ते शाळेत शिकत असताना एकदा द लंडन सिंफनी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला होता. जादूसारखा परिणाम त्या लहानग्या मुलावर झाला. नव्वद स्त्री-पुरुष वादकांनी त्यांच्या पितळी व लाकडी साधनांमधून ध्वनीची जी सुरावट जमवली ते कर्णमधुर ध्वनिरसायन त्यांना लागू पडले. तेव्हापासून त्यांच्यात संगीताची आवड निर्माण झाली. त्यांचे नाव सर जॉर्ज मार्टिन. ब्रिटिश लोकप्रिय संगीतात त्यांनी बीटल्सच्या माध्यमातून साठ वर्षे अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने पॉप म्युझिकचा एक मंतरणारा काळ पडद्याआड गेला. त्यांनी ७०० ध्वनिमुद्रिकांची निर्मिती केली, काही चित्रपटांची गाणी लिहिली व बुद्धिमान संगीतकारांची पिढी घडवली. ध्वनिसंगीताची उत्तम जाण व प्रयोगशीलता ही त्यांची वैशिष्टय़े. त्यातून त्यांनी अद्भुत निर्मिती केली. बीटल्समधील मॉप टॉपपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास वेगळा होता. इतरांना जी वाद्ये अगदी किरकोळ वाटायची त्यातून त्यांनी वेगळे ध्वनिसंगीत निर्माण केले.
लंडनमध्ये कामगार कुटुंबात त्यांचा १९२६ मध्ये जन्म झाला. संगीतकार होण्याचे त्यांनी शाळेतील एका कार्यक्रमामुळे ठरवले होते पण मधला काही काळ त्यांनी वैमानिक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते गिल्डॉल स्कूल ऑफ म्युझिकमध्ये दाखल झाले त्या वेळी त्यांना सुरावटीही माहिती नव्हत्या. पदवीनंतर ते काही काळ बीबीसीच्या शास्त्रीय संगीत विभागात काम करीत होते. पालरेफोन लेबलसाठी त्यांनी शिर्ले बॅसी, मॅट मोन्रो यांच्याबरोबर काम केले ती बिटल्सची पहिली ध्वनिमुद्रिका. जॉनी डंकवर्थ व हंफ्रे लेटेलटन यांच्याबरोबर त्यांनी जॅझ बॅण्डची रंगत वाढवली. बेरनार्ड क्रिबन्स, पीटर सेलर्स, सोफिया लॉरेन यांच्या समवेत त्यांना लोकप्रियतेची शिखरे गाठता आली. १९६२ मध्ये ब्रायन एपस्टेन यांनी त्यांची ओळख लिव्हपडलियनच्या चौघांशी करून दिली. त्यांना अनेक संगीतकारांनी नाकारले होते पण मार्टिन मात्र त्यांच्या संगीतातील नैसर्गिक प्रेरणेने आकर्षित झाले, त्यांनी बीटल्सबरोबर करार केला. त्यानंतर लव्ह मी डू हे गाणे लोकप्रिय केले. नंतर आठ वर्षे त्यांनी फॅब फोरला मार्गदर्शन केले, त्या वेळी आय वॉन्ट टू होल्ड युवर हॅण्ड हे गाणे नव्या प्रयोगांनी गाजले. संगीत निर्माते ते संगीतकार असा त्यांचा प्रवास नागमोडी वळणे घेत गेला. काही लोक म्हणतात बीटलने सगळे काही केले, काही जणांच्या मते ती मार्टिन यांची जादू होती पण जॉन लेनॉन यांच्या मते ते एकमेकांच्या साहचर्यातून शिकत बनलेले संगीताचे अजब रसायन होते. मार्टिन व त्यांच्या ध्वनी अभियंत्यांनी असे तंत्र तयार केले की, ज्यातून अनेक सुरावटींचे मार्ग एकत्र करून एकच उत्तम सुरावट जन्म घेत असे. ध्वनी किंवा आवाजाचा पोत त्यांनी बदलण्याची किमया साधली. ल्युसी इन द स्काय गीतात तो परिणाम दिसतो.