12 December 2018

News Flash

अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर

अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर खऱ्या अर्थाने अभ्यासक होते.

अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर

राजकीय वर्तुळात ‘मामा’ या टोपणनावाने लोकप्रिय असलेले अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर खऱ्या अर्थाने अभ्यासक होते. अर्थसंकल्पीय तरतुदीत विदर्भावर कसा अन्याय होतो, याची आकडेवारीनिशी मांडणी करणारे ते पहिले राजकारणी होते. मामा अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून वावरले, पण त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने ते सर्वच राजकीय पक्षांत मानाचे स्थान मिळवून होते.

त्यांचा जन्म रामटेकचा. अखेपर्यंत तीच त्यांची कर्मभूमी राहिली. लोकांनी निवडून दिले व नंतर पराभव केला तरी रामटेकवरील प्रेमापोटी त्यांच्या बॅगेत असलेली रामटेकच्या मातीची पुडी ते कायम सोबत ठेवत असत. १९८२ला बाबासाहेब भोसलेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद भूषवणारे मामा राजकारणात येण्याआधी वकिली करायचे. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात त्यांनी वकिलीचे धडे गिरवले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले. त्याच काळात नरसिंह राव रामटेकचे खासदार झाले. त्यांच्या मदतीने त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली. तेथे  काम करताना त्यांनी विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्दय़ावरून स्वपक्षाच्याच सरकारला अनेकदा अडचणीत आणले. अर्थसंकल्पात होणाऱ्या तरतुदी व प्रत्यक्ष खर्च होणारा निधी यात प्रादेशिकवाद कसा आणला जातो, हे पहिल्यांदा त्यांनी आकडेवारीसकट जाहीर केले. विदर्भ, मराठवाडा व कोकणावर कसा अन्याय होतो, हेही त्यांनीच समोर आणले. त्यामुळे मग मामा या मागास प्रदेशातील लोकप्रतिनिधींसाठी बौद्धिक खाद्य पुरवणारे एक महत्त्वाचे व्यक्ती ठरले. पश्चिम महाराष्ट्रातील नेतेमंडळी निधीची कशी पळवापळवी करतात, हे मामा सतत आकडेवारीसह सांगायचे. मात्र, हा अन्याय कथन करताना त्यांचा स्वर नम्र असायचा.  प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळे १९९४ ला स्थापन झाली. तेव्हापासून मामा विदर्भाच्या मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून कार्यरत राहिले. निधीची पळवापळवी होऊ नये म्हणून राज्यपालांच्या नियंत्रणात असणारी अनुशेष निर्देशांक समिती स्थापन व्हावी म्हणून मामांनी खूप प्रयत्न केले व त्यात त्यांना यशसुद्धा आले. दरवर्षी अनुशेष किती कमी झाला व किती वाढला, याची आकडेवारी मामांना अगदी तोंडपाठ असायची. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्यांचे समाधान करताना नाकीनऊ यायचे. विदर्भावरील केवळ अन्याय जनतेसमोर मांडून मामा थांबले नाहीत, तर विकासासाठी काय करायला हवे, याचाही आराखडा ते राज्यकर्त्यांना नियमितपणे द्यायचे.  राज्यकर्त्यांकडून विदर्भावर अन्याय कसा होतो, याची जनतेला पहिल्यांदा जाणीव करून देणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

First Published on January 8, 2018 1:12 am

Web Title: former maharashtra minister madhukarrao kimmatkar