पॅसाडेनातील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्या वयाच्या २९व्या वर्षी म्हणजे १९८६ मध्ये आल्या. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या प्रांतात त्या काळात महिला वैज्ञानिकांना अमेरिका हा प्रगत देश असल्याने अगत्याचे स्थान होते. पण पुरुष सहकारी फार चांगली वागणूक देत होते अशातला भाग नाही. त्या महिला असल्या तरी पुरुषी आक्रमकतेनेच वागल्या, जे केले त्याची त्यांना खंत नाही, आणि का असावी.. नंतरच्या काळात त्यांना स्तनाचा कर्करोग झाला, पण अठरा महिन्यांच्या उपचारानंतर सुखरूप वाचल्या. आज त्या जगातील एक ख्यातनाम जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. २० विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत आहेत. अपारंपरिक ऊर्जा साधनांचा ध्यास घेतलेल्या या महिला वैज्ञानिकाचे नाव आहे फ्रान्सेस अर्नोल्ड. त्यांना अलीकडेच सहस्रक तंत्रज्ञान पुरस्कार देण्यात आला.
फिनलंडच्या टेक्नॉलॉजी अकॅडमीचा हा पुरस्कार यापूर्वी संगणकाच्या हार्ड ड्राइव्हची क्षमता वाढवणारे ब्रिटिश संगणकतज्ज्ञ स्टुअर्ट पाíकन, वेबजालाचे संशोधक टीम बर्नर्स ली यांना मिळाला आहे. यंदा बारा वर्षांत प्रथमच हा पुरस्कार महिलेला मिळाला आहे, हे विशेष. फ्रान्सेस अर्नोल्ड यांनी प्रयोगशाळेत नियंत्रित उत्क्रांतीतून अनेक जैवरसायने बनवली जी पर्यायी इंधने म्हणून वापरता येतात, अनेक औषधे, अपमार्जके त्यांच्या संशोधनाची फलश्रुती आहे. १९९९ मध्ये त्या पर्यायी ऊर्जासाधनांचा शोध घेण्यासाठी संशोधनाकडे वळल्या. पीट्सबर्ग येथे रोमन कॅथॉलिक कुटुंबात जन्मलेल्या अर्नोल्ड यांनी व्हिएतनाम युद्धाचा निषेध केला होता. बंडखोर वृत्तीच्या या महिलेने वॉल्टर हार्पर्स अटिक या जॅझ क्लबमध्ये वयाच्या सतराव्या वर्षी वय लपवून वेट्रेस म्हणून काम केले होते. त्यांनी कॅब चालवूनही पसे मिळवले. विद्यार्थिदशेत फार चमक दाखवता आली नसली तरी त्या नंतर प्रिन्स्टनला आल्या. तेथे मेकॅनिकल इंजिनीअिरगची पदवी घेऊन नंतर बर्कलेच्या कॅलिफोíनया विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीत डॉक्टरेट केली. जगातील जैवअभियांत्रिकीचे भवितव्य आता त्या घडवत आहेत. एखादी नवी कल्पना लोकांना चुकीची वाईट वाटू शकते, पण तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर मागे हटू नका, अनेक नवीन गोष्टी इतरांना तशा वाटत नसतात, पण खचून जाऊ नका हाच त्यांचा यशाचा मूलमंत्र आहे. मी शून्यातून उभी राहिले, असे त्या सांगतात. रासायनिक प्रक्रियातील विषारी पदार्थ कमी करण्यासारख्या गोष्टींबरोबर साखरेपासून इंधन तयार करण्याचे श्रेय त्यांना आहे. हरित रसायनशास्त्रात त्यांनी गेवो ही कंपनी स्थापन केली. दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी निसर्गाकडून प्रेरणा घेऊन नवी प्रथिने तयार केली. मधुमेहावरील जानुविया हे औषध तयार करण्यासाठी लागणारे वितंचक त्यांनीच तयार केले. उत्क्रांतीतून जे चांगले बदल होतात त्यांची प्रयोगशाळेत नक्कल करून त्यांनी जैवरसायनाच्या मदतीने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत.