ते कायद्याचे प्राध्यापक; पण त्यांची ख्याती मात्र ‘ग्रीनिंग ऑफ अमेरिका’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे झाली. या पुस्तकाच्या २५ आवृत्त्या निघाल्या आहेत, किमान २० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकामुळेच चार्ल्स राइश या नावाभोवती एक वलय निर्माण झाले आणि याच पुस्तकामुळे चार्ल्स राइश हे वादग्रस्तही ठरले. त्या साऱ्या बौद्धिक वादांना तोंड देऊन झाल्यावरही बुद्धी तल्लखच ठेवून ते जगले आणि १५ जून रोजी, म्हणजे गेल्या शनिवारी झालेल्या त्यांच्या मृत्यूची बातमी जगाला १८ जून रोजी समजली.

‘ग्रीनिंग ऑफ अमेरिका’ हे पुस्तक म्हणजे ‘अमेरिकन लोकांच्या जाणीव-विकसनाचा इतिहास’! या इतिहासाचे तीन प्रमुख टप्पे त्यांनी कल्पिले आणि पुस्तकाची विभागणीदेखील या जाणिवांच्या किंवा कॉन्शसनेसच्या तीन टप्प्यांनुसार केली. यापैकी ‘कॉन्शसनेस-१’ हा नव्या खंडाकडे स्थलांतर होण्यापासून ते थॉमस जेफरसन यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या काळाने प्रभावित होऊन वाटचाल करू लागलेल्या अमेरिकेतील साधारण १९०० सालापर्यंतच्या काळाचा टप्पा. पुढला टप्पा हा विसाव्या शतकातील अमेरिकी औद्योगिक आणि भौतिक प्रगतीचा. तर तिसरा टप्पा, या प्रगतीत काही हशील नाही, हे जाणवलेल्या तत्कालीन तरुणाईचा. हा ‘कॉन्शसनेस-३’ म्हणजे, ‘हिप्पी’ होणे पसंत करणाऱ्या अमेरिकी पिढीच्या जाणिवा नेमक्या कशा आहेत, याचा अभ्यासू व तितकाच संवेदनशील आलेख! ‘तुम्ही व्यसनी पिढीचे उदात्तीकरण करताहात’, ‘वाया गेलेल्यांना महत्त्व देताहात’ अशी टीका त्यांच्या या पुस्तकावर होणे स्वाभाविकच होते, कारण ‘कॉन्शसनेस-३’ हीच जाणीव-विकासाची सर्वोच्च पायरी असल्याची भलामण १९७० सालच्या या पुस्तकात होती. पुढे अगदी अलीकडे, ‘कॉन्शसनेस-३’ ही निव्वळ त्या काळाची गरज होती, कदाचित आज तरुणांना पुन्हा रोजीरोटीचे भौतिक प्रश्नच सतावत असतील, अशी कबुली त्यांनी दिली.. पण पुस्तकातील त्यांची मांडणी वाचनीय आहेच, यावर वाचकांनी तोवर शिक्कामोर्तब केले होते. आजही हे पुस्तक त्यांच्या अन्य तीन पुस्तकांपेक्षा महत्त्वाचे मानले जाते. समलैंगिकत्वाची कबुली देणारे आत्मचरित्र, ‘गार्सिआ’ हे व्यक्तिपर पुस्तक आणि ‘अपोझिंग द सिस्टीम’ हा लेखसंग्रह अशी त्यांची प्रकाशित पुस्तके. पण यापेक्षा, ‘द न्यू प्रॉपर्टी’ (१९६४), ‘इंडिव्हिज्युअल राइट्स अ‍ॅण्ड सोशल वेल्फेअर’ (१९६५), ‘द लिबरल्स मिस्टेक’ (१९८७) हे त्यांचे दीर्घनिबंध अधिक परिणामकारक ठरले. यापैकी पहिल्या दोन निबंधांचा प्रभाव पुढे अमेरिकी न्याय-निवाडय़ांवरही दिसला. कायद्याचा सखोल विचार करताना ‘मुक्त समाज’ त्यांनी केंद्रस्थानी मानला.

जन्म १९२८, ‘येल लॉ जर्नल’चे १९५१ साली (२२व्या वर्षी!) संपादक, नंतर वॉशिंग्टनमधील न्यायाधीशांचे सहायक, १९६० ते १९७४ येल विद्यापीठात बिल आणि हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेकांचे प्राध्यापक, पुढे कॅलिफोर्नियातील तीन विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक, अशी कारकीर्द करून १९९१-९४ दरम्यान ते पुन्हा ‘येल’मध्ये शिकवू लागले. ‘माझे लैंगिक प्राधान्यक्रम कोणते, यावरून मला कृपया एका समूहाचा भाग म्हणू नका. मी कोणत्याही समूहाचा नाही, कोणाच्याही बरोबर मी नाही. मी एकटा आहे. असे एकटे बरेच आहेत, त्यांच्यापैकी मी- असे म्हणा हवे तर’ या शब्दांतून त्यांची जीवनदृष्टीही व्यक्त होते.