मानवजातीसाठी वरदान मानल्या जाणाऱ्या संततिप्रतिबंधक (गर्भनिरोधक) गोळ्यांची निर्मिती शक्य करण्यासाठी जे सुरुवातीचे संशोधन झाले त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे जॉर्ज रोझेनक्रान्झ यांचे नुकतेच निधन झाले. रोझेनक्रान्झ हे रसायनशास्त्रज्ञ तर होतेच, त्यातही त्यांचे विशेष क्षेत्र हे स्टेरॉइडशी संबंधित होते. गर्भनिरोधक गोळ्यांतील प्रोजेस्टिनचे संश्लेषण करण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. याशिवाय हृदयाच्या संधिवातात वापरल्या जाणाऱ्या कॉर्टीसोन हे रसायन वेगळे काढण्यात त्यांनी यश मिळवले होते.

त्यांचा जन्म १९१६ मध्ये हंगेरीत बुडापेस्ट येथे झाला. त्यांनी स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या झुरिच येथील संस्थेतून रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. नोबेल विजेते लिओपोल्ड रूझिका हे त्यांचे मार्गदर्शक. झुरिचच्या नाझी समर्थकांपासून रोझेनक्रान्झ व इतर ज्यू वैज्ञानिकांना रूझिका यांनीच वाचवले होते. अखेर, युद्धकाळात क्युबामध्ये त्यांनी आश्रय घेतला. तेथे अनेक रुग्णांवर उपचार करीत, संप्रेरक वेगळे करण्याच्या शास्त्रात ते निष्णात झाले. मेक्सिको सिटी येथील एका कंपनीत ते कार्यरत असताना त्यांनी प्रोजेस्टेरॉन वेगळे करण्याचे संशोधन पार पाडले. ‘गर्भनिरोधक गोळीचे जनक’ ठरलेले कार्ल जेरासी यांच्यासह एका संशोधक गटाला त्यांनी आमंत्रित केले होते. ही गोळी तयार करण्यापूर्वी ज्या रासायनिक प्रयोगांची मालिकाच सामोरी येते त्यात रोझेनक्रान्झ यांनी केलेल्या प्रयोगांचा उल्लेख केल्यावाचून पुढे जाता येत नाही, इतके त्यांचे संशोधन महत्त्वाचे होते. पुढे अमेरिकेत स्थायिक झाल्यावर, ‘ही गोळी म्हणजे अपघाताने लागलेला शोध नव्हता. अनेक लोकांनी केलेल्या प्रयत्नांचे ते फळ होते,’ असे रोझेनक्रान्झ सांगत. नैसर्गिक संप्रेरकांची कृत्रिम रूपे तयार करण्याचे स्वप्न त्यांनी आधीपासूनच पाहिले होते त्यात ते यशस्वी झाले. कॉर्टीसोन तयार करणे खूप कष्टाचे असते, पण ते काम त्यांनी सोपे केले.

डॉ. रोझेनक्रान्झ  व त्यांचे सहकारी कार्ल जेरासी व लुईस मिरमाँटेस यांनी प्रोजेस्टेरॉनचे नोथिनड्रोन हे कृत्रिम रूप तयार केले. त्याचा वापर खरे तर गर्भपात टाळण्यासाठी अपेक्षित होता, पण नंतर त्याचाच वापर गर्भनिरोधासाठी करण्यात आला. एखादी महिला गर्भवती असताना पुन्हा गर्भवती का होत नाही, असा प्रश्न विचारून रोझेनक्रान्झ यांनीच त्याचे उत्तर दिले होते; ते म्हणजे प्रोजेस्टेरॉन. या संप्रेरकामुळे अंडपेशी रोखल्या जातात. यातूनच गर्भनिरोधक गोळ्यांचा जन्म झाला. नाझींच्या तावडीत अडकण्यापूर्वीच ते सुटून मेक्सिकोत आले नसते तर या सगळ्या कल्याणकारी संशोधनाला आपण मुकलो असतो.