एकअब्जांश सेकंदाचा एकदशलक्षांश भाग म्हणजे एक फेमटोसेकंद. आता इतक्या कमी काळात घडणाऱ्या अभिक्रियांचा अभ्यास तो कसा केला जात असेल, पण त्यावर एक संपूर्ण विज्ञानशाखाच इजिप्शियन वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक अहमद झीवेल यांच्या मूलभूत संशोधनामुळे पुढे आली. तिचे नाव फेमटोकेमिस्ट्री (फेमटोरसायनशास्त्र). झीवेल यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे विशेष म्हणजे अरब जगातील व इजिप्तमधील नोबेल मिळालेले ते पहिलेच वैज्ञानिक होते.

अमेरिकेचे मध्यपूर्वेतील विज्ञानदूत अशीही त्यांची ओळख. ते अमेरिकी नागरिक होते. त्यांना १९९९ मध्ये नोबेल मिळाले. झीवेल यांनी त्यांचे जीवनच रसायनशास्त्राला अर्पण केले होते. लेसर तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी अत्यंत कमी गतीच्या रासायनिक अभिक्रियांत अणुरेणूंच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली. त्यांचा जन्म उत्तर इजिप्तमधील नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातील दमानहूरचा. त्यांचे शिक्षण अलेक्झांड्रिया विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये झाले. तेथे काही काळ अध्यापन केल्यानंतर १९६९ मध्ये ते अमेरिकेला गेले व तेथे १९७४ मध्ये फिलाडेल्फियातील पेनसिल्वानिया विद्यापीठातून डॉक्टरेट झाले. ओबामा यांच्या विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाचे ते २००९ मध्ये सल्लागार होते. अखेपर्यंत त्यांनी कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्था म्हणजे कालटेकमध्ये काम केले. कालटेकमधील त्यांची कारकीर्द चाळीस वर्षांची, त्यात चार मितींची इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी यंत्रे शोधण्यात ते यशस्वी झाले होते. रसायन व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कालटेकमध्ये काम केले. अमेरिकेने इजिप्तला विज्ञान संशोधनात मदत कमी करू नये, असे त्यांचे मत होते. दहशतवादाविरोधातील लढाईत इजिप्तलाही युक्तीने सामील करून घेतले पाहिजे, असेही त्यांना वाटत होते. त्यांना इजिप्तचा ‘कॉलर ऑफ द नाईल’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. त्यांनी एकूण ६०० वैज्ञानिक शोधनिबंध व १६ पुस्तके लिहिली. इजिप्तमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यावर त्यांनी स्पष्टवक्तेपणाने भाष्येही केली होती. इजिप्तमध्ये २०११ मध्ये जी क्रांती झाली त्या वादळी काळात त्यांनी कालटेकच्या धर्तीवर मायदेशात कैरो शहराच्या बाहेर ‘झीवेल सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ ही संस्था सुरू केली. समाजाला आपण परत देणे लागतो ही समाजऋणाची भूमिका त्यामागे होती. निसर्गातील अभिक्रियांचा नवीन मार्गाने शोध घेणारी उपकरणे त्यांनी तयार केली. सहकारी व विद्यार्थी यांच्यासाठी ते प्रेरणास्थान होतेच. त्यांच्यात एक जागतिक नागरिक दडलेला होता त्यामुळे संकुचित विचारांच्या ते पलीकडे होते. त्यांना इजिप्तचे अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली गेली होती, पण राजकारणापेक्षा ते सत्य व विज्ञाननिष्ठ राहिले. इस्लाममध्ये ज्ञानाचा धागा विणलेला आहे, त्या जोरावर पूर्वी इस्लामने प्रगती केली. आता पुन्हा त्याकडे वळले पाहिजे, असा त्यांचा सल्ला आजच्या इस्लामी जगाला लाखमोलाचा आहे यात शंका नाही.