इव्हा आणि मिरियम. रोमानियातील मोझेस कुटुंबातल्या या दोघींचा जन्म ३१ जानेवारी १९३४चा. जुळ्या बहिणी म्हणून त्यांनी पाचवा वाढदिवस साजरा केला, तोवर नाझींचा ज्यूविरोधी प्रचार टिपेला पोहोचला होता आणि दहाव्या वाढदिवसापूर्वीच या दोघी, त्यांच्या दोन मोठय़ा बहिणी आणि या चौघींचे आईवडील असे सहाही जणांचे कुटुंब ऑशविट्झच्या छळछावणीत डांबले गेले होते. ‘सुधारणा छावणी’ असे नाव असलेल्या या छावणीत जे इतरांचे होई तेच या कुटुंबातील बाकीच्या चौघांचे झाले- ‘गॅस चेम्बर’मध्ये घुसमटवून मरण.. त्यातून इव्हा आणि मिरियम वाचल्या, कारण त्या जुळ्या! ‘मृत्युदूत’ असे पुढे ज्याचे वर्णन झाले, त्या डॉ. जोसेफ मेंगेल याला जुळ्यांवर प्रयोग करायचे होते, म्हणून त्या जिवंत राहिल्या. इव्हा पुढेही जगल्या, अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील टेरे हॉटे या छोटेखानी शहरात त्यांनी ‘कॅण्डल्स’ (चिल्ड्रन ऑफ ऑशविट्झ नाझी डेडली लॅब एक्स्पेरिमेंट्स सव्‍‌र्हायव्हर्स) ही संस्था आणि छोटेखानी संग्रहालय उभारले, तसेच ‘मृत्युदूत’ मेंगेलच्या सहकारी डॉक्टरांकडून ‘आम्ही गॅस चेम्बरमध्ये माणसांना मारत होतो’ असे माफीपत्रही मिळवले. या इव्हा कॉर गेल्या आठवडय़ात, ४ जुलै रोजी निवर्तल्या.

निव्वळ जुळ्या बहिणींपैकी एक, म्हणूनच योगायोगाने त्या नाझींपासून बचावल्या खऱ्या, पण आठवडय़ातून तीन दिवस प्रखर प्रकाशात सहा ते आठ तास विवस्त्र बसून राहणे, एका दंडातून रक्त देणे, दुसऱ्या दंडास नाझी डॉक्टरांनी ठरवलेल्या रसायनांची इंजेक्शने टोचून घेणे.. असा छळच दहा वर्षांच्या या लहानग्या बहिणींना सहन करावा लागला. अखेर १९४५च्या जानेवारीत सोव्हिएत सैन्याने ऑशविट्झमधून अनेक जुळ्या भावंडांची सुटका केली. इव्हा आणि मिरियम पुढे इस्रायलमध्ये गेल्या. इव्हा इस्रायली सैन्यात आठ वर्षे होत्या. तेथेच त्यांना जन्माचा जोडीदार भेटला. मिरियम इस्रायलमध्येच राहिल्या, पण इव्हा आणि त्यांचे पती अमेरिकेत आले.. इंग्रजी अजिबात बोलता येत नव्हते, तरीही स्थलांतरित झाले! यथावकाश अमेरिकनच झाले. ‘आपल्या भूमी’तून, तेही सैन्यातल्यासारखी नोकरी सोडून इव्हा इथे का आल्या असाव्यात, याचे एक संभाव्य कारण त्यांच्या पुढल्या कार्यातून समजून घेता येते.

ते असे की, ‘सर्व नाझींना, त्यांच्या समर्थकांना मी क्षमा करीत आहे. झाले ते झाले. क्षमाशील असल्याखेरीज शांततेकडे जाता येणार नाही, हे मला पटले आहे’ असे इव्हा यांनी जाहीर केले! या कृतीतून त्यांचे उत्तुंगपण दिसून आले. सन २००३ मध्ये त्यांचे संग्रहालय समाजकंटकांनी जाळले, ते दोन वर्षांत पुन्हा उभे करतानाही हीच क्षमाशीलता इव्हा यांनी बाळगली होती, ती आता निमाली.