आपण सध्या संगणकात माहिती साठवण्यासाठी ज्या हार्ड डिस्क वापरतो त्यांचा आटोपशीर झालेला आकार हा भौतिकशास्त्रात झालेल्या संशोधनाचा एक चांगला परिणाम आहे. संगणकाच्या माहिती साठवण्याच्या तबकडय़ांचे आटोपशीर रूप तयार करण्यात मोठा वाटा असलेले जर्मनीचे पदार्थवैज्ञानिक पीटर ग्रूएनबर्ग यांचे नुकतेच निधन झाले. सहकाऱ्यांसाठी एक चांगला मार्गदर्शक, आयुष्याच्या अंतापर्यंत अध्यापनातून ज्ञान वाटून देण्याची आस हे त्यांचे गुण होते. पूर्वाश्रमीच्या चेकोस्लोव्हाकियात जन्मलेले जर्मन या नात्याने त्यांनी स्थलांतरितांची दु:खे अनुभवली. मात्र युद्धपूर्व बालपणीच्या आठवणींत रमणे त्यांना आवडत असे. शाळेत असताना भूगोलाच्या तासाला त्यांना फिरणाऱ्या ग्रहांचे सादरीकरण बघायला मिळाले होते. ‘असे विचित्र वर्तन का घडत असावे’ याचे कोडे बाल-पीटरना पडले, त्या वेळी त्यांचे शिक्षक असलेल्या डॉ. रॉडरर यांनी त्यांना हे सगळे कसे घडते, ते समजावून सांगितले. त्यातून त्यांचे भौतिकशास्त्राचे प्रेम निर्माण झाले ते कायमचे. शाळेत असेपर्यंत त्यांना खेळ व संगीताची भरपूर आवड, शैक्षणिक कामगिरी मात्र बेतास बात अशीच. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी फ्रँकफर्ट विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी मिळवून पुढचे शिक्षण त्यांनी डार्मष्टाट तंत्रज्ञान विद्यापीठातून घेतले. मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूटसह अनेक चांगल्या संस्थांमध्ये काम करताना प्रा. वेर्नर झीन यांनी त्यांना चुंबकत्वाविषयीच्या संशोधनाकडे वळवले. यातील प्रयोगांतून जे काही संचित पुढे आले त्यातून काही गिगॅबाइट माहितीचा संचय शक्य झाला. त्यांनी शोधलेल्या तंत्राचे नाव होते, ‘जायंट मॅग्नेटोरेझिस्टन्स’. त्यातून हार्ड डिस्कचा छोटा अवतार जन्मला. ग्रूएनबर्ग यांना फ्रेंच वैज्ञानिक अल्बर्ट फर्ट यांच्याबरोबर १९८८ मध्ये जायंट मॅग्नेटोरेझिस्टन्स परिणामाच्या शोधासाठी नोबेल मिळाले.

आकार छोटा, पण माहिती संचयक्षमता प्रचंड, हा त्यांच्या संशोधनाचा आविष्कार. त्याशिवाय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आजचे लहान आकाराचे संगणक, स्मार्टफोन यांची निर्मिती होणे शक्य नव्हते. त्यांना २००६ मध्ये युरोपियन इन्व्हेन्टर ऑफ दि इयर पुरस्कार युरोपीय समुदायाने दिला होता, तर १९८९ मध्ये जर्मनीच्या अध्यक्षांनी फ्यूचर पुरस्काराने गौरवले होते. लहानपणी भौतिकशास्त्रात ‘ब श्रेणी’तही समाधान मानणाऱ्या ग्रूएनबर्ग यांनी संशोधनात मात्र खूप मोठा पल्ला गाठला. नोबेल मिळाले तेव्हा ते भारावून गेले हे खरे, पण एक दिवस नोबेल मिळवण्याची सुप्त इच्छा त्यांच्यात होती. ती पूर्ण झाली. अखेरच्या क्षणापर्यंत भौतिकशास्त्राचे अध्यापनही त्यांनी केले. अनेक विद्यार्थीही त्यांनी घडवले आहेत.