News Flash

हान्स मॉम्सेन

विचारवंत ‘वादग्रस्त’ असतो, यात वाईट काहीही नाही.

हान्स मॉम्सेन

विचारवंत ‘वादग्रस्त’ असतो, यात वाईट काहीही नाही. उलट, संशोधन आणि अभ्यास यांच्या आधारे वाद उभे करणे; त्या वादांतून नव्या ‘तत्त्वबोधा’कडे जाण्याच्या दिशा आणि मार्ग खुले करणे, हेच तर विचारवंतांचे काम असते. हे काम चोखपणे करणारे जर्मन इतिहासकार हान्स मॉम्सेन ५ नोव्हेंबर रोजीच दिवंगत झाले. त्यांचे कार्य सामाजिक शास्त्रांमध्ये उत्तुंगच असले, तरी इतिहासातला त्यांचा भर केवळ ‘नाझी जर्मनी’वरच असल्यामुळे भारतात त्यांच्या निधनाचीही खबरबात नसणे साहजिकच होते.

हिटलर या नावामागे आजही इतके गूढवलय आहे की, एखाद्या हुकूमशहा – अल्पसंख्याकविरोधी – बहुविधताविरोधी असलेल्या नेत्याला आजही ‘हिटलर’ ठरवले की टीकाकारांचे काम भागते! ते गूढवलय हान्स माम्सेन यांनी टराटरा फाडून काढलेच, वर ‘हिटलर हा हुकूमशहा म्हणून अशक्तच होता’ असे वादग्रस्त ठरणारे विधानही त्यांनी अत्यंत गांभीर्याने केले. ‘जर्मनीप्रमाणेच युरोपात अन्यत्रही (ब्रिटन, फ्रान्स) ख्रिस्त्यांमध्ये १९३० पर्यंत ज्यूविरोधी भावना होती; पण जर्मनीत या द्वेषभावना भडकावून राजकीय यश मिळालेल्या हिटलरला, ज्यूंचे पुढे काय करायचे हे कळत नव्हते. ज्यूसंहारासाठी छळछावण्या काढा, असे हिटलरने- लेखी अथवा तोंडीसुद्धा- अजिबात सांगितले नव्हते. या छावण्या १९४१ साली, कमिसारच्या आदेशाने जेव्हा सुरू झाल्या, तोवर हिटलरने जी भाषणे केली ती ‘आदर्श भूमी’ची होती आणि त्यांतून योग्य तो अर्थ काढून ज्यूंचा वंशविच्छेद हेच हिटलरच्या मनाप्रमाणे वागणे आणि असे हे वागणे म्हणजेच देशप्रेम असे मानणारी नोकरशाही तयार झाली होती’ हे हान्स यांच्या ‘हिटलर आणि नोकरशाही’ या पुस्तकाचे सार. हिटलर हा ‘निर्णय चटकन न घेणारा, केवळ स्वत:ची प्रतिमा व प्रतिष्ठा जपणारा आणि भोवतीच्या कोंडाळ्याचे ऐकणारा’ होता, असे हान्स यांनी दाखवून दिले. शिवाय, ‘ हिटलरशाहीच्या राजकीय विरोधकांनी काही कारवायाही करून पाहिल्या, परंतु लोकांनी त्यांना निष्प्रभ ठरविले’ याचा साधार अभ्यासदेखील हान्स यांनी केला. या सर्वापेक्षा, ‘हिटलरसाठी लोकांनी क्रूरकर्मे का केली,’ या प्रश्नाचे जे उत्तर हान्स मॉम्सेन यांनी हिटलरशाहीच्या साद्यंत अभ्यासातून शोधले, ते कोणत्याही देशातील / काळातील सत्प्रवृत्त लोकांनी लक्षात ठेवावे असे आहे : ‘राज्यातील (न्यायिक आणि लोकप्रातिनिधिक) संस्था कमकुवत केल्या जातात आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांचे समर्थन लोक करताहेत हे दिसत राहते, तेव्हा एरवी सज्जनच असणारी माणसेसुद्धा बहकतात!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 12:42 am

Web Title: hance momsen profile
Next Stories
1 ओमप्रकाश मेहरा
2 रेने गिरार्ड
3 वसंत वानखेडे
Just Now!
X