तेलंगणाचे पाटबंधारेमंत्री टी. हरीश राव यांनी अलीकडेच राज्याचे माजी मुख्य अभियंता टी. हनुमंत राव यांच्या शिफारशीनुसार सर्व पाटबंधारे प्रकल्पांची फेरआखणी केली जाईल व काकतीय योजनेत छोटे पाटबंधारे सुरू केले जातील, असे नुकतेच जाहीर केले होते. हनुमंत राव हे केवळ माजी अधिकारी नसून जलतज्ज्ञ होते, यावर अनेक पुरस्कारांनी शिक्कामोर्तब केलेले असताना घरच्या राज्यात मात्र त्यांच्या योजना अमलात येत नव्हत्या. यापुढल्या काळात, सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी पाहण्यास राव असणार नाहीत. त्यांचे नुकतेच निधन झाले.

राव हे जल अभियांत्रिकीतील तज्ज्ञ होते. त्यांनी संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्य अभियंता म्हणून काम केले होते. जागतिक बँकेत ते पाटबंधारेतज्ज्ञ म्हणून तर आफ्रिकेत संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्पांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. राव यांनी असे प्रतिपादन केले होते, की रिव्हर्सिबल पंपांनी बँक वॉटर उचलता येऊ शकते तसेच जलविद्युतनिर्मितीसाठी पाण्याचा वापर कशा प्रकारे केला जावा याबाबतही त्यांनी सूचना केल्या होत्या. राव यांनी फोर वॉटर्स संकल्पना मांडली. हे चार प्रकारचे पाणी म्हणजे पावसाचे पाणी, मातीतील आद्र्रता, भूजल व भूपृष्ठावरील पाणी अशा चार प्रकारांत विभागलेले आहे. पाण्याची कमाल साठवण, पुनर्भरण व वापर यात त्यांनी अनेक नवीन तंत्रे सुचवली, हे त्यांचे या क्षेत्रातील मोठे काम होते. ‘वॉटर अ‍ॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट’ ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांना ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार’ व आंध्र सरकारचा विशिष्ट सेवा पुरस्कार मिळाला होता. निवृत्तीनंतरही सरकार, अनेक संघटना पाटबंधाऱ्यांच्या प्रकल्पात त्यांचा तंत्रज्ञान सल्ला घेत असत.

आंतरराज्य पाणीवाटपावरही त्यांचा सल्ला घेण्यात आला. कृष्णा, गोदावरी व कावेरी या नद्यांच्या आंतरराज्य पाणीवाटपावर त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. वादग्रस्त पोलावरम प्रकल्पात एकदम मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा छोटे बंधारे बांधावेत असे त्यांचे मत होते. त्याची अंमलबजावणी आता आंध्र प्रदेश सरकार करीत आहे. त्यांच्या फोर वॉटर्स संकल्पनेचा वापर पाणलोट क्षेत्र विकासात प्रभावीपणे करण्यात आला. त्यांच्या या पद्धतीने तेवढय़ाच खर्चात दहा पट अधिक जलपुनर्भरण होत आहे. कोरडवाहू भागात त्यांच्या या पद्धतीने क्रांती घडवून आणली व तेथील जलपातळी वाढली. झिरप टाक्यांच्या मदतीने तसेच खड्डय़ांच्या मदतीने पाण्याचे बाष्पीभवन टाळण्याचे त्यांचे तंत्र होते. कठीण खडकात बोअरवेल घेऊ नयेत असे त्यांचे मत होते व त्यांनी साध्या विहिरींतून पाटपाणी देण्याची सूचना केली होती. त्यांनी सुचवलेल्या कुठल्याही तंत्रात सिमेंटचा वापर नव्हता त्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान किफायतशीर होते. अनेक गरीब शेतक ऱ्यांना त्यांच्या या तंत्रज्ञानाचा चांगला लाभ झाला. त्यांचे जलतंत्रज्ञान हे पर्यावरणस्नेही होते. स्थानिक पातळीवर राबवता येईल असे संबंधित गावातील परिस्थितीस अनुरूप असे कमी खर्चातील तंत्रज्ञान तयार करणाऱ्या मातीशी नाळ असलेल्या जलतंत्रज्ञास आपण मुकलो आहोत.