उसके घर में आज चूल्हा नहीं जला

चूल्हे में आज घर जल रहा था।

अशा साध्याच, पण नाटय़पूर्ण ओळींतून १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलीतील एका स्त्रीच्या दु:खाला काव्यरूप देणाऱ्या अर्चना वर्मा, आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत लिहीत होत्या. हिन्दी साहित्य-पत्रिकांचे तर त्यांनी संपादनही केले होते; पण फेसबुकसारखे समाजमाध्यमही त्या लिखाणासाठी, जबाबदारीनेच हाताळत होत्या. १४ फेब्रुवारीच्या दोन नोंदीनंतर त्यांना रुग्णालयात न्यावे लागेल. श्वसनयंत्रणेच्या दुखण्यावर उपचार सुरू असतानाच अखेर, १६ फेब्रुवारीस त्यांची निधनवार्ता आली. समीक्षा आणि कविता यांच्याशी घट्ट नाते असणाऱ्या आणि दिल्ली विद्यापीठात हिन्दी शिकविणाऱ्या या लेखिकेने समकालीन विषय हाताळताना संपादक म्हणून असलेल्या कौशल्याचेही दर्शन घडविले. मोठय़ा, केंद्रीय पुरस्कारांनी त्यांना हुलकावणीच दिली असली तरी, त्यांची साहित्यसेवा तेवढय़ाने हिरमोड होण्याइतकी लेचीपेची नव्हती.

सामर्थ्यांचे, शक्तीचे साक्षात्कार स्त्रीवादी विचारधारेने अनेकींमध्ये घडविले. त्यांपैकी एक अर्चना वर्मा. १९४६ सालच्या ६ एप्रिल रोजी इलाहाबादमध्ये जन्म, तिथेच प्राथमिक शिक्षण आणि लग्नाआधीपासून ते अखेपर्यंत दिल्लीत वास्तव्य. ऐन तिशीत स्त्रीवादी विचारधारेचा प्रवाह अर्चना यांना सामोरा आला. पण म्हणून त्यात वाहावत जायचे नाही, व्यक्तित्वाची आंतरिक शक्ती सर्वाकडेच असते ती जपायची, ही समज त्यांच्याकडे होती. प्रेमचंदांच्या समतावादाने ही समज दिली असावी. प्रेमचंद, निराला, आदींची अभ्यासपूर्ण समीक्षा करतानाच अर्चना यांनी सामाजिक आशयाच्या कथा लिहिल्या, व्यक्तिगत हुंकारांचे सत्त्व शोधणाऱ्या कविता केल्या. ‘कुछ दूर तक’( १९८१) आणि ‘लौटा है विजेता’ (१९९३) हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आणि ‘स्थगित, राजपाट तथा अन्य कहानियां’ हा कथासंग्रहदेखील. पण ‘हंस’ या साहित्य-पत्रिकेच्या संपादनात १९८६ ते २००८ अशी २२ वर्षे सहभाग आणि पुढे ‘कथादेश’ या पत्रिकेच्या संपादनात सहभाग, हीदेखील त्यांची साहित्यसेवाच होती. या संपादनकार्यातून, वाचकाच्या प्रतिसादांचा अचूक ठाव त्यांना घेता आला. समकालीन विषयांवर टिप्पणीवजा लिखाण त्या करू लागल्या. ‘तहलका’चे तरुण तेजपाल यांच्यावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी गोव्यात झालेले आरोप किंवा अगदी अलीकडेच शबरीमला निकालाच्या अंमलबजावणीस विरोधामुळे उद्भवलेला वाद, यांवर लिहिताना स्त्रीवाद आणि संस्कृतीची संकल्पना यांतील अंतर्विरोधही त्यांनी जाणकारीने हाताळला. त्यांच्या निधनाने, हिंदी साहित्यातील एक समंजस आवाज लोपला आहे.