News Flash

कोनेरु हंपी

पारंपरिक जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत तिला दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

विश्वनाथन आनंद गेल्या डिसेंबर महिन्यात पन्नास वर्षांचा झाल्याबद्दल त्याच्या देदीप्यमान कारकिर्दीचा आढावा अधिकांशाने घेतला गेला, हे रास्तच. परंतु २०१९ या वर्षांत ज्या भारतीय बुद्धिबळपटूने सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली, ती होती ग्रँडमास्टर कोनेरु हंपी. मॉस्कोत नुकत्याच झालेल्या जागतिक रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेत हंपीने जगज्जेतेपद पटकावले. ३३व्या वर्षी हंपीने सिनियर गटात मिळवलेले हे पहिलेच जगज्जेतेपद. ५० वर्षांचा आनंद ज्या तडफेने त्याच्यापेक्षा कितीतरी युवा बुद्धिबळपटूंशी टक्कर देत आहे, तसेच काहीसे हंपीचे आहे. २०१६मध्ये मातृत्वाच्या कारणास्तव तिने बुद्धिबळातून विराम घेतला. दोन वर्षांनी म्हणजे २०१८मध्ये तिने बातुमी ऑलिम्पियाडच्या निमित्ताने पुनरागमन केले, जे फारसे यशस्वी म्हणता येणार नाही. परंतु निव्वळ जिंकत राहण्यापेक्षा हंपीने काही व्यावहारिक उद्दिष्टे समोर ठेवली आणि त्या दिशेने तिचे प्रयत्न सुरू झाले. पारंपरिक जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत तिला दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तरी ती खचली नाही. पण साशंक होती. अशा वेळी विख्यात माजी जगज्जेत्या ज्युडिथ पोल्गारने तिला धीर दिला. थोडे डाव खेळल्यावर सारे काही ठीक होईल, हा ज्युडिथचा सल्ला. मग रशियात स्कोल्कोवो येथे झालेल्या ग्रांप्रि स्पर्धेचे अजिंक्यपद तिने पटकावले. त्या स्पर्धेत अनेक दिग्गज बुद्धिबळपटू सहभागी झाल्या होत्या. या विजेतेपदामुळे हंपीचा आत्मविश्वास दुणावला. मॉस्कोत रॅपिड जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत तर अखेरच्या टप्प्यात परिस्थिती फारच गुंतागुंतीची होती. चीनच्या लेइ तिंगजिएविरुद्ध टायब्रेकरमध्ये जिंकताना तिने दाखवलेला मानसिक खंबीरपणा असामान्य होता. विश्वनाथन आनंदपाठोपाठ सिनियर जगज्जेता ठरलेली हंपी ही दुसरीच भारतीय बुद्धिबळपटू. खरे तर युवा वयातच तिने या खेळात प्रगतीची महत्त्वाची शिखरे सर केली होती. काही काळ ती २६०० एलो मानांकनाच्या वर पोहोचली होती आणि एक वेळ तर ज्युडिथ पोल्गारच्या नंतर ती दुसऱ्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू होती. हे सातत्य पुढे अनेक कारणांनी हंपीला राखता आले नाही. दरम्यानच्या काळात रशिया, चीन, युक्रेनच्या बुद्धिबळपटूंनी मुसंडी मारली. तरीही कोनेरु हंपीमध्ये खेळण्याची आस आणि जिंकण्याची ऊर्जा जिवंत राहिली हे महत्त्वाचे. पारंपरिक प्रकारात हंपीने २००४, २००८ आणि २०१० जगज्जेतेपद लढतींमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तर रॅपिड प्रकारात ती २०१२मध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. आज ती जागतिक महिला क्रमवारीत हू यिफान आणि जू वेन्जून या चिनी बुद्धिबळपटूंपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. अजूनही ती पारंपरिक जगज्जेतेपद मिळवू शकते, याची झलक तिच्या रॅपिड जगज्जतेपदाने निश्चितच दाखवून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:10 am

Web Title: india youngest grandmaster koneru humpy profile zws 70
Next Stories
1 सरोजिनी डिखळे
2 चंद्र मोहन
3 चक पेडल
Just Now!
X