18 July 2019

News Flash

ल्यूक पेरी

दहा वर्षांत सुमारे ३००हून अधिक एपिसोड्सद्वारे ल्यूक पेरीने आपल्याभोवती अफाट वलय तयार केले होते.

‘नेटफ्लिक्स’पूर्व युगातही प्रत्येक दशकातील तरुणाईच्या मनांवर पाश्चात्त्य तारे-तारकांचा प्रभाव होताच. नव्वदीच्या दशकापासून तर तो अमेरिकी टीव्ही मालिकांचाही होता. ल्यूक पेरीची मोहिनी जगभर पोहोचली ती याच काळात.

ल्यूक पेरीचा प्रभावकाळ हा हॉलीवूडमधील चॉकलेट हिरो जॉन क्युझ्ॉक, सुपरस्मार्ट नायक जॉर्ज क्लूनी आणि मदनअवतारी ब्रॅड पिट यांना समांतर. मात्र टीव्ही मालिकांसारख्या दुसऱ्या प्रवाहात झळकूनही या अभिनेत्याची छबी नव्वदीच्या दशकातील सर्वाधिक मासिकांच्या मुखपृष्ठांवर मुख्य धारेतील नायकांसारखी वारंवार छापून येत असे. ‘बेव्हर्ली हिल्स, नाइन झिरो टू वन झिरो’ या मालिकेत त्याने वठविलेल्या अग्रेसर तरुणाची भूमिका अफाट गाजली. अतिश्रीमंत बापाच्या मद्यपी पोराची ही सूडगाथा जगभर निर्यात झाली अन् त्या मालिकेचा सारा डोलारा ल्यूक पेरीने उभा केला. दहा वर्षांत सुमारे ३००हून अधिक एपिसोड्सद्वारे ल्यूक पेरीने आपल्याभोवती अफाट वलय तयार केले होते. सत्तरीच्या दशकात आईवडिलांच्या घटस्फोटामुळे ल्यूकचे स्थलांतर झाले. बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या सावत्र बापाच्या घरात काही काळ राहिल्यानंतर त्याने अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी न्यूयॉर्क गाठले. चेहरा, हिंमत आणि उत्साह यांच्या बळावर बांधकाम मजुरापासून ते दारांच्या बिजागऱ्या-कडय़ा बनविणाऱ्या फॅक्टरीमध्ये न लाजता काम केले. हे काम सुरू असतानाच विविध स्टुडिओंना हेलपाटे घालत २५०च्या वर ‘ऑडिशन्स’मधून साभार परतीचे अनुभव घेतले. तरीही चिवटपणा न सोडल्याने दुय्यम बॅण्ड्सच्या म्युझिक व्हिडीओजमध्ये शेजारी वगैरे उभे राहण्याचे काम त्याला मिळू शकले. ‘बेव्हर्ली हिल्स’ने त्याच्या श्रमाची सारी फळे त्याला मिळू लागली. ‘व्हॅनिटी फेअर’पासून सर्व नियतकालिकांत त्याच्या दहा-वीस पानी दीर्घ मुलाखती छापून येऊ लागल्या. एमटीव्ही, इंडिपेण्डण्ट सिनेमा अशा नव्या- पर्यायी मनोरंजनाच्या त्या काळातही, देखणेपणा आणि अभिनयाच्या बळावर ल्यूक पेरीने आपले स्थान टिकवले. ‘फ्रेण्ड्स’ या टीव्ही मालिकेपूर्वी जगातील तरुणाईचा सामाजिक बुद्धय़ांक पकडणाऱ्या ‘बेव्हर्ली हिल्स’नंतर ‘रिव्हरडेल’ नावाच्या मालिकेमधूनही त्याने आपली लोकप्रियता अबाधित ठेवली. ल्यूक पेरीबाबत नोंदवायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याची तुलना साठच्या दशकातील हॉलीवूडच्या जेम्स डीन या अभिनेत्याच्या आरस्पानी सौंदर्याशी केली जात असे.  जेम्स डीनचा अकाली मृत्यू झाला. या जेम्स डीनच्या चेहरेपट्टीशी आणि अभिनय ताकदीशी तुलना केल्या जाणाऱ्या ल्यूक पेरी याचेही या आठवडय़ात आकस्मिक निधन झाले.

First Published on March 8, 2019 12:19 am

Web Title: hollywood actor luke perry profile