‘विमेन्स स्टडीज’ ही अभ्यासशाखा वाढली नव्हती तेव्हा, अर्धशतकापूर्वी  म्हणजे १९७० साली ‘फेमिनिस्ट प्रेस’ या प्रकाशनसंस्थेची स्थापना अमेरिकेत झाली. या प्रकाशनसंस्थेनंतर स्त्री-अभ्यासाची विशेष शाखाही वाढू लागली आणि इंग्लंडमध्ये ‘द विमेन्स प्रेस’ (१९७७), भारतात ‘काली फॉर विमेन’(१९८४) अशा स्त्रीजीवनकेंद्री प्रकाशनसंस्था सुरू झाल्या. आज देशोदेशी ७५ हून अधिक प्रकाशनगृहे स्त्री-अभ्यासाला पूरक ठरताहेत.  स्त्री-प्रकाशनाची ही चळवळ सुरू करणाऱ्या पहिल्यावहिल्या प्रकाशनसंस्थेच्या संस्थापक होत्या फ्लोरेन्स होव (आडनावाचा स्पेलिंगनुसार उच्चार ‘होवे’).  पण केवळ एक प्रकाशक ही त्यांची ओळख नव्हती. किंबहुना त्या केवळ प्रकाशक  असत्या, तर ही चळवळ त्यांच्याकडून सुरू झालीच नसती!

अभ्यासाची आवड असणारी मुलगी, म्हणून फ्लोरेन्स वाढल्या. १९२९ चा त्यांचा जन्म. १९५१ मध्ये इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी आणि पुढे १९५४ मध्ये विस्कॉन्सिन विद्यापीठातून कलेतिहासाची पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली. महाविद्यालयात स्त्रियांचे साहित्य हा विषय शिकवताना, स्त्रीविषयक साहित्यासोबत स्त्रीकडे  समाजशास्त्रीय दृष्टीने पाहणाऱ्या पुस्तकांचाही अभ्यास हवा, याची गरज फ्लोरेन्स यांनी मांडली. तशी काही पुस्तके शोधलीसुद्धा आणि ती अभ्यासक्रमात आणलीदेखील. पण हे पुरेसे नाही, याची जाणीव त्यांना डाचत होती. आपणच काहीतरी केले पाहिजे, म्हणून काही प्रकाशकांकडे त्यांनी पाठपुरावाही केला- ‘कल्पना छान आहे, पण पैसा नाही हो यात’ हे ठरीव उत्तर त्यांना मिळे. तोवर  १९६७ पासून अमेरिकेत ‘सेकंड वेव्ह फेमिनिझम’ म्हणून ओळखली जाणारी चळवळ जोर धरत होती. कितीतरी जणी व्यक्त होऊ शकतात, पण पुस्तकरूपाने प्रकाशित होण्यापासून दूर आहेत, हे दिसत होते. अशा काळात नवऱ्याशी (पॉल लॉटर, हे फ्लोरेन्स यांचे तीन घटस्फोटांनंतरचे जोडीदार, १९८७ पर्यंत) प्रकाशनसंस्था आपणच काढण्याची चर्चा त्यांनी केली. त्यानेही नाव सुचवले, तेच पुढे कायम झाले- ‘द फेमिनिस्ट प्रेस’! ही संस्था ‘ना नफा’ असल्याने अध्यापनकार्य सांभाळून त्या काम करू लागल्या. संस्थेत समविचारी सहकारीही सामील झाल्या. आजवर १७ विविध मालिकांतून ‘फेमिनिस्ट’ प्रेस ने कैक पुस्तके प्रकाशित केली आहेत. पैकी एक मालिका भारतीय स्त्रियांविषयी, तर एक विज्ञानक्षेत्रातील स्त्रिया, अशी आहे.  ‘विमेन्स स्टडीज क्वार्टरली’ ही संशोधनपत्रिकाही या प्रकाशनगृहाने सुरू केली.

या फ्लोरेन्स होव, १२ सप्टेंबररोजी कंपवाताच्या दीर्घ आजारानंतर न्यू यॉर्कमध्ये निवर्तल्या.