‘चित्रपट-सिद्धान्त’ किंवा ‘चित्रपटअभ्यास’ वगैरे कुणी म्हटल्यावर काही तरी जडजंबाल, अगम्य आणि अभ्यासकी बोलले/ लिहिले जाणार आणि सामान्यांना ते कंटाळवाणेच वाटणार, अशी खूणगाठ पक्की असते. पण ‘‘भारतीय चित्रपट पाहणे, अभ्यासणे म्हणजे भावनांच्या गुंफेत जाऊन तेथील चित्रे पाहणे’’ अशी स्पष्ट भूमिका घेणारे फादर गस्टन रॉबर्ज यापेक्षा निराळे होते. ‘भारतीय चित्रपट सिद्धान्ता’त त्यांनी मोलाची भर घातली. हे सत्य त्यांच्या हयातीत मान्य झाले, तसेच त्यांची निधनवार्ता २८ ऑगस्टला आल्यानंतर अनेकांनी आदरांजली-लेखांतूनही तेच सांगितले.

डॉक्टर श्रीराम लागू यांचा डॉक्टरी पेशाशी जितका संबंध होता, तितकाच ‘फादर’ रॉबर्ज यांचा ख्रिस्ती धर्मप्रसाराशी. लहानपणापासून भारताचे आकर्षण असणाऱ्या, किशोरवयात ‘गीतांजली’ वाचलेल्या गस्टन यांनी कॅनडात ख्रिस्तीधर्मीय शिक्षण घेतल्यामुळे मिळालेली ती पदवी. तिचा वापर त्यांनी भारतात येण्यासाठी केला आणि तेच म्हणत त्याप्रमाणे, ‘मी १९३५ साली माँट्रियलमध्ये जन्मलो पण १९६१ला कोलकात्यात माझा पुनर्जन्म झाला!’ या ‘पुनर्जन्मा’आधीच सत्यजित राय यांची अपू-चित्रपटत्रयी त्यांनी पाहिली होती. चित्रपटांचा अभ्यास आणि सत्यजित यांच्याशी मैत्री कोलकाता येथील पहिल्या काही वर्षांत वाढली, मग राय यांच्या सूचनेनुसारच १९७१ मध्ये त्यांनी ‘चित्रबाणी’ हे भारतीय चित्रपट अभ्यास केंद्र सुरू केले. ‘फादर’ असल्याचा फायदा त्यांनी, सेंट झेवियर कॉलेजची जागा या केंद्रासाठी वापरण्यापुरता घेतला. इथे अनेक विद्यार्थी घडले. पुढे ‘बंगाली लोक त्यांच्या चित्रपटांबद्दल इंग्रजीत लिहितात-बोलतात म्हणून त्यांनाच मोठमोठी बक्षिसे मिळतात’ अशी जी एक अबोध तक्रार मराठीत ऐकू येत असे, तिचे खरे मूळ या ‘चित्रबाणी’ केंद्रात होते. केंद्राचे स्वरूप चर्चाना प्राधान्य देणारे आणि चित्रपट ही एक संवादभाषाच आहे, यावर विश्वास ठेवणारे. ‘डिजिटल’ माध्यम वाढू लागले, त्याआधीही लोकांहाती कॅमेरे देऊन त्यांना ही भाषा कशासाठी, कशी वापरावी वाटते, याचा शोध घेणारे! या शोधावर आधारलेली अनेक (एकंदर ३५) पुस्तके रॉबर्ज यांनी लिहिली. ‘२५ वर्षांत २५ उत्तम चित्रपटकार रॉबर्ज यांनी घडवले’ हे इतरांनी मान्य करावे, हेही त्यांचे कर्तृत्वच.

‘भावनांच्या गुहेतली चित्रे’ पाहताना महत्त्व कशाला द्यायचे, याचे भान मात्र रॉबर्ज यांनी राखले. सामाजिक- राजकीय-आर्थिक स्थितीपासून हिंदी, बंगाली वा अन्य भारतीय भाषांतील चित्रपट तुटलेले भासले तरी त्या वास्तवाचा दूरान्वयाने असलेला संबंध कसा शोधायचा, हे रॉबर्ज यांनी ‘शोले’सकट अनेक चित्रपटांच्या अभ्यासातून दाखवून दिले. हा अभ्यास कंटाळवाणा किंवा थातुरमातुर असता, तर विद्यार्थीही त्यांच्याकडे आले नसते आणि सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन ते गौतम घोष अशा अनेक चित्रपटकारांचे प्रेमही मिळाले नसते. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक के. जी. दास यांनी रॉबर्ज यांच्या हयातीतच, त्यांच्यावर ‘फा. गस्टन रॉबर्ज- अ मास्टर प्रीचर ऑफ फिल्म थिअरी’ हा ३९ मिनिटांचा लघुपट केला आहे. ‘द सब्जेक्ट ऑफ सिनेमा’ किंवा ‘अनदर सिनेमा फॉर अनदर सोसायटी’ ही त्यांची पुस्तके आजही वाचनीय ठरतात.