संगीतपटलावरील ताऱ्याचे आयुष्य फार थोडे असते. कारण त्या ताऱ्याला अल्पावधीत झाकोळून टाकणारी नवी शक्ती यंत्रणा तयार करते. फॅट्स डॉमिनो आणि त्यांचे रॉक एन रोल संगीतामधील योगदान पाहता नंतर आलेल्या शक्तींनी झाकोळून गेलेल्या मान्यवरांच्या पंगतीमध्ये त्यांना बसविता येऊ शकेल. म्हणजे गेल्या काही वर्षांत हा कृष्णवंशीय कलावंत जिवंत आहे की नाही, याबाबतही अनेकांना शंका होती. मागे एक तपापूर्वी अमेरिकेत कॅटरिना वादळ आले, तेव्हा त्या वादळातच त्यांच्या मृत्यूची वार्ता अनेकांनी देऊन टाकली होती. पण घरातून बाहेर न पडण्याचा निर्धार करीत डॉमिनो या वादळाशीही झुंजले. कारण त्यांच्याकडे शक्ती होती ती संगीतपेशींची. ज्या बळावर त्यांनी इतकी वर्षे सहज श्वास घेतला.

दुसऱ्या महायुद्ध काळात अमेरिकी समाजजीवनामध्ये जॅझ, रॉक आणि पॉप संगीत घेऊन आलेल्या कृष्णवंशीयांनी संगीत क्षेत्रावर मोठा पगडा पाडला. एका कामचलाऊ व्हायोलिनवादकाच्या आठ मुलांपैकी शेंडेफळ असलेल्या फॅट्स यांना संगीताचे बाळकडू  घरातच मिळाले. अमेरिकी मद्यालयांमध्ये  पियानोवादनाचा प्रवाह प्रचलित झालेल्या काळामध्ये त्यांनी अनेक बारमध्ये आपले पियानोवरील अंगुलीकौशल्य दाखवून दिले. तेथेच त्यांना बँडमध्ये समाविष्ट होण्याचे निमंत्रण मिळाले आणि त्या बँडद्वारे त्यांनी इतिहास घडविला. १९४९ साली ‘फॅट मॅन’ नावाचे गाणे त्यांनी रेकॉर्ड केले. रॉक एन रोलच्या इतिहासामध्ये या गाण्याने सर्वाधिक रेकॉर्ड्स (तबकडय़ा) विक्रीचा उच्चांक गाठला. हा काळ आहे अमेरिकी एलविस प्रेस्ले आणि ब्रिटिश बँड बीटल्स संगीतावर आणि एका पिढीवर छाप सोडण्याच्या प्रक्रियेपूर्वीचा.  एका पायपोस विकणाऱ्या कंपनीमध्ये दिवसभर काम करून फॅट्स डॉमिनो यांनी आपला चरितार्थ चालविला. रात्री अर्थातच जॅझ, रॉक क्लबमधून पियानोतील उमेदवारी करून त्यांनी न्यू ऑर्लिन्समधील काळ्या आणि गोऱ्या अशा दोन्ही समाजांत ख्याती मिळविली. पुढे पाऊल थिरकावणारे रॉक संगीत देणारी वादक-गायकांची आणि त्यांना मोठे करणाऱ्या चाहत्यांची पिढी तयार झाली असली, तरी त्याची मुहूर्तमेढ  फॅट्स डॉमिनो यांनी रोवली. एलविस प्रेस्ले याचा दबदबा साठ ते सत्तरच्या जगामध्ये सगळीकडे होता. त्यानेदेखील आपल्यावरील प्रभावांमध्ये डॉमिनो यांचे नाव अग्रभागी असल्याचे सांगितले. आजची नवी पत्रकारिता, वृत्तलेख किंवा कथालेख लिहिण्याची परंपरा १९६०च्या दशकात रुजली. कलाकारांना मोठे करणारी पेज थ्री वृत्तपत्रीय यंत्रणा या प्रेस्ले, फ्रँक सिनात्रा, मर्लिन ब्रॅण्डो आणि मेरेलिन मन्रो यांच्या काळात सुरू झाली. त्याआधी तितकेच लोकप्रिय असूनही डॉमिनो मात्र पिछाडीवरच राहिले. त्यांची १० हून अधिक सुपर-डय़ुपर हीट गाणी आता यूटय़ूबवरच पाहायला उरलीत. भारतातील किशोर कुमार यांचे यॉडलिंग आणि काही तिकडम गाण्यांवर डॉमिनो यांच्या पन्नासच्या दशकांतला पगडा दिसतो. आजचं जागतिक हीपहॉप आणि आर अ‍ॅण्ड बी (ऱ्हिदम अ‍ॅण्ड ब्लूज) रॅप, रॅगे या संगीतावर झाडून सारे कलावंत हे कृष्णवंशीय आहेत. त्यांची या क्षेत्रात अनभिषिक्त सत्ता आहे. डॉमिनोंच्या काळातील अमेरिका वेगळी होती. त्या काळात कृष्णवंशीयांचे स्टारपद डोळ्यांना आणि कानांना न पटणारे  होते. आत्यंतिक विजोड क्षेत्रातून संगीतामध्ये रॉकचा प्रवाह तयार करणाऱ्या डॉमिनो यांचे संगीतातील कार्य झाकोळले गेले असले, तरी या पटलापुरते खोडता येऊ शकत नाही. अगदी नुकत्याच झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतरही..