फ्रान्सला विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात नेणारे नेते, म्हणून जाक शिराक यांची नोंद इतिहास घेईलच. फ्रान्स्वां मितराँ यांच्यासारख्या द्रष्टय़ा समाजवादी राष्ट्राध्यक्षानंतर उजव्या विचारसरणीचे शिराक हे फ्रान्सचे अध्यक्ष झाले. मितराँ यांचे ते अल्पकाळचे सहकारी आणि चिरंतन प्रतिस्पर्धी. शिराक यांच्या गुरुवारी झालेल्या निधनामुळे, फ्रान्सच्या उत्कर्षकाळाचा एक दुवा निखळला आहे.

चार्ल्स द गॉल यांच्या काळात हेच शिराक कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते, यावर विश्वास बसणार नाही; पण पंचविशीत राज्यशास्त्र व प्रशासन यांच्या पदव्या मिळवून, पुढे सैनिकी प्रशिक्षणातही त्यांनी चमक दाखवली. द गॉल यांनी १९५४ पासून अल्जेरियावर लादलेल्या युद्धात आपण केंद्रस्थानी असावे, यासाठी शिराक यांनी १९५८ साली वैयक्तिक लागेबांधे वापरले आणि युद्धात वर्षभर सहभागी होऊन, १९५९ साली ते परतले. पुढली दोनतीन वर्षे त्यांनी सरकारी सेवेत काढली, पण १९६२ पासून ते द गॉल यांचे विश्वासू ठरले. नेहमीच सत्ताकेंद्रांजवळ राहणाऱ्या शिराक यांना द गॉल यांच्यानंतरचे जॉर्जेस पॉम्पिदू यांनी १९७२ मध्ये मंत्रिपद दिले आणि त्याहीनंतरचे अध्यक्ष जिस्कार यांनी दिलेले पंतप्रधानपदही दोन वर्षे (१९७४ ते ७६) त्यांनी सांभाळले. पॅरिस शहराचे आर्थिक अधिकार असलेले मेयरपद त्यांनी १९७७ पासून सांभाळले. उजव्या विचारसरणीचे नेते म्हणून आता मुसंडी मारण्याचे ठरवूनच मितराँ यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. जिंकले मितराँ, पण दिलदार मितराँनी त्यांना पंतप्रधानपद दिले आणि महत्त्वाकांक्षी शिराक यांनी ते स्वीकारले. त्या दोन वर्षांनंतरही पुन्हा पॅरिसचे मेयरपद होतेच. मात्र १९९३ मध्ये स्वपक्षीय बेलादू यांच्याशी समेट करून, १९९५ मधील अध्यक्षीय लढतीचा मार्ग शिराक यांनी सुकर केला होता.

अध्यक्ष म्हणून शिराक समन्वयवादी होते, परंतु त्यांची आर्थिक धोरणे खासगीकरणाची होती. १९९५ ते २००७ असे दोन कार्यकाळ ते अध्यक्षपदी राहिले. अमेरिकेच्या कथित ‘वॉर ऑन टेरर’ला डोळस पाठिंबा देणाऱ्या शिराक यांनी २००३ मध्ये इराकवर थेट आक्रमणाची अमेरिकी चाल स्पष्टपणे झिडकारली. याबद्दल त्यांचे कौतुकही झाले. पण स्थलांतरित, बेरोजगार विरुद्ध पोलीस असा मोठा दंगाही त्यांच्याच काळात घडला. याच काळात युरोपीय संघ एकीकरणाकडे वाटचाल करीत होता. शिराक यांनी आर्थिकदृष्टय़ा युरोकडे झालेले संक्रमण योग्यरीत्या हाताळले, पण युरोपीय राज्यघटनेसाठी फ्रान्समध्ये २००५ साली झालेले सार्वमत त्यांच्या विरोधात गेले. ‘युरोपचे एकीकरण ही एक कलाकृतीच आहे’ असे म्हणणारे शिराक, या पराभवाने दुखावले होते.