09 July 2020

News Flash

गुलाबबाई संगमनेरकर

‘लावणीसम्राज्ञी’ या पदवीला साजेसे कार्य असणाऱ्या गुलाबबाईंनी आपले सारे आयुष्यच लावणीसाठी वाहून घ्यायचे ठरवले.

गुलाबबाई संगमनेरकर

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेच्या परंपरेमध्ये लावणी या प्रकाराला सम्राज्ञीचे स्थान मिळाले आहे. मातीतून उगवलेल्या या लोकसंगीताला त्या त्या भूप्रदेशातील सांस्कृतिक परंपरांचा भक्कम आधार असतो. परंपरेतच नवतेचा अंकुर निर्माण होतो आणि त्यातून नव्या कलाप्रकारांचा उगम होतो. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात मानाचे पान लाभलेल्या लावणीला आपल्या कर्तृत्वाने जिवंत ठेवण्याचे काम करणाऱ्या अगदी महत्त्वाच्या कलाकारांपैकी एक म्हणजे गुलाबबाई संगमनेरकर! ‘लावणीसम्राज्ञी’ या पदवीला साजेसे कार्य असणाऱ्या गुलाबबाईंनी आपले सारे आयुष्यच लावणीसाठी वाहून घ्यायचे ठरवले. निर्णय योग्य असला, तरी तो निभावणे मात्र महाकर्मकठीण. वयाच्या नवव्या वर्षी संगीतबारीमध्ये काम करण्यास प्रारंभ केलेल्या गुलाबबाईंनी आपल्या कलाविष्काराचा गुलाब फुलविला आणि त्याचा सुगंध रसिकांना दिला.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर दिल्लीमध्ये सादर झालेला लावण्यांचा कार्यक्रम, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ‘आजोळची गाणी’ या अल्बममध्ये ‘राजसा जवळी जरा बसा..’ या लतादीदींच्या स्वरातील लावणीला गुलाबबाई यांची अदा जशी लक्षात राहिली, तशीच ‘रज्जो’ या चित्रपटामध्ये कंगना राणावत या अभिनेत्रीसमवेत त्या रुपेरी पडद्यावरील त्यांची छबीही. परंतु ही झाली यांची सार्वजनिक ओळख. कलाकाराच्या आयुष्यामध्ये अनेक

चढउतार असतातच. कलेच्या वैभवाचे दिवस असतात, त्याप्रमाणे आयुष्यामध्ये खस्ताही खाव्या लागतात. गुलाबबाई त्याला अपवाद ठरल्या नाहीत. दोन मुलांच्या अकाली निधनानंतरही गुलाबबाई खचल्या नाहीत. त्यांनी आपले सर्वस्व कलेलाच वाहून टाकले. या वयातही गुलाबबाई यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

गुलाबबाई यांचा जन्म १९३३ सालचा. लावणीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या आईची स्वत:ची संगीत पार्टी होती. त्यामुळे कलेचे बाळकडू आईकडून मिळाले. लहान वयातच रंगमंचावर आलेल्या गुलाबबाई यांनी फडाच्या तमाशातही काम केले. खान्देशमधील आनंदराव महाजन यांच्या तमाशात त्यांनी उमेदीच्या काळात बरीच वर्षे काम केले. या पार्टीचा एकेका गावामध्ये कधी आठ दिवस, तर कधी महिनाभरही मुक्काम असायचा. पुढे तमाशासम्राट तुकाराम खेडकर पार्टीमध्ये काम केल्यानंतर गुलाबबाईंनी स्वत:ची संगीतबारी सुरू केली. कालांतराने पुण्याच्या आर्यभूषण थिएटरमध्ये काम केले. प्रकाश इनामदार आणि जयमाला इनामदार यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाटय़ामध्ये त्यांनी पार्श्वगायन केले. बहीण मीरा हिच्यासमवेत आर्यभूषण थिएटरमध्ये ‘गुलाब-मीरा संगमनेरकर’ या नावाने स्वतंत्र पार्टी सुरू केली. गुलाबबाई यांचे गायन आणि मीराचा नृत्याविष्कार हे या पार्टीचे वैशिष्टय़ होते.

तमाशाचे अर्थकारण बिघडत चालले आहे. कलावंत कर्जबाजारी झाले आहेत. अशा कलावंत आणि तमाशा फडांसाठी गुलाबबाईंचा जीव आजही तुटतो. वयामुळे स्वत: फारसे काही करू शकत नसलो, तरीही ही परंपरा टिकवून ठेवण्याचा त्यांचा ध्यास मात्र अजूनही तेवढाच उत्साही आहे. कन्या वर्षां संगमनेरकर यांच्या हाती लावणीची ही परंपरा सोपवताना त्यांना भविष्याची चिंता असणारच. परंतु तरीही त्यांनी आपला ध्यास सोडलेला नाही. राज्य शासनाने गुलाबबाई संगमनेरकर यांना ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करून त्यांच्या कलेचा गौरव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:01 am

Web Title: gulabbai sangamnerkar profile abn 97
Next Stories
1 रॉबर्ट झाटोरी
2 डॉ. रतन लाल
3 गुलजार देहलवी
Just Now!
X