27 January 2021

News Flash

हेलेन लॅक्स- गिन्सबर्ग

अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन कॉलेजमध्ये त्यांनी बराच काळ काम केले.

हेलेन लॅक्स- गिन्सबर्ग

 

देशातील आर्थिक धोरणे बदलली जात असताना, जुन्या धोरणांची आठवण कुणाला राहिली नाही म्हणून ती सारी चुकीचीच होती असे म्हणणाऱ्या राजकारण्यांचे फावते. ‘गरिबांपर्यंत आपोआपच पैसा झिरपेल’, ‘नोकऱ्या निर्माण होतीलच’ असे म्हणत बाजार अर्थशास्त्राची भलामण केली जाते, तेव्हा आर्थिक विषमतेकडे नेणारे घटक बाजारात असतातच, हे सोयीस्करपणे विसरले जाते. हे जे विस्मरण आहे, त्यावर बोट ठेवून समाज आणि धोरणकर्ते यांना लोककेंद्री आर्थिक नीतीची आठवण देण्याचे काम हेलेन लॅक्स गिन्सबर्ग गेले  अर्धशतकभर करत राहिल्या. ‘रोजगाराचा हक्क’ या संकल्पनेचा सक्रिय पाठपुरावा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हेलेन यांचे निधन  गेल्या महिन्यात, ८ ऑक्टोबर रोजीच झाले होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी तीन दिवसांपूर्वी जाहीर केली. जन्मभर प्रसिद्धीपराङ्मुख राहिलेल्या हेलेन यांचा मृत्यूही तसाच, गाजावाजाविना.

अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन कॉलेजमध्ये त्यांनी बराच काळ काम केले.  निवृत्तीनंतरही, त्यांना याच सुप्रतिष्ठ प्राध्यापक होण्याचा मान मिळाला. अध्यापनाचे काम करतानाच, न्यूयॉर्क परिसरातील वाढती बेरोजगारी त्यांना अस्वस्थ करत होती. मुळात अमेरिकेची १९३० पासूनची रोजगार-धोरणे वंशभेदविरहित आहेत का, त्या धोरणांत जरी त्रुटी असल्या तरी त्यातील काय जपायला हवे याच्या अभ्यासाला त्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षणांची जोड दिली. त्यासाठी समविचारी अभ्यासकांसह ‘नॅशनल जॉब्ज फॉर ऑफ कोअ‍ॅलिशन’ची स्थापनाही त्यांनी केली. ‘पूर्ण रोजगार (फुल एम्प्लॉयमेंट) हेच राज्याचे ध्येय-धोरण हवे’ यासाठी त्या झगडल्या. त्यासाठी विविधांगी अभ्यासनिबंध त्यांनी लिहिले. ‘पूर्ण रोजगार हे मिथक आहे’ म्हणणाऱ्यांना त्या साधार उत्तर देत. त्यासाठी स्वीडन आदी स्कॅन्डिनेव्हियन देशांतील स्थितीचा अभ्यासही त्यांनी केला. पुढे, अमेरिका आणि स्वीडन या दोन्ही देशांच्या आर्थिक सल्लागार मंडळांत त्यांना स्थान मिळाले  होते. पण असे मान अल्पजीवी. एरवी रोनाल्ड रेगन वा दोन्ही जॉर्ज बुश यांच्या काळात त्यांना सरकारवर टीकाही करावी लागली. २०११ मध्ये (ओबामाकाळात) ‘रोजगार हक्का’चा पाठपुरावा त्यांनी केला. त्याआधी २००१ च्या ‘९/११’ हल्ल्यानंतर एक महत्त्वाचा अभ्यास त्यांनी केला. स्त्रियांना रोजगार मिळण्याचे प्रमाण मोठय़ा संकटानंतर कमी होते, असा तो अभ्यास होता. करोना महासाथीचा नेमका काय परिणाम रोजगारावर झाला आहे, याचा अमेरिकेपुरता अभ्यास करण्यासाठी तरी त्या हव्या होत्या. मात्र काळ कठोर ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 12:01 am

Web Title: helen lux ginsburg profile abn 97
Next Stories
1 टी. एन. कृष्णन
2 जे. मायकेल लेन
3 प्रियंका राधाकृष्णन
Just Now!
X