एखाद्या वैज्ञानिकास हेर समजून संशय घेतला जाण्याची वेळ येणे हे दुर्मीळ, पण तसा प्रसंग एरिक लॅम्बिन यांच्यावर आला होता. पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो येथे ते क्षेत्रीय संशोधनासाठी गेले होते. त्यावर त्यांचा पीएच.डी.चा अभ्यास अवलंबून होता, पण श्वेतवर्णीय असल्याने त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले गेले. त्यांची ओळख ही पर्यावरणशास्त्रज्ञ, भूगोल वैज्ञानिक व प्राध्यापक अशी बहुआयामी आहे. लॅम्बिन यांना अलीकडेच साडेचार लाख डॉलर्सचा ब्लूप्राइझ पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरण-शास्त्रातील नोबेलच्या समकक्ष हा पुरस्कार मानला जातो. पर्यावरणाचे जटिल प्रश्न सोडवणाऱ्या संशोधकांना तो दिला जात असतो. जमिनींच्या वापरातील बदल, त्याचे पर्यावरणावर परिणाम या सर्वागीण अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. लॅम्बिन यांचे वेगळेपण असे की, सामाजिक-आर्थिक माहितीची वेगळी मांडणी त्यांनी केली. त्यातून दूरसंवेदन उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे जमीन वापरातील नव्या बदलांचे स्वरूप शोधून काढले. अर्थव्यवस्थांच्या जागतिकीकरणानंतर झालेले हे बदल टिपण्याचे हे काम कुणी केलेले नाही, त्यातून या संशोधनातील त्यांची कल्पकता दिसून येते. जंगलतोड, वणवे, वाळवंटीकरण व कीटकांमुळे होणारे रोग या सर्व पातळ्यांवरचे मानवाच्या पर्यावरण ज्ञानाच्या कक्षा त्यांच्या संशोधनामुळे रुंदावल्या आहेत. गेली किमान तीन दशके एरिक यांनी विज्ञानच नव्हे तर त्या अनुषंगाने धोरण व निर्णयप्रक्रियेतील बदलांचा मागोवा घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे वन प्रमाणीकरण कार्यक्रम, हरित खरेदी याला उत्तेजन मिळाले. भूगोलाचा अभ्यास करताना त्यांनी बराच काळ आफ्रिकेत घालवला. तो केवळ संशोधनाचा नव्हे तर त्यांच्या आवडीचा भाग होता. मानव-पर्यावरण यांच्यातील आंतरसंवादी क्रिया त्यांनी शोधून काढल्या. त्यांना नवे प्रश्न पडत गेले व ती आव्हाने त्यांनी पेलली. निसर्गाचे संवर्धन करून मानवी समुदायाची संस्कृती कशी फुलवता येईल या एकाच विचाराने ते प्रेरित आहेत. स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापकी आणि संशोधन या दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत आहेत. चॉकलेटपासून पाम तेलापर्यंत सर्व उत्पादनांमध्ये जमिनीची कमीत कमी हानी झाली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. समाज व निसर्ग यांच्यातील व्यवहारात सच्चेपणा आला पाहिजे. व्यापारी हेतू बाजूला पडले तरच राजकीय व भौगोलिक सीमांपल्याड जाऊन लॅम्बिन यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.