कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ यांनी शपथविधीनंतर आपल्या मंत्रिमंडळात ३० जणांचा समावेश केला, त्यापैकी चौघे पंजाबी आहेत. त्यातही लक्ष वेधले जाते आहे ते ४४ वर्षीय हरजीत सिंग सज्जन यांच्याकडे; कारण त्यांना संवेदनशील असे संरक्षण खाते देण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी कॅनडात पंजाबी भाषेला विशेष दर्जा दिल्याने शीख समाजाला मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळणेअपेक्षितही होतेच.
लेफ्टनंट कर्नल हरजीत सज्जन हे नाव कॅनडात सुपरिचित आहे. तेथील लष्करातील ते पहिले शीख अधिकारी होते. हरजीत सिंग यांचा जन्म पंजाबातील होशियारपूर जिल्ह्य़ाच्या बॉम्बेली येथे झाला. त्यांचे वडीलही पंजाब पोलीस दलात होते. हरजीत दोन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील व्हँकूव्हर येथे आले. तेथे मग एका मिलमध्ये त्यांनी नोकरी पत्करली. चार्ल्स टपर हायस्कूलमध्ये हरजीत यांचे शालेय शिक्षण झाले. बिंदी जोहाल नावाचा खतरनाक गुंड हा शाळेत असताना त्यांच्या वर्गात होता. त्याच्यासोबत राहून काही काळ ते भरकटलेही होते. नंतर मात्र त्यांना आपली चूक उमगली व शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. उत्तम गुणांनी त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. धाडसी वृत्ती अंगी होतीच. ते म्पोलीस खात्यात रुजू झाले. सुरुवातीला गुप्तचर म्हणून त्यांनी काम केले. या काळात गुंड टोळ्यांचे काम कशा प्रकारे चालते, हे हरजीत सिंग यांना जवळून पाहता आले. याचा उपयोग त्यांना तालिबानविरोधी लढय़ात झाला. ब्रिगेडियर जनरल डेव्हिड फ्रेझर यांच्या नेतृत्वाखाली तालिबान्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन मेडय़ुसा’ची आखणी झाली तेव्ही हरजीत यांच्या सल्ल्याचा खूप उपयोग झाला. नंतर त्यांनी कॅनडाच्या लष्करातही सेवा बजावली. अफगाणिस्तानमध्ये तर त्यांना तीन वेळा तालिबान्यांच्या विरोधातील लढय़ासाठी पाठविण्यात आले होते. बोस्नियात संघर्ष सुरू झाला तेव्हाही हरजीत यांनाच तेथील मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले. सर्वच ठिकाणी त्यांनी आपले काम चोखपणे बजावले. लष्करातील अतुलनीय सेवेबद्दल तीन वेळा शौर्य पदके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गेल्या महिन्यात व्हँकूव्हरमधूनच ते संसदेवर निवडून गेले. तेथील पंजाबी समाजात त्यांना मानाचे स्थान असल्याने मंत्रिमंडळात त्यांना घेतले गेले. पोलीस आणि लष्करी सेवेतील त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाला व्हावा म्हणून महत्त्वाचे खाते त्यांना दिले गेले. भारतात जन्मलेला माणूस आता कॅनडाचा संरक्षणमंत्री झाला. सीरियामधील इस्लामिक स्टेट समूहाविरोधातील मोहीम टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.