19 September 2020

News Flash

फ्रान्सीस अ‍ॅलेन

मानवाने लिहिलेली आज्ञावली संगणकासारख्या यंत्राला समजण्याच्या आवाक्यात त्यांनी आणली

फ्रान्सीस अ‍ॅलेन

 

माणसाचे मन व शरीर यांच्यात ज्या प्रकारचे नाते असते तसेच संगणकाची आज्ञावली आणि यंत्रणा (सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर) यांच्यातही असते. आज्ञावलीला नेमके काय म्हणायचे आहे ते यंत्रणेला कळले तरच संगणक, मोबाइल व्यवस्थित चालतो. मनाची भाषा शरीराला समजावी लागते. तशीच आज्ञावलीची भाषा संगणकातील विविध यंत्रणांना समजावी लागते. नेमका हा सांधा जुळवण्याचे महत्त्वाचे काम ज्या संगणक वैज्ञानिकांनी केले त्यांपैकी एक फ्रान्सिस अ‍ॅलेन. अ‍ॅलेन यांच्या निधनाने संगणक क्षेत्रातील महत्त्वाच्या महिला वैज्ञानिकांपैकी एकीला आपण मुकलो आहोत. १९६०च्या सुमारास अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी तयार झालेल्या महासंगणकाची आज्ञावली त्यांनीच तयार केली होती. नंतर त्या ‘आयबीएम’ कंपनीत रुजू झाल्या.  त्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी, आज ज्याला आपण ‘कंपायलर’ म्हणतो तो आज्ञावली तंत्रज्ञानाचा भाग तयार करण्यात पुढली ४० वर्षे घालवली.

मानवाने लिहिलेली आज्ञावली संगणकासारख्या यंत्राला समजण्याच्या आवाक्यात त्यांनी आणली. १९६०-७० च्या दशकात त्यांनी जॉन कॉक यांच्यासमवेत जे शोधनिबंध लिहिले त्यामुळे संगणक आज्ञावली क्षेत्राची पायवाट सोपी झाली.

संगणक क्षेत्रातील नोबेल मानला जाणारा टय़ुरिंग पुरस्कार त्यांना मिळाला होता. अ‍ॅलेन यांचा जन्म न्यूयॉर्कचा. आई-वडिलांची डेअरी होती. सहा मुलांपैकी त्या मोठय़ा. वीजपाण्याविना सुरुवातीचे आयुष्य त्यांनी काढले. एका खोलीच्या शाळेत शिकल्या. गाईंचे दूध काढून आई-वडिलांना मदत केली. नंतर न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतले. मिशिगन विद्यापीठातून गणिताची पदवी घेतली. त्यांना खरे तर शिक्षकी पेशाकडे वळायचे होते पण महाविद्यालयीन काळात काढलेले कर्ज चुकवण्यासाठी आयबीएमची नोकरी केली ती तब्बल ४५ वर्षे. सुरुवातीला त्या नवीन उमेदवारांना फोर्ट्रान ही संगणकाची भाषा शिकवत होत्या. महासंगणक प्रकल्पात काम केल्यानंतर त्यांना असे लक्षात आले की, संगणकाचा वेग वाढवण्यासाठी कंपायलरवर काम करणे गरजेचे आहे. नंतर त्यांनी समांतर संगणनाचे तंत्र शोधले. त्यांच्या ‘कंपायलर’ संशोधन गटात निम्म्याहून अधिक महिला होत्या. ज्यांना संधी मिळत नव्हती अशांना त्यांनी स्थान दिले. महिलांना या क्षेत्राकडे आकर्षित करण्याचे काम त्यांनी केले. आयबीएम फेलो पुरस्कार त्यांना मिळाला होता, पण त्यात चुकून त्या पुरुष आहेत असे गृहीत धरले होते. त्या ‘चुकी’ला माफी देत त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला. जो काळ संगणक हा विषय महिलांसाठी वर्ज्यच मानणारा होता, अशा काळातही त्यांनी या क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत पायाभूत काम केले, हेच त्यांचे वेगळेपण होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 12:01 am

Web Title: francis allen profile abn 97
Next Stories
1 प्रा. मुकुंद लाठ
2 सादिया देहलवी
3 अमरेश दत्ता
Just Now!
X