03 June 2020

News Flash

जीन डाइच

‘सिडनी द एलिफंट’ हे निळ्या रंगाच्या गमत्या हत्तीचे सचेत-पात्र ही मात्र जीन डाइच यांची जगाला देणगी

जीन डाइच

‘टॉम अ‍ॅण्ड जेरीचे दिग्दर्शक गेले’ म्हणून मुंबईतल्या सध्या घरीच बसलेल्या तरुण सेलेब्रिटी कलावंतांनी हळहळ व्यक्त केल्याच्या बातम्या इंटरनेटवर आपल्या नजरेसमोर मध्येमध्येच आलेल्या असतील. जीन डाइच यांची निधनवार्ता २० एप्रिलला आली, त्यानंतरच्या या हळहळ-स्पर्धेत बऱ्याच जणांनी प्रसिद्धी मिळवली!

पण या जीन डाइच यांना केवळ ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’चे दिग्दर्शक म्हणणे,  हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच आहे. डाइच यांनी १९६१ ते १९६३ या उण्यापुऱ्या अडीच वर्षांत ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’चे १३ लघू- सचेतपट  (शॉर्ट अ‍ॅनिमेशन फिल्म्स) बनवले हे खरेच; त्या सचेतपटांचे जरी फार जंगी स्वागत त्या काळात झाले नसले तरीही हे डाइच-दिग्दर्शित टॉम-जेरी कधी ग्रीसमध्ये, कधी कॅरेबियन बेटांवर, कधी आफ्रिकेतसुद्धा गेल्याचे दिसले आणि ‘जगज्जेता’ होण्याची महत्त्वाकांक्षा त्या काळच्या अमेरिकेप्रमाणेच या मांजरा-उंदरातही उतरल्याचे दिसले हे सुद्धाखरे.. पण म्हणून काही फक्त टॉम अ‍ॅण्ड जेरी हेच जीन डाइच यांचे कर्तृत्व नव्हे! (टॉम आणि जेरी ही सचेत-पात्रे डाइच यांच्याकडे येण्याआधीच, १९४३ ते १९५३ या ११ वर्षांत तब्बल सात ‘ऑस्कर’ चिन्हे या मालिकेने मिळवली होती, ती हाना-बार्बेरा या जोडीमुळे.)

‘सिडनी द एलिफंट’ हे निळ्या रंगाच्या गमत्या हत्तीचे सचेत-पात्र ही मात्र जीन डाइच यांची जगाला देणगी. त्यांनी आणखीही चार-पाच पात्रे तयार केली, पण सिडनी हत्तुल्यासारखी ती अजरामर होऊ शकली नाहीत. पण १९२९ पासून पुस्तकांमध्येच अडकलेल्या ‘पोपेय’ या खलाशाला सचेतपटांच्या लाटांवर नेले ते जीन डाइच यांनीच. शिवाय नंतरच्या काळात कोणती सचेतपट-मालिका अधिक चालेल, कोणती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, याचे नेमके अंदाज जीन डाइच यांनी बांधले.

महायुद्धकाळात ज्या अमेरिकींचे तारुण्य भंजाळले, त्यांपैकी जीन डाइच एक. जन्म त्या वेळी अमेरिकेची संगीतनगरी समजल्या जाणाऱ्या शिकागोचा, त्यामुळे असेल पण जाझ, पॉप, रॉक संगीताकडे डाइच यांचा ओढा होता. पण ‘खनक’ होती ती रेषेत. मग डाइच यांनी तत्कालीन संगीत-नियतकालिकांमध्ये चित्रे काढून पैसे मिळवले.  युद्धकाळात वैमानिक म्हणून प्रशिक्षणही घ्यावे लागले, पण न्यूमोनियाने युद्धापासून ‘वाचवले’!  विमानांच्या डिझाइनचे आराखडे बनवण्याचे काम त्यांच्याकडे आले, ते मात्र इमानेइतबारे पार पाडून काहीसे विलंबानेच, वयाच्या तिशीनंतर ते सचेतपटांच्या दुनियेकडे वळले. अशी उशिरा केलेली सुरुवात अनेकदा समजूतदार ठरते. जीन डाइच यांच्याबाबत तरी असे झाले. त्यांचा हात तर चांगला होताच, पण व्यवसायदृष्टीदेखील चटकन तयार झाली. अमेरिकी सचेतपट उद्योगातला बडय़ा मक्तेदारांचा खेळ ओळखून ते स्वत:हून प्राग (तेव्हाच्या चेकोस्लोव्हाकियाची राजधानी) या शहरात काम करू लागले. ते त्यांनी अगदी २००८ पर्यंत केले आणि वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तोही प्रागमध्येच. टॉम अ‍ॅण्ड जेरीपेक्षा ‘सिडनी’ आणि ‘पोपेय’साठी जर जीन डाइच अधिक ओळखले गेले, तर सचेतपट या कलेचे भोक्ते जाणकार आहेत, याची खात्री पटेल. पण तसे होत नाही. जीन डाइच आधी अमेरिका आणि वयपरत्वे जग सोडतात.. मक्तेदारांचा खेळ मात्र सुरूच राहतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2020 12:03 am

Web Title: gene deitch profile abn 97
Next Stories
1 मधुकर जोशी
2 फिलिप अँडरसन
3 सी. बी. नाईक
Just Now!
X