’चे महत्त्व आपल्या ‘सत्यकथा’सारखे आहे.

आसामच्या साहित्यात जयंती पर्वाचे महत्त्व आपल्या सत्यकथासारखे आहे. जयंतीनावाचे नियतकालिक हे आधुनिक आणि वास्तववादी असमिया साहित्याचे वाहक ठरले, त्यामुळे १९५०च्या दशकाचा उत्तरकाळ हा जयंती पर्वम्हणून ओळखला जातो. या जयंती पर्वातला महत्त्वाचा दुवा असलेले साहित्यिक नलिनीधर भट्टाचार्य शुक्रवारी वयाच्या ९५व्या वर्षी निवर्तले.

नलिनीधर आणि त्यांचे धाकटे बंधू बीरेन्द्रकुमार हे दोघेही साहित्यिक. नलिनीधर यांनी काव्य आणि समीक्षा यांची वाट धरली, तर बीरेन्द्रकुमार (जन्म १९२४ – मृत्यू १९९७) कादंबऱ्या आदी ललितगद्याच्या वाटेने जाऊन १९७९ मध्ये, आसामातील पहिले ‘ज्ञानपीठ’ मानकरी ठरले. या बीरेन्द्रकुमारांना साहित्याची गोडी लावण्याचे काम नलिनीधरांनी केले होते. ‘जोनाकी’ नावाच्या नियतकालिकात त्यांच्या तरुणपणी रोमँटिक काव्याचा अखंड झरा वाहत असताना, नलिनीधर मात्र आधुनिक असमिया कवितेच्या प्रणेत्यांपैकी एक ठरले. असमिया साहित्याचे अध्यापनकार्य करून, १९८३ साली ते निवृत्त झाले. त्यांचा पहिला काव्यसंग्रह (‘एइ कुंवोलिते’) मात्र जरा उशिराच- १९७९ साली प्रकाशित झाला. अन्य कवितासंग्रह- ‘आहोतो सपुन’ तसेच ‘सेरसलीर मालिता’ (१९८३), ‘बिदाई फुलोर दिन’ (२००१), ‘दिनबर होलोनि होहोल’ (२००३) अशा क्रमाने निघत असतानाच विविध नियतकालिकांत, क्वचित वृत्तपत्रांतही नलिनीधर यांचे साहित्यविषयक लेखन प्रकाशित होत होते.  त्यांच्या साहित्यिक निबंधवजा ललितेतर गद्यलेखनाची पाच पुस्तके निघाली, त्यापैकी ‘महद ओइतिज्ज’ या लेखसंग्रहाला २००२ साली ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला. हे पुस्तक परंपरा आणि नवतेचा वेध घेणारे होते. ‘कबिता अरु नेपथ्य’ या पुस्तकात सामाजिक/ राजकीय काव्याची सखोल चर्चा आहे, तर ‘कबितार कथा’ या संग्रहात समकालीन कवींवरील लेखही आहेत. आसामची लोकधाटी, लोकसाहित्य यांचा संबंध आधुनिक स्थितिगतीशी जोडणारे साहित्यकार लक्ष्मीनाथ बेजबरुआ यांच्यावरील प्रबंधवजा ‘बेजबरुआ अरु आधुनिकतर धारणा’ या नलिनीधर यांच्या पुस्तकातून, त्यांची देशीवादी व समाजवादी भूमिका दिसते. आसामात जेव्हा अस्मितावादी अतिरेकाची विषवल्ली रुजली नव्हती, तो काळ नलिनीधर जगले. ती मूल्ये त्यांनी पुढल्या अस्वस्थ काळातही जोपासली. उतारवयात कवितालेखन मंदावले, पण अगदी २०१६च्या निवडणुकीत भाजपविरोधी ठाम भूमिका घेणारे साहित्यिक म्हणून त्यांनी टीका झेलली होती. त्यांच्याविषयीची ती राजकीय नाराजी तात्कालिक होती आणि ते आसामचा अभिमानबिंदूच होते, हे सरकारी इतमामाने झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्कारांतून दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 2:09 am

Web Title: eminent assamese poet nalinidhar bhattacharya
Next Stories
1 जो सटर
2 अनुराधा राव
3 जीन वाइल्डर
Just Now!
X