18 July 2019

News Flash

गॉर्डन बँक्स

वयाच्या ८१व्या वर्षी बँक्स यांचे नुकतेच निधन झाले.

गॉर्डन बँक्स

फुटबॉलची जन्मभूमी असलेल्या इंग्लंडने आजवर केवळ एकदाच विश्वचषक जिंकला, तो १९६६मध्ये. त्या संघात एकाहून एक सरस फुटबॉलपटू होते. आक्रमण, मधली फळी, बचावफळी अशा सगळ्याच स्तरांवर मातबर खेळले. त्या संघाचे गोलरक्षक होते, गॉर्डन बँक्स. ते सगळ्या सामन्यांतून खेळले आणि अंतिम सामन्यात एकीकडे इंग्लंड प्रतिस्पर्धी जर्मनीवर चार गोल डागत असताना, जर्मनीच्या आक्रमणांना थोपवून धरत बँक्स यांनी केवळ दोनच गोल होऊ दिले. पण गोलरक्षक म्हणून त्याहीपेक्षा मोठी आणि बहुचर्चित कामगिरी बँक्स यांच्याकडून १९७०मधील विश्वचषक स्पर्धेत घडली. बलाढय़ ब्राझीलविरुद्ध (ती स्पर्धा ब्राझीलने जिंकली) एका साखळी सामन्यात साक्षात पेलेंना थोपवण्याची मोठी जबाबदारी इंग्लिश बचावफळी आणि बँक्स यांच्यावर होती. सामन्यातील एका क्षणाचे वर्णन पेलेंनीच केले आहे – ‘‘मी डोक्याने चेंडू गोलजाळ्यात धाडला. एक फुटबॉलपटू म्हणून तुम्हाला पक्के ठाऊक असते की, तुम्ही किती ताकदीने चेंडू मारला. त्या हेडरविषयी मी निशंक आणि आश्वस्त होतो. गोल झालाच होता, जवळपास.. पण तितक्यात कुठूनसा बँक्स अवतरला. निळ्या भुतासारखा. भूतच तो, कारण अचानक प्रकटला. मी एकदम ओरडलो, ‘गोल’. आणि माझ्या नजरेसमोर त्याने चेंडू उजव्या गोलपोस्टबाहेर ढकलला!’’ बँक्स यांच्या त्या कामगिरीला आजतागायत ‘सेव्ह ऑफ द सेंच्युरी’ म्हणून ओळखले, नावाजले जाते. पेलेंचा फटका त्यांनी अक्षरश एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत सूर मारत रोखला. चेंडूने टप्पा घेतला होता, तेव्हा तो नुसता थोपवता येणार नाही याची बँक्स यांना कल्पना होती. तो बाहेर घालवणे अत्यावश्यक होते. बोटांच्या टोकांच्या आधारे बँक्स यांनी तसे करून दाखवले. बाकीचे थक्क झाल्यानंतरही बँक्स चटकन उठले आणि ब्राझीलला मिळालेली कॉर्नर किक वाचवण्यासाठी सज्ज झाले. पेले तो क्षण कधीही विसरू शकले नाहीत. बँक्सनाही नंतर प्रत्येक वेळी १९६६मधील जगज्जेतेपदाऐवजी, त्या बचावाविषयीच विचारले जायचे. वयाच्या ८१व्या वर्षी बँक्स यांचे नुकतेच निधन झाले. १५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गॉर्डन बँक्स ७३ आंतरराष्ट्रीय सामने आणि ६२८ क्लब सामने खेळले. कारकीर्दीच्या अखेरीस त्यांच्या दोन्ही पंजांना मिळून जवळपास दहा मोठय़ा जखमा झाल्या. ते व्रण बँक्स अभिमानाने मिरवायचे. पण कोटय़वधी फुटबॉलरसिकांसाठी मात्र त्यांनी पेलेंविरुद्ध केलेला अद्भूत बचावच बँक्स यांचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी पुरेसा होता.

First Published on February 19, 2019 2:45 am

Web Title: gordon banks profile