शोले, खेल खेल में, नृत्य बिन बिजली जल बिन मछली.. या चित्रपटांतील संगीत आपल्याला आठवत असेल, तर एनिओ मॉरिकोन ‘आपले’च असतात! वास्तविक ते इटलीत रोमच्या मध्यमवर्गीय वस्तीत १९२८ साली जन्मले. वडील ट्रम्पेटवादक होते म्हणून हेही वादक झाले. दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात रस्त्यावर वडिलांसह वाद्ये वाजवून पैसे कमावण्याखेरीज गत्यंतर नव्हते तेव्हा त्यांच्यात संगीतकार होण्याची ईर्षां जागृत झाली आणि पुढे दोघा संगीतकारांकडे शिकून, एनिओ मॉरिकोन हे खरोखरच संगीतकार झाले. हॉलीवूडमध्ये गाजलेल्या अनेक ‘स्पॅगेटी वेस्टर्न’ चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.. मग ‘एनिओ मॉरिकोन यांचे निधन’ या ६ जुलैच्या बातमीशी आपला काय संबंध?

द गुड, द बॅड अ‍ॅण्ड द अग्ली, अ फिस्टफुल ऑफ डॉलर्स, फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर, एग्झॉर्सिस्ट (भाग दुसरा) द अनटचेबल्स, किल बिल हे अमेरिकी चित्रपट भारतात आले, गाजले. त्यातील संगीत एनिओ मॉरिकोन यांचे होते. पण १९६० पासून, वर्षांला सरासरी तीन अशा प्रमाणात तब्बल ५०० चित्रपटांमध्ये त्यांच्या संगीतरचनांचा वापर होता. दोन ते तीन मिनिटे चालणारे, शब्दांविना दृश्यपटांना जिवंत करणारे पार्श्वसंगीताचे तुकडे हे (गाणी तुलनेने कमी असलेल्या) एकंदर पाश्चात्त्य चित्रपटांचे वैशिष्टय़च. या पार्श्वसंगीतासाठी एनिओ यांच्या अनेक रचना वापरल्या गेल्या.

या सर्व रचनांत, पाश्चात्त्य अभिजात (वेस्टर्न क्लासिकल) संगीताचे नियम कुठे पाळायचे आणि कुठे- किती मोडायचे याविषयीचे पक्के भान एनिओ यांना होते. उदाहरणार्थ, लांडग्याच्या हाळीसारख्या आवाजाने ‘द गुड, द बॅड अ‍ॅण्ड द अग्ली’चा मध्यवर्ती संगीतकल्प सुरू होतो. ठेका विरत जातो, इलेक्ट्रिक गिटारचे कर्कश वाटणारे सूर येतात आणि काऊबॉयची बेदरकार शीळ सुरू होते, गिटार सुसह्य़ वाजू लागते तोच पुन्हा टिपेचे सूर लागून घोडय़ाच्या वेगाने ठेका पुढे जातो.. पण याच चित्रपटातील सूर्यास्ताच्या दृश्यात, जणू पियानोची शिस्त पाळूनच गिटार वाजते! चित्रपट दृश्याची नाटय़मयता वाढवण्यासाठी वाद्यांखेरीज इतरही आवाज (उदा.- उतारावरून घरंगळणारा टिनचा डबा) आणि वाद्यमेळात धक्कातंत्र वापरण्यात त्यांचा हातखंडा होता. अभिजात संगीताचा आधार घेत सुरुवात करणाऱ्या एनिओ यांच्या ‘गॅब्रिएल्स ओबू’ किंवा ‘चि माइ’ यांसारख्या रचना अभिजात म्हणून सादर होतात! पाचदा ऑस्करच्या यादीत नाव, पैकी एकदाच (२०१६, द हेटफुल एट) पुरस्कार; पण त्याआधीच (२००७) सत्यजित रायना १९९२ मध्ये मिळाले होते तसे ‘सन्माननीय ऑस्कर’, तीनदा ग्रॅमी.. अशी मोहोर त्यांच्या कीर्तीवर उमटली. पण शोलेत गब्बरच्या ‘एंट्री’च्या, नृत्य बिन बिजलीतील ‘तारों मे सजके’ किंवा खेल खेल में मधल्या ‘सपना मेरा टूट गया’च्या संगीताला प्रेरणा देऊन, ‘ऊर्जा, काळ आणि अवकाश’ ही- वाद्यांच्या पलीकडे जाणारी- संगीताची त्यांनीच केलेली व्याख्या तंतोतंत खरी ठरली. एकप्रकारे, संगीतानेच त्यांचे ‘आपले’पण सिद्ध केले!