दरवर्षी जैवविविधतेला असलेल्या धोक्याची जाणीव करून देणारी प्राणी, पक्षी यांची यादी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था जाहीर करीत असते. पण ही यादी तयार करण्याची संकल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा त्याला कोणते निकष लावावेत हे ठरवणे अवघड काम होते. त्या काळात जैवविविधता क्षेत्रात अधिमान्यता पावलेल्या वैज्ञानिक जॉर्जीना मेस यांनी त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या निधनाने एका निसर्गप्रेमी वैज्ञानिकाला आपण मुकलो आहोत.

त्यांचा जन्म लंडनचा, प्राणिशास्त्रात पदवी घेऊन त्यांनी नंतर परिसंस्थाशास्त्राचा अभ्यास ससेक्स विद्यापीठातून केला. नंतर काही काळ त्या प्राणिशास्त्र संस्थेत संचालक होत्या. त्यांनी जैवविविधता व पर्यावरण संशोधन केंद्र युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे स्थापन केले होते. जगात प्राणी, वनस्पती यांचे अधिवास नष्ट झाल्याने काही प्रजाती धोक्यात येत असताना त्यांची यादी तयार करणाऱ्या १३०० वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश होता पण त्यात त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची होती. त्या रॉयल सोसायटीच्या फेलो होत्या व त्यांना ‘लिनियन’ पदकाचा मानही मिळाला. सध्या जगात एकूण ३२ हजार प्रजाती धोक्यात आहेत. दरवर्षी धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीमुळे निसर्ग संवर्धन धोरणाला दिशा मिळत असते. चित्ता व चिंपाझी यांच्या संवर्धनाची चर्चा नेहमी होत असते, पण इतर अनेक प्राणी असे आहेत की ज्यांच्या संवर्धनाची खूप जास्त गरज आहे हे त्यांनी दाखवून दिले होते. प्राण्यांची एखादी प्रजाती ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हे त्यांची संख्या, त्यांचा खंडित अधिवास, संख्यावाढीच्या शक्यता यावरून ठरवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. नंतर या घटकांचा धोक्यातील प्रजातींच्या यादीच्या निकषात समावेश केला गेला. विशेष म्हणजे इंटरनेट नसतानाच्या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेसाठी रात्रंदिवस काम केले, याचा त्यांना एकही पैसा मिळाला नव्हता. त्याचाच अर्थ त्यांनी केवळ निसर्गसंवर्धन  हेच श्रेयस व प्रेयस मानले होते. १९९६ मध्ये धोक्यातील प्रजातींच्या यादीत आफ्रिकन हत्ती, कॉड व ब्लूफिन मासे यांना स्थान मिळाले होते. त्यामुळे आता यांची मासेमारी करता येणार नाही म्हणून काही संस्था भडकल्या होत्या. पण ते विदारक सत्य मांडण्याचे धाडस त्यांनी केले. त्या खऱ्या अर्थाने निसर्गातील या जीवांच्या तारणहार होत्या. अत्यंत विद्वान पण नम्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जैवविविधतेचा वसा समाजानेच जपला तर ते काम अवघड नाही असे त्यांचे मत होते. आयुष्याच्या अखेरीस ऑक्सफर्डशायर येथे निसर्गाच्या कुशीत  त्या राहात, एकटय़ाच. त्यांचे निधन १९ सप्टेंबर रोजी झाल्याची वार्ता, ऑक्टोबरातच सर्वाना समजली.