20 January 2018

News Flash

युनिस डिसूझा

युनिस डिसूझा यांच्या निधनाने साहित्यातील खळाळता प्रवाह थांबला आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 31, 2017 1:33 AM

युनिस डिसूझा

विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका, कवयित्री, कादंबरीकार, स्तंभलेखक त्याचबरोबर एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील इंग्रजी साहित्यावर छाप पाडणाऱ्या लेखिका अशी त्यांची ओळख. विद्यार्थ्यांच्या काही पिढय़ा व तरुण कवी-कवयित्रींच्या प्रेरणास्थान असलेल्या युनिस डिसूझा यांच्या निधनाने साहित्यातील खळाळता प्रवाह थांबला आहे. त्यांनी विद्यार्थी व लेखकांच्या पिढय़ा घडवल्या.

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये इंग्रजी विभागाच्या प्रमुख असताना अनेक प्राध्यापकांच्या त्या प्रेरणास्थान ठरल्या. ‘इथाका’ या नाटय़ व साहित्य चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता. मुंबई विद्यापीठातही त्यांनी अध्यापन केले. १९७९ मध्ये त्यांचा ‘फिक्स’ हा पहिला काव्यसंग्रह आला. तेव्हापासून ‘लर्न फ्रॉम द अलमंड लीफ’पर्यंतचा त्यांचा साहित्यप्रवास पाहताना त्यांनी उलगडलेले अनुभवविश्व आपल्याही डोळ्यासमोरून सरकू लागते. ‘डेंजरलोक’ (२००१) व ‘देव अ‍ॅण्ड सिमरन’ (२००३) या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या लेखनातून त्यांनी बांद्रा इंग्लिश वापरले व त्याचे स्वागतच झाले. साहित्य संपादन व संकलनातही त्यांचे काम मोठे होते. त्यांनी ‘नाइन इंडियन पोएट्स’, ‘१०१ फोकटेल्स फ्रॉम इंडिया’, ‘विमेन व्हॉइसेस- सिलेक्शन्स फ्रॉम नाइनटिन्थ अ‍ॅण्ड अर्ली ट्वेंटिथ सेंच्युरी इंडियन रायटिंग इन इंग्लिश’, ‘अर्ली इंडियन पोएट्री इन इंग्लिश’, अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचा जन्म पुण्यात  १९४० मध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी विस्कॉन्सिनच्या माक्र्वेट विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. समाजात महिलांना सोसावी लागणारी दडपशाही, मुंबईतील गोवन कॅथॉलिक समाज अशा विषयांवर त्यांनी लेखन केले, ते सडेतोड असेच होते. त्यांनी मुलांसाठीही चार पुस्तके लिहिली. ‘फिक्स’, ‘विमेन इन डच पेंटिंग’, ‘वेज ऑफ बिलाँगिंग’, ‘सिलेक्टेड अ‍ॅण्ड न्यू पोएम्स’ हे त्यांचे कवितासंग्रह. ‘कॉन्व्हर्सेशन विथ इंडियन पोएट’ हे संकलित पुस्तकही त्यांनी लिहिले.  त्यांना पुस्तके, चित्रपट यांचे खूप प्रेम होते. साहित्यातील आधुनिकतावादावर दिलेल्या व्याख्यानातून त्यांनी जी मांडणी केली ती नवीन होती.  त्यांच्या मते कविता ही शब्दांची कलाकुसर असते, त्यात लेखन, पुनर्लेखन, प्रत्येक शब्द व ओळीचा विचारपूर्वक वापर हे महत्त्वाचे. त्यांच्या कवितांतून जी प्रतिमासृष्टी दिसते ती अलौकिक अशीच होती. प्राध्यापक म्हणून त्या जेव्हा शिकवीत असत तेव्हा वर्गातील प्रत्येक विद्यार्थी अंतर्बाह्य़ हलून जात असे. एका सुरक्षित क्षितिजापलीकडे विचार करण्याची सवय त्यांनी मुलांना लावली.

लॉर्ड बायरन, जॉन कीट्स, सॅम्युअल टेलर कोलरिज, लॉर्ड टेनिसन, सिगफ्राइड ससून, विल्फ्रेड ओवेन यांच्या कविता त्यांनी समरसून शिकवल्या. त्यांच्यासारख्या उमद्या व्यक्तिमत्त्वालाही जीवनात नैराश्याने गाठले होते; त्याचा सामना कसा केला ते त्या सांगत असत. त्यांना प्राण्यांबद्दल प्रेम होते. त्यांच्या घरात शिरलेल्या दोन भटक्या कुत्र्यांना त्यांनी आश्रय दिला तो कायमचाच. त्यांचा लाडका एक पोपटही आहे. आजूबाजूच्या समाजाशीही त्यांचे जवळिकीचे नाते होते. मला आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोक जास्त चांगले समजू शकतात असे त्या सांगत असत. यातून त्या हस्तिदंती मनोऱ्यातील लेखिका नव्हत्या, तर जीवनातील प्रत्येक वास्तवाला भिडणाऱ्या, दांभिकतेवर कोरडे ओढणाऱ्या वास्तववादी लेखिका होत्या हेच दिसते.

First Published on July 31, 2017 1:33 am

Web Title: eunice de souza profile
टॅग Eunice De Souza
  1. No Comments.