News Flash

अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी

डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० या कालावधीत त्यांनी नौदलाचे नेतृत्व केले.

अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी

स्वातंत्र्यानंतर ध्येयवादी व्यक्तींनी भारताला लष्करी पातळीवर सक्षम करण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण आराखडा, योजना तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना अनेकांची साथ मिळाली. या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतीय नौदल आज निळ्या पाण्यातील नौदल म्हणून नावारूपास येण्याची क्षमता राखून आहे. नौदलाने आपले प्रभुत्व कधीच सिद्ध केले आहे. या वाटचालीत ज्या व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान लाभले, त्यांत नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी (निवृत्त) यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांचे नुकतेच निधन झाले.

डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० या कालावधीत त्यांनी नौदलाचे नेतृत्व केले. सैन्य दलात कोणतीही सामग्री वर्षांनुवर्षे विचारविनिमय केल्याशिवाय समाविष्ट होत नाही. नौदलास विशिष्ट सामग्रीची गरज असल्याची कल्पना पुढे येणे, तिची उपयोगिता अन् निकड यावर बरेच मंथन होते. खरेदी प्रक्रियेतील कालापव्यय वेगळाच. याचा विचार केल्यास दोन ते तीन दशकांपूर्वी मांडले गेलेले प्रस्ताव, योजना आणि मुहूर्तमेढ रोवलेले प्रकल्प सध्या प्रत्यक्षात येताना दिसतात. भविष्यातील आव्हाने तत्कालीन नौदल प्रमुखांच्या दूरदृष्टीने जोखली होती. नौदलाची वाढणारी शक्ती हे त्याचे फलित होय. नाडकर्णी यांचा जन्म ५ डिसेंबर १९३१ रोजी झाला. वेलिंग्टनच्या संरक्षण दल-अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या महाविद्यालयाचे ते पदवीधर. तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर डफरीन येथून विशेष प्रावीण्य श्रेणीत त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. मार्च १९४९ रोजी ते ‘रॉयल इंडियन नेव्ही’त दाखल झाले. प्राथमिक प्रशिक्षण ब्रिटिश नौदल महाविद्यालयात झाले. ‘रॉयल इंडियन नेव्ही’च्या ताफ्यातील युद्धनौकांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. नौकानयन आणि दिशादर्शनशास्त्र यात विशेष अभ्यास करून ते पारंगत झाले. नौदलातील चार दशकांच्या सेवेत नाडकर्णी यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळली. त्यामध्ये युद्ध कार्यवाहीसाठी सज्ज असणाऱ्या नौदल तळांसह प्रशिक्षण आणि आस्थापना विभागाचाही अंतर्भाव आहे. आयएनएस तलवार, आयएनएस दिल्ली यासह नौदलाच्या पश्चिम विभागाची धुराही त्यांनी सांभाळली. गोवा मुक्तिसंग्राम, भारत-पाकिस्तानदरम्यानच्या १९६५ आणि १९७१ च्या युद्धात त्यांचा सहभाग राहिला. सागरी युद्धात आघाडीवर राहणारे नाडकर्णी हे ज्ञानदानातही रमले. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संरक्षणशास्त्र महाविद्यालयात मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. नौदल मुख्यालयात वेगवेगळ्या पदांवर यशस्वीपणे काम केले. पुढे उपप्रमुख आणि प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी भारतीय नौदलाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन नाडकर्णी यांना परम विशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. देशाला तब्बल साडेसात हजार कि.मी.हून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताचे भौगोलिक स्थान इतके महत्त्वपूर्ण की, जगातील सर्वाधिक व्यग्र अशा जलमार्गावर त्याची नियंत्रण राखण्याची क्षमता आहे. देशाचा जवळपास ९० टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. सागरी सीमांच्या रक्षणाबरोबर व्यापारी जहाजांचे मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. ही जबाबदारी लक्षात घेऊन नियोजनाचे दायित्व नाडकर्णी यांनी प्रभावीपणे पार पाडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 3:21 am

Web Title: former navy chief admiral jayant ganpat nadkarni profile
Next Stories
1 अवतार सिंग खालसा
2 प्रीती तनेजा
3 हार्लन एलिसन
Just Now!
X