एकच संगणक त्यातील माहितीची सुरक्षितता राखून अनेक व्यक्ती वापरू शकतात याचे कारण प्रत्येक जण वेगळा पासवर्ड देऊन स्वत:ची माहिती सुरक्षित ठेवू शकतो. संगणक वापराला सुरक्षिततेचे अभयदान देणारी पासवर्ड ही संकल्पना ज्यांच्या संशोधनातून प्रत्यक्षात आली त्यापैकी एक म्हणजे फर्नाडो कोर्बाटो ऊर्फ ‘कोर्बी’. कोर्बाटो यांचे नुकतेच अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स येथे निधन झाले. डिजिटल सुरक्षा हा शब्दही जेव्हा माहिती नव्हता अशा काळात कोर्बाटो यांनी मांडलेली पासवर्डची संकल्पना काळाच्या पुढची होती. ओकलँड येथे जन्मलेले कोर्बाटो यांनी संगणक विज्ञानात पासवर्डच नव्हे तर इतर संशोधनाचीही भर टाकली. कॉम्प्युटर टाइम शेअरिंग सिस्टम (सीटीएसएस) ही जगातील पहिली ऑपरेटिंग सिस्टम विकसित करण्याचे श्रेय त्यांना जाते. एकाच वेळी संगणकावर अनेक  जणांना काम करण्याची सोय त्यांच्यामुळे निर्माण झाली. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये पासवर्डला विशेष महत्त्व होते. नंतर आलेल्या ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग, वर्ड प्रोसेसिंग या संकल्पनांची बीजे ही त्यांच्या पायाभूत संशोधनात होती हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़.

गूगलच्या गो प्रोग्रॅमिंग भाषेची संरचना तयार करणारे केन थॉमसन हे आधी कोर्बाटो यांच्या क्यूईडी टेक्स्ट एडिटर प्रकल्पात सहभागी होते. नंतरच्या काळात कोर्बाटोंनी मल्टीक्स ही प्रणाली शोधून काढली. त्यातूनच युनिक्सच्या संकल्पनेला प्रेरणा मिळाली. एमआयटी या संस्थेत संगणक विज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. आज तेथे सहाशे वैज्ञानिक काम करतात. कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिकलेल्या कोर्बाटो यांची कर्मभूमी म्हणजे एमआयटी. १९६० पासून तेथे त्यांनी बरेच संशोधन केले. संगणक विज्ञानातील प्रतिष्ठेचा अ‍ॅलन टय़ूरिंग पुरस्कार त्यांना १९९० मध्ये मिळाला होता. आजच्या काळात आपल्या जीवनाचे प्रत्येक अंग डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. त्यात व्यक्तिगत सुरक्षितता हा मुद्दा यापुढे आणखी महत्त्वाचा होत जाणार आहे. पासवर्ड म्हणून आता चेहऱ्याचाही वापर करता येतो. त्यामुळे पासवर्डचे तंत्र बदलत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगार तितक्याच वेगाने सुरक्षा भेदण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पासवर्ड तंत्रज्ञानात आता पुढची पायरी गाठण्याची वेळ आली आहे हे कोर्बाटो यांनीही अलीकडेच मान्य केले होते.

असे असले तरी ज्या काळात या संगणकीय सुरक्षेच्या कल्पनेचा मागमूसही नव्हता तेव्हा असे पायाभूत संशोधन करणाऱ्या कोर्बाटो यांचा उल्लेख डिजिटल सुरक्षेचे शिल्पकार असाच करावा लागेल.