तालिबान्यांनी फक्त बामियानच्या बुद्धमूर्तीच नव्हे, तर अफगाण संस्कृतीच उद्ध्वस्त करणे आरंभले होते. अशा काळात, ती धोक्यात आलेली संस्कृती ज्या-ज्या वस्तूंमधून, कागदपत्रांमधून किंवा अन्य कशातून दिसते, ते ते सर्व काही जमा करण्याचा सपाटाच अमेरिकन अभ्यासक नॅन्सी डुप्री यांनी लावला. कबाबविक्रेत्याने पदार्थ बांधण्यासाठी वापरलेला कागद पुस्तकाचा आहे, हे पाहताच ते अख्खे पुस्तक कसे मिळेल, याचा नॅन्सी यांना ध्यास. अशी अनेक पुस्तके त्यांनी वाचवली. मिळतील त्या कलावस्तू तर जमवल्याच, पण तालिबान्यांनी बंदी घातलेल्या अफगाण लोकसंगीताची आणि जनप्रिय संगीताची ध्वनिमुद्रणे त्यांनी केली.. आणि हे सारे, २००५ पर्यंत पेशावरमधल्या घरात ठेवून दिले. अखेर यातूनच, २०१३ पासून काबूल विद्यापीठात ‘अफगाणिस्तान सेंटर’ उभे राहिले. उद्ध्वस्त देश होता कसा, याची आशादायी खूण तिथे तेवत राहिली.

हे सेंटर उभारले गेले, तेव्हा नॅन्सी यांचे वय होते ८६! परवाच्याच रविवारी त्यांची निधनवार्ता आली. अर्धशतकाहून अधिक काळ, म्हणजे वयाच्या ३६व्या वर्षांपासून नॅन्सी अफगाणिस्तानशीच जुळल्या होत्या. या ऋ णानुबंधाचे कारण तसे खासगी. अगदी वैयक्तिक. अमेरिकी दूतावास अधिकारी अ‍ॅलन वूल्फ यांची पत्नी म्हणून त्या प्रथम काबूलमध्ये आल्या. त्यांचा जन्म न्यू यॉर्कपासून चार तासांवरल्या कूपर्स टाऊनचा आणि शालेय शिक्षणही तिथेच झाले असले, तरी इतिहास शिकण्यासाठी त्या न्यू यॉर्कला राहिल्या होत्या. अफगाणिस्तानात ते शिक्षण उपयोगी पडले. ‘अ हिस्टॉरिकल गाइड टु काबूल’ ही पुस्तिका (१९७४) सहज म्हणून त्यांनी लिहिली, त्याआधीपासून परिचित झालेले अमेरिकी अफगाणिस्तान-अभ्यासक व पुरातत्त्ववेत्ते लुई डुप्री यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. नॅन्सी आता लुई यांच्या सहचरी बनल्या. मात्र १९७९ मध्ये अफगाणिस्तानात घुसलेल्या सोव्हिएत फौजांनी लुईंना ‘अमेरिकी हेर’ ठरविले. कसाबसा या जोडीने पाकिस्तानात आश्रय घेतला. पेशावरमध्ये ते राहू लागले; पण १९८९ मध्ये लुई यांचे निधन झाले आणि साधारण तेव्हापासूनच, अफगाणिस्तानातील राजकारण अधिकाधिक विखारी होत गेले. हा तालिबानी विखार १९९५ पर्यंत देशच गिळंकृत करण्याइतका वाढला आणि एकविसाव्या शतकात तर विध्वंस, संहार यांची विकृती तालिबान्यांनी टिपेला नेली. हे सारे नॅन्सी पाहत होत्या, पण आपले काम सोडत नव्हत्या. ‘अध्यात ना मध्यात’ पद्धतीने – राजकीय भूमिकाच न घेता काम करण्याच्या वृत्तीमुळे असेल, पण तालिबानी तावडीतल्या देशात त्या सहज फिरू शकत होत्या! या देशात एके काळी छान जिवंत माणसे होती, त्यांनाही नाचगाण्याची- वाचनाची- राजकीय/सामाजिक चर्चाची आवड होती.. हा ‘गतइतिहास’ टिपणे हे नॅन्सी यांनी आता जीवितकार्य मानले होते.

‘अफगाण सेंटर अ‍ॅट काबूल युनिव्हर्सिटी- एसीकेयू’ ही संस्था त्याच जीवितकार्याचे फलित. इथले ६० हजार दस्तऐवज सुस्थितीत आहेत, बाकीचे विच्छिन्न अवस्थेत का होईना पण आहेत. अफगाण समाज व संस्कृती यांच्या केवळ अभ्यासासाठीच नव्हे तर पुनर्उभारणीसाठी आपले केंद्र उपयोगी पडावे, त्यासाठी अन्य संस्थांनीही या केंद्राचा लाभ घ्यावा, असा नॅन्सी यांचा ध्यास. केंद्राकडे पैसा कमी असल्यामुळे आपल्या हयातीत तो कसा पूर्ण होणार, हाच त्यांना घोर. अगदी रुग्णालयात- मृत्युशय्येवरूनही ‘एसीकेयूबद्दल लिहा’ असे त्या सांगत होत्या.

अमेरिकेशी या साऱ्या काळात त्यांचे संबंध कसे होते, याची जाहीर चर्चा मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही कुठे झालेली नाही.