विज्ञान कादंबरी क्षेत्रात १९७० मध्ये नवप्रवाह आणणारे कादंबरीकार हार्लन एलिसन यांचे लेखन हे साय-फाय पद्धतीच्या पलीकडे जाणारे होते. ‘तसं झालं तर काय ..’ या प्रश्नाच्या उत्तरार्थ निर्माण होत गेलेल्या भाकितात्मक पर्यायांमधून निर्माण होणाऱ्या कथानकातून कादंबरीकडे झुकणारे असे त्यांचे लेखन. ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ हा प्रकार त्यांनी रूढ केला. एलिसन यांच्या निधनाने विज्ञान साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

विज्ञान कादंबरी क्षेत्रातील ते प्रभावी लेखक. त्यांना पाच ब्रॅम स्टोकर पुरस्कार हे भयकथांसाठी मिळाले होते. त्यांनी स्टार ट्रेकचा जो कथाभाग लिहिला होता तो आतापर्यंतचा सर्वोत्तम मानला जातो. हार्लन यांचा जन्म ओहिओत १९३४ मध्ये झाला. एकूण १७०० कथा, चित्रपट व टीव्ही कथा त्यांनी लिहिल्या. सुरुवातीला त्यांनी काही विज्ञान मासिकातून लेखन केले. त्याचे पैसेही कमी मिळत त्यामुळे तेव्हा तो त्यांचा व्यवसाय नव्हता. त्यांनी काही काळ कॅब चालक, टय़ूना मच्छीमार, मित्राचा अंगरक्षक अशी अनेक कामे केली. १९५० मध्ये न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर त्यांनी लेखनावर लक्ष केंद्रित केले. नंतर १९६२ मध्ये लॉस एंजल्सला आल्यानंतर हॉलीवूडसाठी लेखन केले याचे कारण त्यावेळी त्याचे जास्त पैसे मिळत होते. हॉलीवूडमध्ये काहींना एलिसन यांचा तिटकारा होता खरा पण त्यांची बुद्धिमत्ता ते अमान्य करीत नव्हते. स्टार ट्रेकमध्ये त्यांचे योगदान मोठेच होते त्यात दी आउटर लिमिट, दी मॅन फ्रॉम यू.एन.सी.एल.ई. व अनेक कथाभाग गाजले. त्यांनी त्यांची राजकीय मते कधी  लपवली नाहीत. डॉ. किंग यांच्यासमवेत नागरी हक्कांच्या लढय़ात तर ते सामील होतेच शिवाय व्हिएतनाम युद्धविरोधी मोहिमातही ते कार्यरत होते. हॉलीवूडमध्ये भरपूर पैसा मिळत असताना त्यांनी विज्ञान कादंबरी लेखन सोडले नाही. ‘रिपेंट हार्लेक्विन’ या कथेसाठी त्यांना पहिला ह्य़ूगो पुरस्कार मिळाला. ‘आय हॅव नो माऊथ बट आय मस्ट स्क्रीम’ ही त्यांची बहुधा सवरेत्कृष्ट कथा ठरावी, त्यालाही पुन्हा ह्य़ुगो पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘अ बॉय अँड हिज डॉग’ या कादंबरीवर चित्रपटही निघाला होता. त्यात चौथ्या महायुद्धानंतरच्या भवितव्याचे वर्णनआहे. १९५०-६० च्या दशकातील विज्ञान कादंबऱ्या या वैज्ञानिकदृष्टय़ा अचूक, लैंगिकतेला फाटा, सतत सुखांताची सवय अशा पद्धतीच्या होत्या. एलिसन यांनी या चाकोरीबाहेर जाऊन, मानवी जीवनातील गूढ जागी जाऊन त्यांचा शोध घेतला. १९६७ मध्ये त्यांनी विज्ञान कादंबरीतील नवप्रवाहांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरला व त्यातून डेंजरस व्हिजन्स हा ३३ कथांचा संग्रह बनला. १९७५ मध्ये ‘डेथबर्ड स्टोरीज’च्या  रूपाने त्यांच्या लेखनाने वेगळे वळण घेतले, ते लेखन मानसिक पातळीवर पचवणे अवघड होते त्यामुळे त्यांनी हे पुस्तक एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करू नका असा सावधगिरीचा इशाराही दिला होता. लॉस एंजल्स येथे त्यांचे मोठे वाचनालय होते. भूकंपामुळे ते पुस्तकांच्या ढिगाऱ्याखाली सापडले व पत्नी जखमी झाली होती. त्यामुळे पुस्तकांवरचे त्यांचे प्रेम अफाट होते. एकविसाव्या शतकातही ते कालबाह्य़ ठरले नाहीत. त्यांचे पुन्हा ह्य़ूगो पुरस्कारासाठी नामांकन झाले तेव्हा त्यांना अश्रू आवरले नाहीत.