एखादा राजकीय नेता लेखक असणे, त्याला कवी असलेल्या वडिलांचा साहित्यिक वारसा लाभणे जरा दुर्मीळच. म्यानमारसारख्या आतापर्यंत लष्करशाही असलेल्या देशाला पहिले बिगरलष्करी अध्यक्ष लाभले आहेत, ते या दुर्मीळ गटातले. राजकारणी, विद्वान व लेखक अशी त्यांची ओळख; त्यांचे नाव उ तिन च्यॉ (इंग्रजी स्पेलिंग मात्र ‘च्यॉ’सारखे). म्यानमारमध्ये ५० वर्षांच्या लष्करशाहीनंतर लोकशाहीची पहाट झाली असली तरी आँग सान स्यू की यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे च्यॉ यांना सत्ता चालवणे अवघडच असणार आहे. संसदेत लष्कराचे वर्चस्व आहेच. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेले दोघे ‘संयुक्त  उपाध्यक्ष’ च्यॉ यांना मनाप्रमाणे काम करू देतील असे नाही. विशेष म्हणजे त्या दोघांवर अमेरिकेने र्निबध लागू केलेले आहेत. अशा स्थितीत, ३० मार्च रोजी च्यॉ हे म्यानमारच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील.

च्यॉ यांचे वडील मिन थू वून हे म्यानमारचे राष्ट्रीय कवी. त्यांनी १९९० मध्ये निवडणुकीत विजय मिळवला होता. च्यॉ हे मितभाषी व शांत स्वभावाचे. प्रामाणिकपणा, निष्ठा व प्रसिद्धीपासून दूर राहणे, हे त्यांचे विशेष गुण. त्यांचे शिक्षण रंगून इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले. संगणकशास्त्रात उच्चशिक्षणाची संधी लंडन व केम्ब्रिजमध्ये, तर व्यवस्थापनशास्त्र शिकण्याची संधी अमेरिकेतील मसॅच्युसेट्स विद्यापीठात मिळाली.  ते आधी विद्यापीठात शिक्षक होते नंतर सरकारच्या उद्योग खात्यात त्यांनी अनेक पदे भूषवली. त्यानंतर ते परराष्ट्र आर्थिक संबंध कामकाज खात्यात उपसंचालक होते, परंतु लष्कराची पकड मजबूत झाल्याने १९९२ मध्ये राजीनामा दिला.

त्यांनी ‘दाला बान’ या टोपण नावाने लेखन केले आहे. वडिलांचा चरित्रग्रंथ वगळता च्यॉ यांचे सारे लेखन ‘दाला बान’ याच नावाने झाले. त्यांच्या पत्नी सू सू विन या नॅशनल लीग ऑफ डेमोक्रसीच्या संस्थापकांच्या कन्या. त्याही खासदार आहेत. यू लविन हे त्यांचे सासरे. स्यू की यांच्या दिवंगत मातोश्रींच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. किन यी फाऊंडेशन या संस्थेच्या उभारणीत च्यॉ यांचा मोठा वाटा आहे.

आँग सान स्यू की यांचे ते बालपणीचे मित्र असल्याने त्यांनी सुरू केलेल्या लोकशाहीसाठीच्या लढय़ात च्यॉ यांनी उडी घेतली. ही मैत्री आणि निष्ठा इतकी की, स्यू की यांची स्थानबद्धतेतून सुटका झाल्यानंतर काही काळ त्यांच्या मोटारीचे चालक म्हणूनही त्यांनी काम केले.  स्यू की यांची मुले ब्रिटिश असल्याने त्यांना अध्यक्षपद मिळाले नसले तरी त्याच पडद्यामागून सूत्रे हलवणार आहेत, हे च्यॉ यांनीही मान्य केलेले आहे. म्यानमारमध्ये लोकशाहीने अद्याप पुरेसा आकार घेतलेला नाही.   केंद्रीय कायदेमंडळातील दोन सभागृहांपैकी खालच्या (लोकप्रतिनिधीगृह) सभागृहातही  अद्याप २५ टक्के सदस्य लष्करनियुक्तच आहेत. या लष्करी वरचष्म्या मुळे च्यॉ यांच्या सत्ताशकटाचे सारथ्य आता नोबेल मानकरी स्यू की यांच्याकडे असले तरी, वाटचाल सोपी नाही.