News Flash

एस. आर. मेहरोत्रा

इटावात जन्मलेले मेहरोत्रा १९६० साली लंडन विद्यापीठातून पीएच.डी. झाले आणि भारतात परतले.

एस. आर. मेहरोत्रा

रशिया आणि चीनसारख्या राष्ट्रांनी क्रांतिकार्याच्या आवेशात तिथल्या आडव्या येणाऱ्या इतिहासखुणा बिनधोक पुसून टाकल्या; पण भारताने मात्र तसे काही पाऊल न उचलताच ते बऱ्यापैकी साध्य केले असे म्हणता येईल. इथल्या इतिहासाची साक्ष देणारी साधने आपण जपली नाहीत. उलट त्याकडे जितके दुर्लक्ष करता येईल, ते केले. दस्तावेजीकरणाबद्दल असलेली ही अनास्था भारताचा इतिहास लिहिणाऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण करणारी ठरली आहे; पण ‘भारत’ आणि ‘भारतीय समाज’ हा इतिहासलेखनाचा विषय ठरू शकतो, हे विसाव्या शतकाच्या मध्यात ध्यानात आल्यावर आणि तोवर लंडनची पौर्वात्य व आफ्रिकी अध्ययन संस्था आणि ऑक्सफर्ड, केंब्रिज इथले काही बुजुर्ग प्राध्यापक आणि शिकागो, वॉशिंग्टनमधले काही तरुण अभ्यासक यांच्यापुरतेच मर्यादित राहिलेले हे अभ्यास क्षेत्र; १९६० च्या दशकारंभी भारतातील ब्रिटिश राजवटीतील दस्तावेज खुले झाल्यानंतर मात्र बाहेरच्या आणि इथल्याही अभ्यासकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. त्यात इतिहासकार एस. आर. मेहरोत्रा यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल. हे असे दस्तावेज खुले झाल्यानंतर बैठक टाकून त्यांचा अभ्यास करणे आणि त्यातून पुढे येणाऱ्या इतिहासाचा अन्वयार्थ लावणे आवश्यक होते. मेहरोत्रा यांनी हे काम जवळपास सहा दशके केले. गेल्या आठवडय़ात- १८ जुलै रोजी ते निवर्तले, तोपर्यंत त्यांची ही ज्ञानसाधना अखंड सुरूच होती.

१९३१ साली उत्तर प्रदेशातील इटावात जन्मलेले मेहरोत्रा १९६० साली लंडन विद्यापीठातून पीएच.डी. झाले आणि भारतात परतले. तेव्हापासून त्यांनी जुन्या कागदपत्रांमध्ये स्वत:स जणू गाडूनच घेतले. त्यातून जे गवसले ते पुढील काळात त्यांनी पुस्तकरूपांत आणले. १९६५ साली प्रसिद्ध झालेले त्यांचे पहिलेच पुस्तक- ‘इंडिया अ‍ॅण्ड द कॉमनवेल्थ’- भारताने राष्ट्रकुल व्यवस्थेशी जोडून घेणे का पसंत केले, याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी तपासणारे आहे. या पुस्तकाने ते प्रकाशात आले खरे; पण पुढील काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची चिकित्सा करणारे ‘द इमर्जन्स ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ (१९७१) आणि महात्मा गांधींच्या आगमनापर्यंतचा काँग्रेस संघटनेचा इतिहास सांगणारे ‘अ हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ (१९९४) या संदर्भबहुल पुस्तकांतून वासाहतिक भारतातील संस्थात्मक राष्ट्रवादाची घडण कशी झाली, याचा त्यांनी घेतलेला वेध महत्त्वाचा आहे. याशिवाय म. गांधी ‘हिंद स्वराज’मधल्या तत्त्वज्ञानाबद्दल ज्यांच्याशी पहिल्यांदा बोलले, त्या डॉ. प्राणजीवन मेहता यांचे लेखन त्यांच्या चरित्रात्मक विस्तृत टिपणासह त्यांनी प्रसिद्ध केले. अलीकडच्या काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या दोन विचारकांच्या कार्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यापैकी एक होते दादाभाई नवरोजी आणि दुसरे होते अ‍ॅलन ह्य़ूम! या दोहोंच्या लेखनाचे, पत्रांचे काळाच्या रेटय़ात उरलेसुरले दस्तावेज त्यांनी धुंडाळले आणि ते पुस्तकरूपांत आणले. मात्र, मेहरोत्रा यांच्या जन्मगावी- इटावातच प्रशासकीय कारकीर्दीचा ओनामा करणाऱ्या आणि पुढे काँग्रेस स्थापण्यात पुढाकार घेणाऱ्या अ‍ॅलन ह्य़ूम यांच्याविषयी त्यांना विशेष आस्था होती. शिमल्यातले ह्य़ूम यांचे घर- रॉथनी कॅसल- सरकारने विकत घ्यावे व तिथे राष्ट्रवादी चळवळीचे संग्रहालय करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती; परंतु ‘काव्यात्म न्याय’ असा की, स्थानिक काँग्रेस नेत्यानेच त्या घराचे रूपांतर उपाहारगृहात होण्यासाठी हातभार लावला!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:18 am

Web Title: historian sr mehrotra profile zws 70
Next Stories
1 डॅनिएल कॅलहान
2 एरिक लॅम्बिन
3 लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे
Just Now!
X