बिहारमध्ये १९९० मध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता गेली. त्यानंतर आता जवळपास तीन दशके हिंदी भाषक पट्टय़ातील या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेसला सूर सापडलेला नाही. राज्यात राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून काँग्रेसला दुय्यम स्थान घ्यावे लागत आहे. पण एकेकाळी बिहारमध्ये काँग्रेस प्रबळ होती. केंद्रात अनेक तालेवार नेते पक्षाने या राज्यातून दिले. जगन्नाथ मिश्र हे त्यापैकीच एक. तीन वेळा मुख्यमंत्रिपद त्यांनी भूषविले. मात्र वाद आणि मिश्र हे जणू समीकरण होते. त्यांच्या पाटण्यातील निवासस्थानी इंदिरा गांधी यांचा पुतळा, तर भिंतीवर अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र असा काहीसा विरोधाभास होता! मिश्र यांचे नुकतेच दिल्लीत दीर्घ आजाराने निधन झाले. इंदिरा गांधी यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. आणीबाणीच्या कालखंडात त्यांच्याकडे बिहारची सूत्रे आली. जयप्रकाश नारायण यांची चळवळ भरात असताना कार्यकर्त्यांच्या अटकसत्रामुळे ते वादात सापडले. दोन वर्षांनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रिपदाची पहिली कारकीर्द संपुष्टात आली. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा बिहारचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आले. त्या वेळी उर्दूला दुसरी अधिकृत शासकीय भाषा म्हणून घोषित केल्याने मिथिलांचल भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा त्यांचा हा दुसरा कार्यकाळ विविध वादांत अडकून १९८३ मध्ये संपला. विशेषत: माध्यमांवर निर्बंध आणणाऱ्या बिहार पत्रकारिता विधेयकावर देशभर चौफेर टीका झाली होती. हे विधेयक इंदिरा गांधी यांना खूश करण्यासाठी आणले होते, अशी कबुली त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत दिली होती. नंतर त्यांनी या विधेयकाबाबत माफीही मागितली. १९८९ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा राजीव गांधी यांनी मिश्र यांच्याकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे दिली. भागलपूर दंगल हाताळण्यात सत्येंद्र नारायण सिन्हा यांना अपयश आल्याचा ठपका ठेवत त्यांना दूर करण्यात आले होते. मिश्र यांच्याकडे तिसऱ्यांदा सूत्रे आली, तेव्हा मंडल राजकारण भरात होते. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव राज्यात एक प्रबळ शक्ती म्हणून उदयास आले होते. त्यामुळे १९९०च्या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. पुढे मिश्र केंद्रात नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. १९९७ मध्ये सीताराम केसरी काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर मिश्र यांचे काँग्रेसशी बिनसले. १९९९ मध्ये त्यांनी बिहार जन काँग्रेसची स्थापना केली. पुढे दोन वर्षांनी ही संघटना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केली. त्यानंतर संयुक्त जनता दलामध्ये त्यांनी प्रवेश केला. लालूप्रसाद यादव यांच्याबरोबरच चारा घोटाळ्यात अखेरच्या काळात मिश्र हेही दोषी आढळले होते.