19 November 2017

News Flash

आय. राममोहन राव

राममोहन राव यांनी लडाखमधील चीनच्या कुरापतीसंदर्भात २००९ सालीच व्यक्त केले होते

लोकसत्ता टीम | Updated: May 16, 2017 1:34 AM

आय. राममोहन राव

‘देशातील महत्त्वाच्या किंवा बहुचर्चित घटनांबद्दल सरकारची भूमिका उच्चपदस्थांकडून लोकांपर्यंत पोहोचायला हवीच, परंतु सीमेवर जेव्हा कुरापती होत असतात तेव्हा माहितीयुद्धही सुरू असते. अशा स्थितीत नकारात्मक बातम्या खुबीने माध्यमांपासून टाळणे, हेही कर्तव्यच असते’ हे उद्गार आज कुणी काढल्यास, एखादा मोदीविरोधक गोरक्षकांच्या हिंसाचाराबद्दल सूचक तिरकसपणे बोलून पुढे सीमा सुरक्षा दलातील पदे स्वीकारण्यास अनेक पात्र उमेदवारांचा नकार, पाकिस्तानकडून सलग तीन दिवस शस्त्रसंधीभंग, त्यामुळे एक हजार नागरिक तात्पुरत्या निवाऱ्यांकडे.. आदी बातम्यांवर रोख ठेवतो आहे असा अर्थ काढला जाईल. परंतु वरील मत आय. राममोहन राव यांनी लडाखमधील चीनच्या कुरापतीसंदर्भात २००९ सालीच व्यक्त केले होते आणि या मताकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले होते. ते अपेक्षितच; कारण आय. राममोहन राव हे देशाचे माजी ‘प्रमुख माहिती अधिकारी’ तसेच राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, इंदरकुमार गुजराल आणि काही काळ पी. व्ही. नरसिंह राव अशा चौघा पंतप्रधानांचे माध्यम-सल्लागार होते.

उच्चपदी अनेक कर्तृत्वहीन माणसे बसतात, पण राव तसे नव्हते. सन १९७१ च्या युद्धात लष्कराचे ‘युद्धकालीन संप्रेषक’ (कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेटर) म्हणून त्यांनी केलेल्या कामाची आठवण जाणकार मंडळी आजही काढतात. युद्धस्थितीत दिल्लीच्या साउथ ब्लॉकमधील वातानुकूल कचेरीतून प्रत्यक्ष अमृतसर सीमाभागात जाऊन, सैनिकांच्या राहुटय़ांत तात्पुरती कचेरी उभारूनही त्यांनी काम केले होते. भारतीय हवाईदल आणि नौदल पूर्व सीमेवर बांगलादेशाचा जन्म सुकर करीत असताना, पश्चिम सीमेवरून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या अफवा मुंबईपर्यंत पसरत होत्या, पण चोख लष्करी हवाल्याने तातडीने त्यांचे खंडन करून, भारतीयांचा हुरूप वाढवणारे काम राव करीत होते.

राममोहन मूळचे कारवारचे. तेथून मुंबईला शिकण्यासाठी आले. पुढे काय करावे या विचारात पडले. एका नातेवाइकाने ‘माझे दिल्लीचे तिकीट फुकट जाणार, देऊ का तुला?’ विचारताच ‘हो’ म्हणाले! दिल्लीच्या ‘प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो’त (पीआयबी) शिकाऊ उमेदवार म्हणून लगोलग नोकरी मिळाली. पण तेवढय़ावर न थांबता ते शिकत राहिले आणि नोकरीतही, काम कसे करावे याचा विचार करून बढत्या मिळवू लागले. ‘कर्म हाच धर्म’ हे माझे ब्रीद असे त्यांनी ‘कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेटर’ याच नावाच्या, आत्मचरित्रपर- परंतु कामाबद्दल अधिक लिखाण असलेल्या- पुस्तकात लिहिले आहे.

बढत्या मिळवत राव ‘प्रिन्सिपल इन्फर्मेशन ऑफिसर’ झाले. हे पद ‘पीआयबी’तील आणि सर्वोच्च. पंतप्रधानांचे माध्यम-सल्लागार म्हणून त्यांनी याच पदावरून काम केले. प्रसारमाध्यमांतील किंवा वृत्तपत्रांतील पत्रकारांनाच पंतप्रधानांनी माध्यम-सल्लागार म्हणून नेमण्याची प्रथा राव यांच्या कारकीर्दीच्या बरीच नंतर सुरू झाली. त्या वेळचे माध्यम-सल्लागार हे पंतप्रधानांशी मोकळेपणाने बोलू शकत असत. ‘तुम्ही ज्या मध्यमवर्गाच्या आणि बुद्धिजीवींच्या पाठिंब्यावर निवडून आलात, तो वर्ग आता तुमच्याकडे पाठ फिरवू लागला आहे’, असे तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांना राममोहन राव यांनी अनौपचारिकपणे सांगितल्यावर व्हीपी म्हणाले, ‘नवा पाठिंबादार वर्गच मी तयार करतो आहे’, ही आठवण मंडल आयोग अहवाल लागू करण्याच्या घोषणेच्या लगेच नंतरची. पण यानंतर भाजपने व्हीपींचा पाठिंबा काढला. पुढे गुजराल व नरसिंह राव यांचेही माध्यम-सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आणि १९९३ साली नरसिंह रावांनी, जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल, जनरल के. व्ही. कृष्ण राव यांचे सल्लागार म्हणून राममोहन रावांची नियुक्ती केली. तिथपासून १९९६ पर्यंत, हिंसाग्रस्त आणि राष्ट्रपती राजवट असतानाच्या काश्मीरची स्थिती हाताळण्याची संधी त्यांना मिळाली, ती वाजपेयी सरकारच्या काळापर्यंत.

या राममोहन राव यांचे १३ मे रोजी दिल्लीत वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा काळ वेगळा होता. तोही सरलाच.

First Published on May 16, 2017 1:27 am

Web Title: i ramamohan rao former principal information officer