मानवासह निसर्गाप्रतिची संवेदनशीलता ज्यांच्या कवितांमधून प्रत्ययाला येते; पण तेवढय़ा भावाभिव्यक्तीपुरते मर्यादित न राहता, पर्यावरण संवर्धनासाठी, स्त्रियांच्या हक्कांसाठी गेली पाच दशके कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ मल्याळी कवयित्री सुगथाकुमारी यांची निधनवार्ता बुधवारी आली. गांधीवादी स्वातंत्र्यसेनानी, लेखक बोधेश्वरन आणि संस्कृतच्या सुप्रसिद्ध शिक्षिका कार्तियायिनी अम्मा यांच्या पोटी १९३४ साली सुगथाकुमारी यांचा जन्म झाला. घरातून त्यांना साहित्याचा समृद्ध वारसा मिळाला. १९५५ मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आणि काही काळ त्याच विषयात संशोधनही केले. याच काळात ‘श्रीकुमार’ या टोपणनावाने त्यांनी लिखाणास प्रारंभ केला. त्यानंतर १९६१ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘मुथुचिप्पी’ या कवितासंग्रहामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. आजवरच्या सहा दशकांच्या साहित्यिक कारकीर्दीत ‘पावम पावम मानव हृदयम’, ‘पथिरापूक्कल’, ‘कृष्णकविथाकल’, ‘अंबालमणी’, ‘राधायेवीडे’ अशा कवितासंग्रहांसह त्यांचे १५ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यात भवतालच्या जगण्याविषयीची ओतप्रोत संवेदनशीलता आणि त्यास तात्त्विक बैठकीची जोड, हे त्यांच्या कवितांचे गुणलक्षण. निसर्गाच्या विविध रूपांबरोबरच, मानवी लालसेपोटी केली जाणारी निसर्गहानी आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास याविषयी त्यांच्या कविता शहाणीव देणाऱ्या आहेत. बालसाहित्यातही त्यांनी आपला ठसा उमटवला.

पर्यावरण संवर्धनासाठी त्या आंदोलनांतही सहभागी झाल्या. ऐंशीच्या दशकात पश्चिम घाटातील ‘सायलेंट व्हॅली’मध्ये उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलनात त्या सक्रिय होत्या. त्यांनी तेव्हा लिहिलेली ‘मराथिनू स्तुती’ ही कविता जणू आंदोलनाला गती देणारे ‘प्रेरणाकाव्य’च ठरली. निसर्गरक्षणाचा आग्रह धरणाऱ्या ‘प्रगती संरक्षण समिती’च्या त्या संस्थापक सचिव होत्या. वनीकरणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. सुगथाकुमारी यांचे हे सक्रिय कार्यकर्तेपण त्यांच्या प्रकृतीच्या कुरबुरींनी डोके वर काढेपर्यंत अखंड सुरू होते. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, बलात्कारपीडित, व्यसनाधीनता आणि घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी त्यांनी ‘अभया’ ही संस्था सुरू केली. केरळमधील राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्या अध्यक्ष होत्या. त्या वेळी महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी सुरू केलेली ‘कुटुंबश्री’ ही योजना अतिशय उपयुक्त आणि यशस्वी ठरली होती. त्यांच्या या कार्यामुळेच २००६ मध्ये ‘पद्मश्री’, तर २०१३ मध्ये ‘सरस्वती सन्मान’ देऊन सुगथाकुमारी यांना गौरवण्यात आले. केरळ साहित्य अकादमी पुरस्कारासह केरळमधील बहुतेक सर्व प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार त्यांना मिळाले. तसेच पर्यावरण संवर्धन आणि वनीकरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरिता भारत सरकारचा भाटिया पुरस्कारही त्यांना देण्यात आला.

अशा प्रकारे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मल्याळी साहित्य क्षेत्र आणि पर्यावरण-स्त्री हक्क चळवळीत कार्यरत असणाऱ्या सुगथाकुमारी यांच्या निधनाने शहाणिवेची आणखी एक ज्योत निमाली.