काँग्रेस पक्ष सत्तेत असताना पक्षाचे राज्याचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष व मुंबईचे अध्यक्ष अशा तिघांनाही एकाच वेळी अंगावर घेण्याचे धाडस पक्षातील नेते करीत नसत. पण हे धाडस अजित सावंत यांनी केले होते. त्यांचा पिंडच तसा आक्रमक. वडील कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय. गिरणी कामगारांच्या लढय़ात त्यांनी भाग घेतला होता. कम्युनिस्ट चळवळीतील आक्रमकतेचे बाळकडू अजित यांना घरातूनच मिळाले. काँग्रेस पक्षात अन्याय झाल्यावर त्यांनी आवाज उठविला. कारवाईची भीड बाळगली नाही. आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि यामुळेच बहुधा काँग्रेस पक्षाच्या दरबारी राजकारणात ते पुढे येऊ शकले नाहीत.

मुंबई काँग्रेसमध्ये वर्षांनुवर्षे अमराठी नेत्यांची चलती असायची. मराठी नेत्यांना झगडावे लागे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी सावंत यांना पक्षात पद दिले व काम करण्याची संधी दिली. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्तेपद त्यांनी भूषविले होते. प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका ते माध्यमांमधून ठामपणे मांडत. कामत यांनी राजीनामा दिल्यावर मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल झाला आणि सावंत यांचे बिनसले. मुंबई काँग्रेसमध्ये मराठी नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, असा आरोप करीत नेतृत्वाशी दोन हात केले होते. नेमका तेव्हाच मनसेने मुंबईत मराठीचा मुद्दा तापविला होता. सावंत यांना पक्षातील अन्य मराठी नेत्यांची मात्र साथ लाभली नाही. नेतृत्वाने आवाज न करण्याची तंबी दिल्यावरही आपली भूमिका त्यांनी सोडली नव्हती. शेवटी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीचा पर्याय स्वीकारला, पण तेथे ते रमले नाहीत. काँग्रेस पक्षात परतण्याची त्यांची इच्छा होती, पण नेतेमंडळींवर आधी कोरडे ओढल्याने काँग्रेस पक्षाची दारे त्यांच्यासाठी बंद झाली होती. राजकीय विश्लेषक म्हणून वृत्तवाहिन्यांमध्ये सहभागी होताना काँग्रेस पक्षाचे सदस्य नसले तरी काँग्रेसची भूमिकाच ते मांडत असत.

राजकारणाप्रमाणेच कामगार चळवळीतही त्यांचा सहभाग होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट झाली तशी युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, पण या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. कामांचे तास, वेतन यामध्ये कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जातो. अजित सावंत यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संघटना बांधली होती. या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या विषयावर त्यांनी ‘लोकसत्ता’त अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले. नंतर या लेखांचे ‘उठाव झेंडा बंडाचा’ हे पुस्तकही निघाले.

आपल्या वक्तृत्वातून छाप पाडणारे अजित सावंत हे निवडणुकीच्या राजकारणात मात्र यशस्वी झाले नाहीत. माहीम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती, पण स्वकीयांनीच मोडता घातला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांना अपयशच आले होते. राजकीय पक्षात काम करताना अनेक तडजोडी कराव्या लागतात. अजित सावंत हे मात्र त्याला अपवाद होते. त्यांच्या  अकाली निधनाने एक अभ्यासू नेता राज्याने गमावला आहे.