‘मी स्त्रीवादी चळवळीसोबतच वाढले’ असे त्या आवर्जून सांगत आणि त्यांच्या निधनानंतर, तीच ओळख पुस्तकांतून उरेल. समाजविज्ञानातील पीएच.डी.च्या अभ्यासक या नात्याने ‘फील्डवर्क’ साठी १९७० साली दिल्लीहून त्या मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात गेल्या. त्या वेळी आदिवासी महिलांना त्यांनी हक्कांसाठी झगडताना पाहिले. आदिवासी समाजांमध्ये अंगभूत असणारी समता हळुहळू, ‘विकासा’विषयीच्या कल्पनांमुळे स्त्रीपुरुषांत कसा भेद वाढवते हेही त्यांना पाहता आले. तेथील स्वयंसेवी संस्थांच्या कामाकडे दुरून पाहतानाच त्यांना जन्माचा जोडीदार भेटला आणि मग पुढल्या काळात- सन २००९ नंतर, ‘डॉक्टर बिनायक सेन यांच्या पत्नी’ असा शिक्काच प्रसारमाध्यमांनी  इलीना सेन यांच्यावर मारून टाकला! ‘लेखिका, अभ्यासक आणि कार्यकर्त्यां’ ही इलीना यांची ओळख माध्यमांनी मान्य केली, ती नऊ ऑगस्ट रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाल्यावर.

त्याआधी आणि त्यानंतरही, इलीना यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नक्कीच होते. डॉ. बिनायक सेन यांनी ‘शहीद हॉस्पिटल’ या आदिवासी भागातील रुग्णालयाची उभारणी करून जे विधायक कार्य केले, त्यास इलीना यांची साथ जरूर होती. मात्र वरवर पाहाता पतीचे कार्य हेच आपले काम मानणाऱ्या वाटल्या, तरी इलीना यांचा स्वतंत्र अभ्यास सुरू होता. आदिवासी भागांमधून होणारी स्थलांतरे, त्या स्थलांतरांमधील महिलांचे स्थान, यांविषयी ‘सूखावासिन’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. या महिलांशी बोलायचे, त्यांचा अभ्यास करायचा तर त्यांच्याशी नाते जोडावेच लागते. हे नाते नुसते अभ्यासकाचे असेल तर ते कोरडेच ठरते आणि कार्यकर्त्यांशी समाजाचे जे नाते असते त्यातील ओलावा निराळा असतो, हे इलीना यांना पूर्णत: पटले होते. हा भाग नक्षलवादग्रस्त, त्यामुळे डॉ. बिनायक सेन यांच्यावर ‘नक्षलींसाठी निरोप्याचे काम करणारे’ असा आरोप तत्कालीन सरकारने ठेवला, ‘यूएपीए’ कायद्याखाली त्यांना अटक केली पण खटला भरला. या सर्व काळात इलीना यांनी डॉ. बिनायक सेन यांचे निदरेषत्व जगाला पटवून देत होत्या. अखेर बिनायक सेन यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवता येत नाही, असा निर्वाळा देऊन सर्वोच्च न्यायालयाने बिनायक यांना जामीन मंजूर केला. बिनायक यांच्यासह केलेल्या प्रवासाचा मागोवा ‘पेंग्विन’ने प्रकाशित केलेल्या ‘छत्तीसगढ: अ पोलिटिकल मेम्वार’ या पुस्तकात त्यांनी घेतला आहे. त्याआधी, चिपकोपासून चांदवडपर्यंतच्या चळवळींत महिलांचे स्थान अधोरेखित करणारे ‘अ स्पेस विदिन द स्ट्रगल’ हे पुस्तक त्यांनी लिहिले होते.  २००५ नंतर वर्धा येथील ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विश्वविद्यालया’त, तसेच मुंबईच्या ‘टाटा  समाजविज्ञान संस्थे’मध्ये त्यांनी अध्यापनकार्यही केले.