21 September 2020

News Flash

हान्स रोसलिंग

स्वीडनमधल्या कॅरोलिन्स्का वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्राध्यापकी करणाऱ्या हान्स रोसलिंग यांचा विषय होता

स्वीडनमधल्या कॅरोलिन्स्का वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्राध्यापकी करणाऱ्या हान्स रोसलिंग यांचा विषय होता ‘जागतिक आरोग्य आणि उपचार’. पण त्यांनी केवळ आपल्या विषयापुरते न पाहता जगाकडेही पाहिले. यातून त्यांना प्रश्न पडत राहिले. जग खरोखरच बिघडत चालले आहे का? आर्थिक विषमता आणि आरोग्य यांचा नेमका काय संबंध आहे? आधुनिक घराघरांत पोहोचलेल्या तंत्रज्ञानाने काय फायदे होतात? गरिबीमुळे काय काय नि किती प्रकारचे नुकसान होऊ शकते? असे म्हटले तर साधेच, पण गांभीर्याने आजची उत्तरे शोधू गेल्यास गहन प्रश्न. त्यातही, हान्स सदा हसतमुख असले तरी प्रश्नांचे गांभीर्य ओळखणारे. त्यामुळे गेली दहा वर्षे प्राध्यापकी सोडून ते या आणि अशा अनेक प्रश्नांचाच वेध घेऊ लागले होते. त्यांची उत्तरेही मिळवू लागले होते. त्यासाठी त्यांनी सांख्यिकीचा शास्त्रशुद्ध अभ्यासाला संगणकीय सादरीकरण-तंत्राची जोड दिली होती. लोकांनाही प्रश्न पडत असतील म्हणून.. किंवा नसले पडत प्रश्न तर लोकांनी आपापले प्रश्न ओळखावेत या हेतूने, ते ‘टेड’ व अन्य उपक्रमांमधून व्याख्याने देत होते. लोकांना पडणारे प्रश्न किमान मांडले तरी जावेत, व्यक्त तरी व्हावेत आणि सांख्यिकीच्या आधाराने त्यांना उत्तरे जरी सापडत नसतील तरी या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तरी मिळावा, या हेतूने त्यांनी आधी ‘ ट्रेडॅनलायझर’ आणि पुढे ‘गॅपमाइंडर’ अशी संगणक-कार्यक्रमाधारित संकेतस्थळेही निर्माण केली होती.

..स्वस्थ न बसता हान्स हे सारे करीत होते. त्यामुळेच, ७ फेब्रुवारीला त्यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले, तेव्हा जागतिक महत्त्वाच्या प्रसारमाध्यमांचा सूर ‘थोर शिक्षक, उत्तम वक्ता आणि जगाकडे तथ्यांआधारे पाहायला शिकवणारा माणूस गेला’ असाच होता. सांख्यिकी शास्त्रातील काही अभ्यासकांनी हान्स फारच लोकप्रियतेकडे झुकताहेत आणि त्यासाठी अशास्त्रीय मार्ग वापरताहेत, अशी टीकाही यापूर्वी केलेली असली, तरी हान्स यांचे काम केवळ संख्याशास्त्रज्ञ या मापाने मोजता येणारे नव्हतेच. वैद्यकीय शिक्षण घेताना, त्या क्षेत्रातील संशोधनाचा हान्स यांचा विषय मोझाम्बिकमधील कुपोषणजन्य आजार हा होता. कुपोषणापायी मिळेल ते खाल्ल्याने होणारा, अर्धागवातासारखा अंग लुळे करणारा ‘कोन्झो’ हा तेथील आजार त्यांनी लक्षणांसह शोधून काढला. त्यावरील उपचारपद्धतीतही संशोधन केले. पण ‘रोग काही फक्त विषाणूंमुळे होत नाहीत.. ते गरिबीनेही होतात’ हे त्यांचे निरीक्षणच बलवत्तर ठरले. हान्स यांची काही विधाने कधी कधी वादग्रस्तही ठरत. जगात ‘विकनसशील देश’ वगैरे काही नाही, असे प्रतिपादन त्यांनी २००६ मधील व्याख्यानात- अर्थातच सांख्यिकीच्या आधारे- केले होते किंवा ‘जग गेल्या १०० वर्षांत सुधारलेच, त्याची ही घ्या पाच कारणे’ असे सांगणाऱ्या व्याख्यानात त्यांनी ‘आयुर्मर्यादा वाढली’, ‘स्त्रीशिक्षणाचे प्रमाण वाढले’ वगैरे लोकांना आधीपासून माहीत असणारेच मुद्दे मांडले होते. ‘वॉशिंग मशीनने- धुलाईयंत्राने आपल्याला काय दिले?- पुस्तके! किंवा पुस्तके वाचायला वेळ दिला!!’ यांसारखी वाक्ये त्यांनी उच्चारावीत आणि श्रोतृवर्गाने भरभरून दाद द्यावी, असे जरूर होत असे; पण या प्रकारची लोकप्रियता ही तात्पुरती ठरते.. तिचा दूरगामी परिणाम काहीच होत नाही. लोक बदलत नाहीत.

ते बदलावेत, यासाठी हान्स यांनी आणखीही काही केले असते. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने हान्स यांच्या अभ्यासूपणाचे मूल्य जाणले होते. ‘विंडोज’-प्रणेत्याच्या या न्यासासह अनेक देणगीदारांचे सामाजिक कार्य सल्लागार म्हणून हान्स यांनी हळूहळू प्रत्यक्ष कामाची सुरुवातही केली होती; पण स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांना गेल्याच वर्षी गाठले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले, तेही ‘आयुर्मर्यादा वाढली’ या त्यांच्याच प्रतिपादनाला छेद देऊन.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 2:50 am

Web Title: hans rosling
Next Stories
1 अ‍ॅलिस्टर कुक
2 विक्रम लिमये
3 जोगिंदर सिंग
Just Now!
X