20 January 2020

News Flash

माल्कम नॅश

इंग्लंडच्या कौंटी संघाशी दीर्घकाळ जोडलेल्या नॅश यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली ती १९६६ साली.

फलंदाजांनी गोलंदाजांची धुलाई केली, की क्रिकेटचाहत्यांना विशेष चेव चढतो. आता टी-ट्वेन्टी सामने आणि आयपीएल आदी स्पर्धामुळे तर यास अधिक उधाण आले आहे. गोलंदाजीला त्यामुळे आलेले गौणत्व हा खरे तर चिंतेचाच विषय. परंतु क्रिकेट हे फलंदाजांइतकेच गोलंदाजांचेही आहे, हे खेळातून व त्यापल्याडच्या जीवनातूनही शांत, सौम्यपणे दाखवून देणारे खेळाडूही आहेत. क्रिकेटचे हे ‘खेळपण’ ज्यांनी जाणले, अशांमध्ये माल्कम नॅश यांचा समावेश करता येईल. साठ-सत्तरच्या दशकांत अष्टपैलू कामगिरी करत आपली कारकीर्द घडवलेल्या या ‘जंटलमन’चे मंगळवारी, ३० जुलैला वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

ग्लॅमॉर्गन या इंग्लंडच्या कौंटी संघाशी दीर्घकाळ जोडलेल्या नॅश यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली ती १९६६ साली. डाव्या हाताने मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजी करणाऱ्या नॅश यांनी त्यानंतर दोनच वर्षांनी टाकलेल्या एका ‘षटका’मुळे ते आजही चर्चिले जातात. नॉर्दम्प्टनशायरकडून खेळणाऱ्या गॅरी सोबर्स यांनी नॅश यांच्या त्या षटकातले सहाही चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून विक्रमच केला. अशा स्थितीस तोंड द्यावे लागणाऱ्या गोलंदाजाला कशास सामोरे जावे लागते, हे इंग्लंडविरुद्ध युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या किंवा मुंबईकडून खेळताना रवी शास्त्रीने बडोद्याच्या तिलक राजच्या एकाच षटकात सहा षटकार लगावल्यानंतर आपण पाहिले आहे. तीच गत नॅश यांची झाली. आणि ते तर असे पहिले गोलंदाज होते. त्यामुळे त्याचे कवित्व पुढे अनेक वर्षे चालू राहिले. परंतु नॅश यांचे वेगळेपण इथून पुढे सुरू होते. घडले ते खेळाचा एक भाग होता, त्याने न थांबता, टवाळीने बुजून न जाता, आपला खेळ खेळत राहिले पाहिजे, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यामुळेच पुढे लँकशायरच्या फ्रँक हेजने त्यांच्या एकाच षटकात पाच षटकार आणि एक चौकार अशी आतषबाजी केल्यावरही नॅश बुजले नाहीत आणि आपले गोलंदाजी तंत्र त्यांनी सोडले नाही. त्यामुळेच १९६९ साली ग्लॅमॉर्गनच्या (तुलनेने दुर्मीळ) कौंटी चॅम्पियनशिप मिळवण्यात ते (२१ सामन्यांत ७१ गडी बाद करून) मोलाचा हातभार लावू शकले व पुढे १९८३ पर्यंत त्या संघात सातत्यपूर्ण खेळले. मुख्य म्हणजे सर सोबर्सनाही त्यांनी अनेकदा बाद केले, पण त्यात सूडभावनेपेक्षा खेळभावनाच होती. दोनेक वर्षे श्रॉपशायरकडून खेळून १९८५ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी नॅश ३३६ प्रथमश्रेणी सामने खेळले व त्यांत त्यांनी सात हजारांहून अधिक धावा केल्या, १४८ झेल घेतले व तब्बल ९९३ फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले. नव्वदच्या दशकात कॅनडा आणि पुढे अमेरिकेत क्रिकेट प्रसार व प्रशिक्षणातही त्यांनी स्वत:स झोकून दिले. त्यांच्या जाण्याने क्रिकेटमधला खराखुरा ‘जंटलमन’ आपण गमावला आहे.

First Published on August 2, 2019 4:24 am

Web Title: former cricket player malcolm nash profile zws 70
Next Stories
1 सुबीर गोकर्ण
2 जॉन रॉबर्ट श्रीफर
3 एस. जयपाल रेड्डी
Just Now!
X