News Flash

फहमिदा रियाझ

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न अनेकदा झाले व पुढेही होत राहतील.

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न अनेकदा झाले व पुढेही होत राहतील. याच्या जोडीला फैज अहमद फैज, अहमद फराज, कैफी आजमी, जोगिंदर पॉल, गोपीचंद नारंग, बशीर बद्र आदी उभय देशांतील नामवंत साहित्यिक व कवींनीही दोन्ही देशांतील कटुता दूर व्हावी यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले. याच मांदियाळीतील होत्या फहमिदा रियाझ!

उत्तर प्रदेशातील मेरठ हे त्यांच्या वडिलांचे मूळ गाव असले तरी फाळणीच्या अगोदरच ते लाहोर येथे गेले. तेथेच १९४६ साली फहमिदा यांचा जन्म झाला. उर्दू, सिन्धी आणि फारसी भाषांवर प्रभुत्व असलेल्या फहमिदा यांचा ‘पत्थर की जुबान’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला तेव्हा त्या फक्त एकवीस वर्षांच्या होत्या. या काव्यसंग्रहाने त्या चर्चित बनल्या. ‘बदन दरीदा’ हा दुसरा काव्यसंग्रह १९७१ साली आला आणि त्याने पाकिस्तानच्या साहित्यवर्तुळात काहूर माजवले. यातील अनेक कविता अश्लील असून महिलांनी अशा विषयावर लिहिणे आक्षेपार्ह असल्याची टीका त्यांच्यावर झाली. विरोध आणि टीकेला न जुमानता त्यांची लेखणी पुढेही तळपतच राहिली. ‘धूप’, ‘पूरा चाँद’, ‘आदमी की जिंदगी’ असे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित होत राहिले आणि ते वाचलेही गेले. फहमिदा या पुरोगामी विचारांच्या असल्याने त्यांच्या कवितांमधून आणि विचारांतूनही विद्रोह आणि बंडाची झलक जाणवत असे. पाकिस्तानातील धर्माधता आणि दहशतवादाविरोधात त्या नेहमी आवाज उठवायच्या.

पाकिस्तानी असूनही भारताने मात्र पाकिस्तानसारखे बनू नये अशीच त्यांची इच्छा होती. ‘तुम हम जैसेही निकले’ ही त्यांची कविता भारतातही लोकप्रिय झाली. भारताशीच संवाद साधताना त्या लिहितात : तुम बिल्कुल हम जैसे निकले, अब तक कहाँ छुपे थे भाई? वो मूरखता, वो घामडम्पन, जिस में हमने सदी गँवाई, आखिर पहुंची द्वार तुम्हारे, अरे बधाई, बहुत बधाई..

कुणाचीही भीडभाड न ठेवता अत्यंत सडेतोड लिखाण केल्यामुळे तेथील कट्टरवाद्यांनी न्यायालयात त्यांच्यावर अनेक खटले गुदरले. रोखठोख लिखाणामुळे जनरल झिया उल हक यांच्या काळात तर त्यांच्यावर देश सोडून जाण्याची वेळ आली. विख्यात लेखिका अमृता प्रीतम यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मग अमृता प्रीतम यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन फहमिदा यांना भारतात आश्रय देण्याची विनंती केली. इंदिरा गांधी यांनी ती मान्यही केली. सुमारे सात वर्षे फहमिदा दिल्लीत जामिया विद्यापीठात वास्तव्यास होत्या. या काळात त्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास केला.

झिया यांची राजवट संपल्यानंतर त्या परत पाकिस्तानात गेल्या. बेनझीर भुत्तो यांच्या कार्यकाळात त्यांना सांस्कृतिक खात्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. २००९ मध्ये त्यांना कराची येथील उर्दू डिक्शनरी बोर्डाचे संपादक म्हणून नियुक्त करण्यात आले. या काळात त्यांनी लिखाण थांबवले नव्हते. ‘जिंदा बहार’, ‘गोदावरी’, ‘कराची’ यांसारख्या कादंबऱ्यांनी उर्दू साहित्यात त्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. पाकिस्तानात मानवाधिकाराचे उल्लंघन मोठय़ा प्रमाणावर होऊ लागल्याने मानवाधिकार कार्यकर्त्यां बनून त्याविरोधात त्यांनी सदैव लढा दिला. या बंडखोर व पुरोगामी लेखिकेच्या निधनाने उर्दू साहित्य समृद्ध करणारे मानाचे पान गळाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 12:06 am

Web Title: fahmida riaz
Next Stories
1 अजयभूषण पांडे
2 अलेक्झांडर झ्वेरेव
3 प्रमोदचंद्र भट्टाचार्य
Just Now!
X