ऑस्ट्रेलियन, वेस्ट इंडियन आणि काही प्रमाणात पाकिस्तानी तेज गोलंदाजांची क्रिकेटविश्वात दहशत असण्याच्या काळात म्हणजे १९७०-८० दशक या संक्रमण काळात इंग्लंडच्या ज्या दोन गोलंदाजांनी आपला ठसा उमटवला, ते होते सर इयन बोथम आणि बॉब विलिस. पैकी बोथम हे अष्टपैलू म्हणजे विध्वंसक फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. याउलट विलिस केवळ गोलंदाज होते, पण बोथम यांच्यापेक्षा खूपच अधिक वेगवान. रॉबर्ट जॉर्ज डिलन अर्थात बॉब विलिस यांनी बुधवारी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या नावातील ‘डिलन’ हे नाव विख्यात गायक बॉब डिलन यांच्या प्रेमापोटी विलिस यांनी स्वत:च समाविष्ट केले होते. ते दिसायचेही त्या काळातील पाश्चात्त्य रॉक गायकासारखेच. साडेसहा फूट उंची, मानेपर्यंत रुळणारे भुरकट केस आणि निळे डोळे. लांब नि काहीसे शरीरापासून लोंबकळणारे हात. खरे तर तेज गोलंदाजासाठी ही काहीशी प्रतिकूल शरीरकाठीच. तरी बॉब विलिस अत्यंत वेगवान गोलंदाज म्हणून नावाजले. ९० कसोटी सामन्यांत त्यांनी ३२५ बळी घेतले. १९७०-७१च्या अ‍ॅशेस मालिकेसाठी तेव्हा २१ वर्षांचे असलेल्या विलिस यांना पाचारण केले गेले, कारण इंग्लंडचा एक प्रमुख गोलंदाज जायबंदी झाला होता. अपघाताने मिळालेल्या या संधीचे विलिस यांनी सोने केले. इंग्लंडसाठी सातत्याने गोलंदाजी करण्याचा ताण त्यांच्या शरीराला लवकरच जाणवू लागला होता. १९७५ मध्ये त्यांच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर उर्वरित कारकीर्दीत त्यांनी वेदनेशी जुळवून घेतच गोलंदाजी केली. तरीही त्यांचा लांबच लांब रन-अप कमी झाला नाही किंवा बळींची संख्याही आटली नाही. १९८१ मध्ये अ‍ॅशेस मालिकेतील हेडिंग्ले कसोटी सामन्यातली त्यांची गोलंदाजी आजही सर्वोत्कृष्ट कामगिरींपैकी एक मानली जाते. त्या सामन्यात विलिस यांनी अवघ्या ४३ धावांमध्ये ८ बळी घेतले. त्या सामन्यात इंग्लंडला फॉलो-ऑन मिळाला होता. तरीही इंग्लंडने तो सामना १८ धावांनी जिंकला! बॉब विलिस यांनी इंग्लंडचे नेतृत्वही केले. त्यात त्यांना संमिश्र यश मिळाले. परंतु त्यांच्या गोलंदाजीइतकेच धारदार त्यांचे निवृत्त्वोत्तर समालोचन ठरले. अत्यंत तिखट निरीक्षणांना किंचित विनोदाची झालर लावलेली त्यांची भाष्ये त्या काळच्या इंग्लिश क्रिकेटपटूंनाच (उदा. नासिर हुसेन) सर्वाधिक झोंबत. त्या काळातील विशेषत: ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाजांप्रमाणे (लिली, थॉम्पसन) विलिस यांनी कधीच शिवीगाळ वगैरे केली नाही. परंतु हेडिंग्लेमधील त्या थरारक विजयानंतर बीबीसीसमोर विलिस यांनी काढलेले उद्गार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवण्यास पुरेसे आहेत. ते म्हणाले होते, ‘‘इतके सगळे घडल्यानंतर निव्वळ क्रिकेटपटूंच्या फुटकळ वक्तव्यांआधारे बातम्या करण्याची गरज काय?’’ तरीही लवकरच ते माध्यमांमध्ये वावरले हा माध्यमांचा नव्हे, तर विलिस यांचा मोठेपणा!