एमटीव्ही या संगीतवाहिनीच्या निर्मितीने संगीतातील कानसंस्कृतीला मुळापासून बदलले. संगीत प्रेक्षणीय करून लोकप्रिय करण्याची सुरुवात १९८०च्या दशकात एमटीव्हीमुळे झाली. त्या दशकाने घडवलेल्या कलाकारांत जसे मायकेल जॅक्सनचे नृत्यगीत दर्शन लोकांनी उचलले, तसेच जॉर्ज मायकेल या ब्रिटिश गायकाच्या गीतांनाही डोक्यावर घेतले. सोमवारी (२६ डिसेंबर) दिवंगत झालेले जॉर्ज मायकेल यांचे नाव एमटीव्हीने घडविलेल्या पॉपस्टार्सच्या पहिल्या फळीमध्ये घेतले जाते.

गॅरेजमध्ये बॅण्ड वाजवीत, लोकल क्लबात गाऊनही रेकॉर्ड करार मिळवीत आणि गावोगाव फिरस्ती करून आपल्या गाण्यांचा प्रसार करीत लोकप्रियता खिशात घालणाऱ्या अमेरिकेतील एल्व्हिस प्रेस्ले आणि ब्रिटनमधील बिटल्स ग्रूप्सच्या चलनी गाण्यांना उतार लागला तेव्हा एमटीव्हीची सुरुवात झाली. युरोपातील रॉक्सेट बॅण्डचा जॉयराइड अल्बम, पोलीस बॅण्डचा फॉर्मेशन हा अल्बम जोमात असताना जॉर्ज मायकेलचा उदय झाला. उत्तर लंडन भागात तारांकित ग्रीक हॉटेलचालक आणि नामांकित ब्रिटिश नृत्यांगनेच्या पोटी जन्म घेतलेल्या जॉर्जचे लहानपण चटकारहित अवस्थेत सहजसुंदर गेले. पैशामुळे सारे मिळाले; फक्त पालकांचे प्रेम आणि कौतुक यांच्यापासून त्याला कायम वंचित राहावे लागले. परिणामी एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर केले, तेव्हा मित्र आणि संगीतात त्याने स्वत:ला बुडवून घेतले. तेव्हाच्या संगीत कुतूहलानुसार आणि गल्लोगल्लीच्या तरुणांमध्ये सळसळत्या संगीताचे बॅण्डमध्ये रूपांतर होण्याच्या शिरस्त्याप्रमाणे अ‍ॅण्ड्रय़ू रिगली या मित्रासोबत त्यानेही संगीत चमू तयार केला. त्याचे स्थानिक अस्तित्व अल्पकाळ टिकले. मात्र त्यानंतर त्याने स्थापलेला ‘व्हॅम’ हा दुसरा बॅण्ड लोकप्रिय झाला. स्थानिकता मोडून युरोपातील चांगल्या कलाकारांमध्ये ‘व्हॅम’चे नाव घेतले जाऊ लागले. त्यांच्या गाण्यांच्या लोकप्रियतेने त्यांना १९८०च्या दशकात जागतिक कन्सर्ट करण्याची संधी मिळाली.

मात्र लोकप्रियतेच्या शिखरावरून बॅण्ड काडीमोडाच्या एमटीव्ही काळात सुरू झालेल्या परंपरेला अनुसरून जॉर्ज मायकेल स्वतंत्ररीत्या अल्बम घेऊन दाखल झाला. त्याच्या लास्ट ख्रिसमस, फेथ या गाण्यांची हिंदी व्हर्जने आपल्याकडे रोजच वाजणारी गोष्ट बनली. या काळात बंडखोरी आणि पॉप म्युझिक हातात हात घालून आली होती. प्रेमाच्या ऊरबडव्या गीतांपेक्षा नाती-विघटनातील वास्तवता गाण्यांमधून मांडणारी गीतकार-संगीतकारांची नवी पिढी एमटीव्हीच्या जगभरातील दर्शकांकडून नावाजली जात होती. जॉर्ज मायकेलने बॅण्ड सोडून जो लौकिक प्राप्त केला, तोच पोलीस बॅण्डशी घटस्फोट घेऊन स्टिंग या कलाकारानेही मिळविला. पण स्टिंग याने आपल्या गानसातत्याने तो टिकविला. जॉर्ज मायकेल याने मात्र फक्त ड्रग्ज, अरेरावी आणि नाठाळ उद्योगांनी सतत टॅब्लॉइड वृत्तपत्रांना मथळे प्राप्त करून दिले. एमटीव्हीच्या संगीतअस्त काळानंतर यूटय़ूब संस्कृतीने तयार केलेल्या संगीत वादळात त्याची आठवण ‘व्हॅम’ आणि १९९०च्या स्वतंत्र हिट्सपुरती शिल्लक राहिली होती. आता, बऱ्याच वर्षांच्या भूमिगत अवस्थेनंतरच्या अकाली मृत्यूनंतरही त्या हिट्सच त्याची आठवण राहतील.