25 October 2020

News Flash

जे. ओम प्रकाश

फाळणीनंतर थेट मुंबईत आलेल्या ओम प्रकाश यांनी निर्माता म्हणूनच सुरुवात केली

सत्तर -ऐंशीच्या दशकांत हिंदी चित्रपट एका अर्थी ‘सुपरस्टार्स’च्या प्रेमात पडले होते, तेव्हा सातत्याने पती-पत्नीतील नाते, त्यात संशयी- रागीट स्वभावामुळे येणारे अडथळे, विवाहबाह्य़ संबंध व यातून मोडून पडणारी- तरी तितक्याच खंबीरपणे उभी राहणारी नायिका दाखवण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही जे. ओम प्रकाश यांनी केले. मूल्ये आणि वास्तव यांची माफक सांगड आपल्या चित्रपटांतून घालण्याचा प्रयत्न करणारे ओम प्रकाश बुधवारी निवर्तले.

जे. ओम प्रकाश यांची चित्रपटसृष्टीशी गाठभेट झाली ती लाहोरमध्ये.. तिथेच चित्रपट वितरकांच्या कार्यालयात कारकून म्हणून काम करणारे ओम प्रकाश थोडय़ाच कालावधीत व्यवस्थापक पदावर पोहोचले होते. चित्रपटनिर्मितीशी ते या पद्धतीने जोडले गेले होते; त्यामुळे फाळणीनंतर थेट मुंबईत आलेल्या ओम प्रकाश यांनी निर्माता म्हणूनच सुरुवात केली, यात नवल नाही. ‘सिनेयुग’ या कंपनींतर्गत त्यांनी १९६१ साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती केली. वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला. पहिल्याच चित्रपटात मिळालेल्या या यशामुळे ‘सिनेयुग’ने सलग चित्रपटांची निर्मिती केली. ‘आयी मीलन की बेला’, ‘आए दिन बहार के’, ‘आया सावन झूमके’, ‘आँखो आँखो में’.. हे त्यांनी लागोपाठ निर्मिती केलेले सगळेच चित्रपट ‘हिट’ ठरले होते. त्या काळीही निर्माता-दिग्दर्शक किंवा दिग्दर्शक-कलाकार यांच्या जोडय़ा प्रसिद्ध होत्या. प्रेमक था, लोकप्रिय नायक-नायिका, श्रवणीय संगीत असा सगळाच सुरेख बाज त्यांच्या चित्रपटात असे. मात्र, दिग्दर्शक म्हणून ओम प्रकाश यांनी जे चित्रपट केले, ते या तथाकथित सुखान्त कथांच्या चौकटीपल्याडचे होते आणि ती त्यांची खरी ओळख आहे असे म्हणायला हवे.

सुरुवातीची दहा-बारा वर्षे चित्रपटनिर्मितीत घालवल्यावर १९७४ साली त्यांनी ‘आप की कसम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. एकमेकांसाठी जीव देणारे प्रेमी जोडपे, विवाहानंतर केवळ संशयापोटी त्यांच्या संसारात आलेले वितुष्ट आणि आपलाच सुखी संसार उधळून देणारा नायक अशी कथा असतानाही हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला. राजेश खन्ना आणि मुमताज यांचा हा चित्रपट आणि त्यातील गाजलेली जवळपास सगळीच गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘आप की कसम’, ‘आशा’ असोत वा त्यानंतर- म्हणजे १९८५ साली प्रदर्शित झालेला ‘आखिर क्यों?’ असो; या प्रत्येक चित्रपटाची नायिका एकीकडे सोशीक होती, मात्र वेळ आली तेव्हा तिने स्वाभिमान जपत आपले आयुष्य नव्याने पुढे नेले. खंबीर नायिकेची त्यांच्या मनात असलेली प्रतिमा त्यांच्या चित्रपटांतून वारंवार प्रतिबिंबित झाली आहे; अगदी ‘आँधी’ची निर्मितीही त्यांनी केली होती, यावरून हे लक्षात येईल.

नव्वदच्या दशकापर्यंत चित्रपटनिर्मितीत रस घेतलेल्या ओम प्रकाश यांनी काही काळ इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ुसर्स असोशिएशन अर्थात इम्पा या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. मात्र त्यानंतर त्यांनी जावई अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन आणि नातू हृतिक रोशन यांचे चित्रपट पाहणे पसंत केले. आपल्या वैचारिक बैठकीला साजेसे विषय, त्यांची मांडणी करताना काळानुसार बदलत चाललेल्या कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणारा आणि चित्रपटांतून त्याची जाणीव करून देणारा हा दिग्दर्शक म्हणूनच मुलखावेगळा ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 3:03 am

Web Title: filmmaker j om prakash profile zws 70
Next Stories
1 ख्रिस्तियन गिलमिनॉल्ट
2 अनंत सेटलवाड
3 वहाकन दादरियान
Just Now!
X