News Flash

विद्या सिन्हा

चित्रपटाचे वातावरण घरातच असूनही विद्या यांनी अभिनयाऐवजी मॉडेलिंगचे क्षेत्र निवडले होते.

विद्या सिन्हा

हिंदी चित्रपटाच्या नायिकेने तंग कपडे घालावेत, नायकासह झाडांमागे लपाछपी खेळत गाणी म्हणावीत, एखाद्या तरी प्रसंगात बुद्धीच नसल्यासारखं वागावं.. या अपेक्षा १९७० मध्ये जवळपास ठाम झाल्या असताना ती साडी नेसून आली, नायकाबरोबर बागेत गेली, पण पळापळी खेळली नाही.. उलट, आपला जोडीदार हा ‘नायक’ असावा की आपला विश्वासार्ह मित्रच जोडीदार म्हणून निवडावा, याचा विचार तिने केला.. या कथानकाचे श्रेय बासू चटर्जीचे होतेच, पण विद्या सिन्हासारखी नायिका हे निभावू शकली! अमोल पालेकर आणि दिनेश ठाकूर या मराठी/ हिंदी रंगमंचावरील दोघा कसलेल्या अभिनेत्यांसमोर विद्या सिन्हा यांचे अभिनयगुणही कसाला लावणारा हा चित्रपट होता ‘रजनीगंधा’..

विद्या सिन्हा यांचा १९७४ सालचा हा चित्रपट आणि त्यानंतर पुढल्याच वर्षी आलेला ‘छोटीसी बात’ हे चित्रपट ज्यांनी पाहिले असतील, ज्यांना लक्षात राहिले असतील, त्यांनी या अभिनेत्रीला मनोमन शंभर गुन्हे माफ केले असतील! पुढे तशा माफींची वेळही विद्या सिन्हा यांची भूमिका असलेल्या काही चित्रपटांनी आणली, पण ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या आवारात एके काळी असलेल्या ‘समोवार’ कॅफेमध्ये समोरासमोर बसून नायक आणि नायिका अगदी मोजकेच संभाषण करताहेत यासारखे ‘छोटीसी बात’मध्ये दोनतीनदा घडणारे दृश्य ज्यांच्या लक्षात असेल, त्यांना विद्या सिन्हा यांचा उल्लेख ‘अभिनेत्री’ असाच झालेला आवडेल!

वयाच्या ७१ व्या वर्षी, आजारपण आणि रुग्णालयातील मुक्कामानंतर विद्या सिन्हा यांचे निधन झाल्याची बातमी ऐन स्वातंत्र्यदिनी आली, तेव्हा हे सारेच चाहते हळहळले असतील. विद्या यांचा जन्म नोव्हेंबर १९४७ चा. म्हणजे वयाने तिशीच्या आसपास असताना त्यांना नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. पण त्यांनी जानदारपणे रंगवलेल्या नायिका या कधी अल्लड नव्हत्याच, उलट समंजस आणि विचारी होत्या. ‘पती, पत्नी और वो’पर्यंत त्यांच्या अभिनयातून ही प्रतिमा उतरत्या क्रमाने कायम राहिली, पण पुढे बदलत गेली. तोवर- म्हणजे १९७८ नंतर- त्यांना चित्रपटही कमी मिळू लागले होते. ‘सफेद झूठ’, ‘मगरूर’, ‘मीरा’, ‘स्वयंवर’.. हे चित्रपटच आज कुणाला आठवत नसल्याने त्यांतील विद्या सिन्हा यांची भूमिका आठवण्याचाही प्रश्नच उरत नाही. ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटात पोक्त स्त्रीच्या भूमिकेत त्या दिसल्या.. त्यानंतर काही चित्रवाणी मालिकांतही त्यांनी पोक्त भूमिकाच केल्या.

दिसणे बंगाली रूपवतींसारखे असले, तरी त्या मुंबईकरच. ‘सिन्हा’ हे नाव त्यांच्या आईच्या माहेरचे, तर वडिलांचे नाव राणा प्रताप सिंह ऊर्फ ‘प्रताप ए. राणा’. वडीलही तरुणपणी अभिनेते होते आणि आईचे वडील दिग्दर्शक. चित्रपटाचे वातावरण घरातच असूनही विद्या यांनी अभिनयाऐवजी मॉडेलिंगचे क्षेत्र निवडले होते. ‘मिस बॉम्बे’ हा किताबही एका सौंदर्यस्पर्धेत मिळवला होता. १९६८ साली विवाहानंतर, संसार मोडल्यानंतर त्या चित्रपटसृष्टीत आल्या आणि दुसरा विवाह त्यांनी २००१ साली केला, तोही अयशस्वी ठरला. दोन महत्त्वाच्या चित्रपटांतून विचारी, संवेदनशील स्त्रीची संयत प्रतिमा साकारणे, हे त्यांचे खरे लक्षात राहण्याजोगे काम!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 4:35 am

Web Title: facts about veteran actress vidya sinha zws 70
Next Stories
1 शमनद बशीर
2 चंद्रिमा साहा
3 कमाल बोलाता
Just Now!
X