आयुष्यात एखाद्या व्यक्तीचा स्वभाव क्रूर नसला तरी त्या व्यक्तीकडून असे काही घडते ज्यात मानवतेच्या ठिकऱ्या उडतात. नुकतेच निवर्तलेले अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ हुबर्ट पी. यॉकी यांच्या बाबतीतही स्थिती काहीशी अशीच होती. अणुबॉम्बच्या मॅनहटन प्रकल्पातील अखेरचा दुवा त्यांच्या रूपाने निखळला. त्यांच्या आयुष्याची अखेर दुर्दैवी ठरली, ती अशा अर्थाने की, त्यांची प्रकृती वेगाने ढासळते आहे हे त्यांची कन्या सिंथिया हिला दिसत होते व तिने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आधीच लोकांकडून पैसे जमवण्यासाठी आवाहन केले. तशी वेळ त्यांचे आजारपण व मुलीनेही त्यांची व त्याआधी पतीची शुश्रूषा करण्यात वाहिलेले आयुष्य यामुळे आली..
यॉकी यांच्यामुळे जपानविरोधातील युद्ध लवकर संपले, कारण त्यांनी टेनेसी येथील ओक रीज येथे कॅल्युट्रॉन नावाच्या यंत्रात युरेनियमचे शुद्धीकरण करून अणुबॉम्ब बनवण्यात मदत केली होती. यॉकी यांचे नाव अणुबॉम्बशी जोडलेले असल्याने ते भयानक गृहस्थ असावेत असा कुणाचाही समज व्हावा, पण प्रत्यक्षात तसे नव्हते. त्यांच्या मुलीची मैत्रीण डायलिसिसवर असताना तिला आयफोनवर संगीत ऐकवण्याचा सल्ला त्यांचाच.. त्यासाठी सिंथियानेही सलग तीस तास बसून ध्वनिफिती हव्या त्या साच्यात करून घेतल्या. आयपॅड चालवण्यात आपण कसे यशस्वी झालो असे सिंथिया त्यांना हवापालटासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नेताना सांगत होती तेव्हा मी सायक्लोट्रॉनही यंत्रात निष्णात होतो तसेच तू केलेस की.. अशी कन्येला दिलेली शाबासकीची थापही त्यांचीच.. यॉकी हे केवळ अणुशास्त्रज्ञ नव्हते; त्यांना जनुकशास्त्र, रसायनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान या शाखांची खूप बारकाईने माहिती होती. अगदी डार्विनच्या उत्क्रांतीवरही त्यांच्यासारखे विवेचन कुणी केलेले नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या आरशातून त्यांनी उत्क्रांतीकडे पाहिले. १९४२ ते १९४६ या काळात त्यांनी मॅनहटन प्रकल्पात काम केले. यॉकी हे अणुभौतिकीत बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. झाले. अणुबॉम्बचे जनक असलेले रॉबर्ट ओपनहायमर, सायक्लोट्रॉनचे निर्माते अर्नेस्ट लॉरेन्स हे त्यांचे गुरू. मॅनहटन प्रकल्पात सायक्लोट्रॉनवर काम करताना त्यांनी युरेनियम शुद्धीकरणाचा वेग वाढवला होता. १६ जुलै १९४५ रोजी अणुबॉम्बची पहिली चाचणी न्यू मेक्सिकोत अलामोगाडरे येथे झाली त्याचे ते साक्षीदार. त्या वेळी अणुबॉम्बचा परिणाम किती झाला ही जबाबदारी त्यांच्यावर होती. नंतर नेवाडात दुसऱ्या अणुबॉम्बच्या चाचणीसही ते उपस्थित होते. गिर्यारोहण, व्हाइट वॉटर कॅनोइंग (नौकानयन) याची आवड त्यांना होती. भटकंती त्यांना आवडायची. ते स्काउटमास्टरही होते. १५ एप्रिलला ते आयुष्याचे शतक पूर्ण करणार होते. त्यासाठी भटकंतीसह विविध कार्यक्रमांचे बेतही ठरले होते पण.. त्यांना मृत्यूने त्यापूर्वीच गाठले.