ऑड्री हेपबर्न या अभिनेत्रीचं नुसतं नाव घेतलं तरी काळा बिनबाह्य़ांचा झगा आणि मानेखाली पैठणीच्या काठाएवढा रुंद कंठा ल्यालेली हरिणाक्षी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहणं ही रसिकतेची एक खूण असेल; तर ऑड्रीचा हा पोशाख ‘ब्रेकफास्ट अ‍ॅट टिफनीज्’ या १९६१ सालच्या चित्रपटातला आहे हे माहीत असणं, ही रसिकतेला माहितीची जोड असल्याची खूण मानावी लागेल.. आणि ऑड्री हेपबर्न ही देहप्रदर्शन करणारी पुष्कळा वगैरे नसूनही, तिच्या रुबाबदार पोशाखांसकटच ती लक्षात राहते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे सारे पोशाख फ्रेंच फॅशन-डिझायनर ह्य़ूबर्ट डि जिवान्शी यांनी घडविले होते हेसुद्धा माहिती असणं, म्हणजे तर चतुरस्र, चोखंदळ रसिकतेची परमावधीच! समजा हे काहीही माहितीच नसेल, तरी हल्ली आपल्या महाराष्ट्रीय मंडळींच्या समारंभांत काही कॉलेजकन्यका घालतात तो ‘इव्हिनिंग गाऊन’ पाहा.. त्या लांब घोळदार झग्यांपैकी काहींना जी खांद्यांवर किंचितशी रुळणारी उडत्या कॉलरसारखी ‘केप’ असते ती पाहा.. ही स्टाइल- अगदी मराठीतल्या ‘कलाशैली’ या अर्थानं स्टाइल- ह्य़ूबर्ट डि जिवान्शी यांची! ते ९१ वर्षांचे होते, थकले होते. साधारण १९९५ पासून त्यांनी ‘जिवान्शी’ या आपल्याच नावाच्या कंपनीतून पूर्णत: निवृत्तीही घेतली होती, तरीही त्यांची निधनवार्ता सोमवारी आली तेव्हा अनेक जण हळहळले. ही हळहळ प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली नव्हती. ‘जिवान्शी’ या त्यांच्या ब्रॅण्डमुळे त्यांची महती पाश्चात्त्य जगात आणि ते जग परकं न मानणाऱ्या इतरही अनेकांना ठाऊक होती. जिवान्शी यांच्यावरला ५० मिनिटांचा लघुपट (सन २०१५, दिग्दर्शक : एरिक पेरेलिन) पाहिलेले, ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम’च्या फॅशन विभागात जिवान्शीकृत प्रावरणे बघितलेले किंवा गेल्याच जूनमध्ये ह्य़ूबर्ट यांचा जणू जीवनगौरव म्हणून त्यांच्या समग्र कार्याचा आढावा घेणारं ‘जिवान्शी’ हे प्रदर्शन पाहिलेले लोक कदाचित कमी असतील.. पण ऑड्री हेपबर्नखेरीज जॅकेलीन केनेडी-ओनॅसिस, इन्ग्रिड बर्गमन, मारिया कॅलास, ग्रेटा गाबरे अशा अनेक महत्त्वाच्या पाश्चात्त्य पुरंध्रींचा आब राखणाऱ्या पोशाखांमागे जिवान्शी हेच नाव आहे, याची कल्पना नक्कीच अनेकांना होती.

खानदानी सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या ह्य़ूबर्ट यांनी १९५२ मध्ये वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी ‘क्रिश्चन डिऑर’ची नोकरी नाकारून स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला. वस्त्र-अभिकल्पकार क्रिस्टोबल बॅलन्सियागा हे त्यांचे प्रेरणास्थान; तर यीव्ह्ज सेंट लोरँ हे स्पर्धक असूनही उमदे मित्र. सन १९५४ पासून जिचे पोशाख ह्य़ूबर्ट यांनी केले, ती ऑड्री हेपबर्न ही जणू त्यांची स्फूर्तिदेवता! ही सारी माहिती केवळ चित्रवाणी-वाहिन्यांवरील नसून, ती कधीच ग्रंथबद्ध झाली आहे.. ‘जिवान्शी’ ही कंपनी १९८८ साली त्यांनी विकणे आणि पुढली सहा-सात वर्षे त्याच ब्रॅण्डमध्ये प्रमुख अभिकल्पकार म्हणून काम करून १९९५ मध्ये निवृत्त होणे, याही ‘बातम्या’ ठरल्या होत्या!

एखाद्या फॅशन डिझायनरचा इतका उदोउदो होण्याला कारणं आहेत. एक तर, ‘इकोल द ब्यू आर्ट’ या थोर कलासंस्थेत रीतसर कलाशिक्षण घेऊन ह्य़ूबर्ट यांनी फॅशन क्षेत्रात पदार्पण केलं, ते स्वत:ची ‘तात्त्विक बैठक’ डिझायनरची आहे म्हणून! हे तात्त्विक इंगित त्यांच्याच शब्दांत असे- ‘डिझायनरचे लक्ष चौफेर हवे. कल्पना कोठूनही मिळते, पण त्यासाठी चराचरांत कोठूनही रेषा दिसली पाहिजे, हालचाल दिसली पाहिजे.’