पृथ्वीवर अनेक युगे येऊन गेली, त्यात आता मानवी युग अवतरले आहे, पण त्यात पृथ्वी ग्रहाची मोठी हानी होत आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीचे फटके पाश्चिमात्यांच्या आधी विकसनशील जगाला बसू लागले आहेत. आता झालेले हे नुकसान भरून न येणारे आहे.. ब्रिटनमधील रॉयल सोसायटीचा विन्टन पुरस्कार ज्यांच्या पुस्तकाला मिळाला त्या विज्ञान पत्रकार गाया व्हिन्स यांचे हे प्रतिपादन भावी पिढय़ांचे भवितव्य काय आहे यावर प्रकाश टाकणारे आहे.
गाया व्हिन्स या लेखक, विज्ञान पत्रकार आहेत. नेचर क्लायमेट चेंज या नियतकालिकाच्या संपादक, नेचरच्या वृत्तसंपादक व न्यू सायंटिस्टच्या ऑनलाइन संपादक होत्या. विज्ञान व पर्यावरण हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. गाíडयन, सायंटिफिक अमेरिकन, ऑस्ट्रेलियन जिओग्राफिक या नियतकालिकांत त्या लेखन करतात. गाय व्हिन्स यांनी ही माहिती बरीच भटकंती करून मिळवली आहे त्यामुळे http://wanderinggaia.com/ असे त्यांच्या संकेतस्थळाचे नाव आहे तेथे त्यांचे ब्लॉगही वाचायला मिळतात. त्यांच्या द अँथ्रोपोसिन-अ जर्नी टू द हार्ट ऑफ द प्लॅनेट या पुस्तकाला २५ हजार पौंडांचा िवटन पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे हे पुस्तक भूगर्भशास्त्रीय व जैविक प्रक्रियांमध्ये माणसाने किती हस्तक्षेप केला आहे याची माहिती देते. माणसाच्याच कृतींनी निर्माण केलेल्या समस्यांना माणसेच कशी उत्तरे शोधण्यासाठी धडपडत आहेत याचेही विवेचन आहे. त्यांनी पाणीटंचाई व प्रदूषणावर मात करण्याचे प्रयत्न, कृत्रिम प्रवाळ बेटे, कृत्रिम हिमनद्या, हवा शुद्ध करण्यासाठी कृत्रिम वृक्ष तयार करण्याच्या प्रयत्नांचा आढावा घेतला आहे, तोच मानवी युगाचा इतिहास आहे. त्या मूळ विज्ञान पत्रकार असल्या तरी त्या बंदिस्त जगापलीकडे जाऊन त्यांनी विज्ञानाचा वेध घेतला आहे. त्यांनी सुमारे ८०० दिवस जगाची सफर करून हे पुस्तक लिहिले आहे. गेल्या दोन शतकांत ज्युरासिक काळापेक्षा जास्त वेगाने पृथ्वीवर बदल झाले आहेत. बारा हजार वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपले तेव्हा पृथ्वीवर तुलनेने बरीच अनुकूल स्थिती होती. त्यानंतर फार वेगाने पृथ्वीवरील स्थिती बदलत गेली व त्यात निसर्गाचे शोषण झाले आहे असे त्या सांगतात. विज्ञान पत्रकारिता करताना जी अचूकता, सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी लागते ती त्यांच्या लेखनात आहे. त्यांना आता जो पुरस्कार मिळाला आहे तो यापूर्वी स्टीफन हॉकिंग, जॅरेड डायमंड, स्टीफन जेगॉल्ड यांना मिळालेला आहे.