News Flash

ली आयकोका

१९७८ मध्ये त्यांच्या वाढत्या प्रभावाला धास्तावून फोर्ड यांनी आयकोकांची हकालपट्टी केली.

ली आयकोका

जागतिक मोटारविश्वाला ‘फोर्ड मस्टँग’ आणि ‘जीप चेरोकी’ या तुफान लोकप्रिय मोटारी देण्यात ज्यांच्या द्रष्टेपणाचा वाटा होता, ते ली आयकोका  दोन जुलै रोजी निवर्तले. दुसऱ्या महायुद्धानंतर इतर देशांच्या तुलनेने स्थिर राहिलेल्या अमेरिकेत मोटार उद्योग भरभराटीला आला. मोटार घेण्याचे स्वप्न तिथले सर्वसामान्य नागरिकही पाहू लागले. मोटार घेण्यास अर्थसाहाय्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था पुढे आल्या. धनाढय़ उद्योगपतींनी थैल्या उघडल्या. या उद्योगाला दिशा देण्याचे काम ली आयकोकांसारख्यांनी केले.

ली आयकोका यांचा जन्म (१५ ऑक्टोबर १९२४) अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियात झाला. इटलीहून अमेरिकेत स्थलांतरित झालेले त्यांचे कुटुंबीय तिथे उपाहारगृह चालवत असे. लिडो हे त्यांचे मूळ नाव; पण पुढील काळात ‘ली’ हे अधिक ‘अमेरिकी’ नाव त्यांनी धारण केले. ली यांच्या वडिलांनी मोटार भाडय़ाने देण्याचा व्यवसाय सुरू केल्याने मोटारींच्या दुनियेत त्यांचा प्रवेश लहान वयातच झाला होता. अभियांत्रिकीची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते थेट ‘फोर्ड’ मोटार कंपनीत रुजू झाले. मात्र, अभियांत्रिकी शिक्षण घेऊनही ली यांचा ओढा विक्री व्यवस्थापनाकडे अधिक होता. १९५६ मध्ये २० टक्के तत्स्थान प्रदान (डाऊनपेमेंट) आणि ५६ डॉलर प्रतिमाह तीन वर्षांसाठीच्या हप्त्याने मोटारी विकण्याचे ‘फिफ्टी सिक्स फॉर फिफ्टी सिक्स’ हे विक्रीतंत्र त्यांनी वापरात आणले, जे तुफान लोकप्रिय ठरले. या काळात फोर्ड कंपनीचे उपाध्यक्ष आणि पुढे अमेरिकेचे संरक्षणमंत्री बनलेले रॉबर्ट मॅक्नमारा यांनी त्यांना पदोन्नती दिली. संधीचे सोने करत ली यांनी १९६४ मध्ये ‘फोर्ड मस्टँग’ची निर्मिती केली. डेट्रॉइट या मोटार उद्योगाच्या पंढरीत ‘मस्टँग’ने दोन वर्षांतच ११० कोटी डॉलरचे घबाड मिळवून दिले. ली आयकोका एव्हाना फोर्ड कंपनीचे वलयांकित अध्यक्ष बनले होते आणि केवळ हेन्री फोर्ड-तिसरे हे फोर्डवंशीयच त्यांच्यापेक्षा वरिष्ठ होते. मात्र १९७८ मध्ये त्यांच्या वाढत्या प्रभावाला धास्तावून फोर्ड यांनी आयकोकांची हकालपट्टी केली.

पण त्याने आयकोका खचले नाहीत. ‘क्रायस्लर’ या दुसऱ्या बडय़ा अमेरिकी कंपनीत ते दाखल झाले. ती कंपनी तेव्हा कर्जाच्या आणि तोटय़ाच्या गर्तेत अडकली होती. पण अल्पकाळातच आयकोका यांनी तिला नफ्यात आणले. यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांना क्रायस्लरवरील कर्जाचे हमीदार बनण्यासाठी राजी करण्याचा चमत्कार आयकोका यांनी करून दाखवला. ‘क्रायस्लर वाचवणे ही अमेरिकेची जबाबदारी आहे’ हे त्यांचे भावनिक आवाहन त्या वेळी फारच प्रभावी ठरले. यामुळे क्रायस्लर कर्जाच्या गर्तेतून मुदतीपूर्वी बाहेर पडलीच, शिवाय लवकरच नफ्याच्या राशींवरही स्वार झाली. १९९२ मध्ये क्रायस्लरमधून निवृत्त होईपर्यंत आयकोका यांनी ‘अमेरिकन मोटर्स कॉपरेरेशन’वर  ताबा मिळवून ‘जीप ग्रँड चेरोकी’ची निर्मिती केली. तेच त्यांचे मोटारविश्वासाठीचे अखेरचे आणि शाश्वत योगदान ठरले.

भारतीयांना आयकोका माहीत आहेत ते त्यांच्या आत्मचरित्रामुळे. १९८० च्या दशकात खपाचा उच्चांक गाठणारे हे पुस्तक, उदारीकरणाची वाटच पाहात असलेल्या त्या वेळच्या भारतीय तरुणांना मार्गदर्शक वगैरे वाटले होते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:06 am

Web Title: ford motor company lee iacocca profile zws 70
Next Stories
1 बी. के. बिर्ला
2 जॉर्ज रोझेनक्रान्झ
3 विजयानिर्मला
Just Now!
X